ऑन स्क्रीन : चार्ली चोप्रा : गडद रहस्याचं देखणं सादरीकरण

ख्रिस्ती यांच्या ‘सिटाफोर्ड मिस्ट्री’ला भारद्वाज हिमाचल प्रदेशात घेऊन आले आहेत व चार्ली या पंजाबी मुलीच्या माध्यमातून त्यांनी एक रहस्य उलगडून दाखवलं आहे.
charlie chopra & the mystery of solang valley web series
charlie chopra & the mystery of solang valley web seriessakal

विख्यात दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव. ‘ओंकारा’, ‘मकबूल’ आणि ‘हैदर’ या चित्रपटांतून त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांना भारतीय भूमीत आणून त्यांचं सोनं केलं. ‘चार्ली चोप्रा ॲण्ड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ या वेब सिरीजच्या माध्यमातून त्यांनी थेट अगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीला हात घातला आहे.

ख्रिस्ती यांच्या ‘सिटाफोर्ड मिस्ट्री’ला भारद्वाज हिमाचल प्रदेशात घेऊन आले आहेत व चार्ली या पंजाबी मुलीच्या माध्यमातून त्यांनी एक रहस्य उलगडून दाखवलं आहे. पात्रांची निवड, लोकेशन्स, संगीत, दिग्दर्शन व अभिनय या सर्वच आघाड्यांवर ही सिरीज कमाल आहे.

‘चार्ली चोप्रा’ची सुरवात अत्यंत गूढ वातावरणात होते. कुटुंबाच्या स्नेहसंमेलनात डॉ. राय (नसिरुद्दीन शहा) आपल्या मांत्रिक ताकदीतून ‘लेडी रोज’ नावाच्या महिलेला पाचारण करतात आणि कुटुंबातील एक सदस्य ब्रिगेडिअर मेहेरबान सिंग रावत (गुलशन ग्रोवर) यांचा खून झाला असल्याचं जाहीर करतात.

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच ब्रिगेडिअरच्या संपत्तीमध्ये वाटा हवा असतो आणि संशयाची सुई सर्वांच्या दिशेनं जाते. मात्र, ब्रिगेडिअरचा भाचा जिमी (विवान शाह) हा त्यांना भेटलेली शेवटची व्यक्ती असतो व पोलिस त्याला अटकही करतात. जिमीची होणारी गुप्तहेर पत्नी चार्ली चोप्रा (वामिका गाबी) हत्येच्या ठिकाणी दाखल होते आणि जिमी खुनी नाही, हे तिला लगेचच लक्षात येतं.

आता ब्रिगेडिअरचा खून नक्की कोणी केला, हे शोधण्यासाठी ती घरातील प्रत्येकाचा माग घ्यायला सुरवात करते. या कामात तिला सीताराम (प्रियांशू पेनयुली) मदत करतो. ब्रिगेडिअरची भाडेकरू विलायत (लारा दत्ता), पत्नी डॉ. जानकी रावत (नीना गुप्ता), मिस भरुचा (रत्ना पाठक शाह) अशा अनेकांकडं संशयाची सुई फिरत राहते. खुन्याचा तपास लागतो, मात्र या खुन्याचाही एक खुनी असतो व त्याचाही तपास सुरू होतो. चार्लीची ही शोधसफर एका टप्प्यावर संपते व पुढचं आव्हान उभं करीत संपते.

‘चार्ली चोप्रा’च्या या कथेसाठी निवडलेला परिसर त्यातील गूढ अधिक गहिरं करतो. बर्फाच्छादित डोंगराच्या कुशीतील टुमदार घरं आणि तिथं घडणारं नाट्य उत्तरोत्तर रंगत जातं. चार्लीकडून विविध पात्रांची उलटतपासणी आणि एक पात्र खुनी नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर दुसऱ्याची तपासणी असा सिलसिला सुरू राहतो. हे नाट्य सुरू असतानाच आणखी काही खून होतात, रहस्य अधिक गडद होतं.

मात्र, पारंपरिक पद्धतीनं सर्व पात्रांना एकत्र आणून खुन्यापर्यंत पोचण्याची पद्धत बदलून त्यात काही बदल नक्कीच करता आला असता. तरीही, उत्सुकता कायम ठेवण्यात कथा कुठंही कमी पडत नाही आणि शेवटही जोरदार धक्का देतो. विशाल भारद्वाज यांची गोष्टी सांगण्याची पद्धत धमाल असते आणि इथंही तोच अनुभव येतो.

चार्लीची तपासाची पद्धत, कॅमेराकडं पाहत केलेली स्वगतं, तिची आणि सीतारामची तपासातील धडाडी व त्यातून होणारी विनोदनिर्मिती, मिस भरुचा हे पात्र आणि त्यातील सस्पेन्स या सर्व गोष्टी जुळून आल्या आहेत. तबला आणि संतूरचा वापर करीत निर्माण केलेलं गूढ संगीत, तसेच रेखा भारद्वाज व सुनिधी चौहान यांच्या आवाजातील गाणी कथा अधिक टोकदार बनवतात.

कलाकारांची मोठी फौज व प्रत्येकाचा तोडीस तोड अभिनय हीही सिरीजचे वैशिष्ट्ये. वामिका गाबीला सर्वाधिक संधी आहे व चार्लीच्या स्वभावाचे विविध पैलू सादर करीत तिनं धमाल अभिनय केला आहे. प्रियांशू पेनयुली छोट्या भूमिकेत भाव खातो. नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, नीना गुप्ता, लारा दत्ता, गुलशन ग्रोवर हे दिग्गज कलाकार कथेला उंचीवर नेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com