ऑन स्क्रीन : फ्रायडे नाइट प्लॅन : आंबड-गोड ‘भाऊ’बंधन

टिनएजर भावांमधील प्रेमापेक्षा भांडणांचे, कुरघोडीचे किस्सेच जास्त मनोरंजक असतात, हे कोणतेही भाऊ छातीठोकपणे सांगतील!
friday night plan movie
friday night plan moviesakal

टिनएजर भावांमधील प्रेमापेक्षा भांडणांचे, कुरघोडीचे किस्सेच जास्त मनोरंजक असतात, हे कोणतेही भाऊ छातीठोकपणे सांगतील! वत्सल नीलकंठन दिग्दर्शित आणि फरहान अख्तरची निर्मिती असलेला ‘फ्रायडे नाइट प्लॅन’ हा चित्रपट दोन भावांतील अशाच नात्याची गोष्ट सांगतो. एका गंभीर आणि त्याचबरोबर विनोदी घटनेमुळं त्यांना त्यांच्यातील नात्याचा शोध लागतो व अनेक बारकावेही उलगडतात.

अभिनय, संगीत, चित्रण या आघाड्यांवर चांगली कामगिरी करणारा हा चित्रपट कथा व पटकथेच्या बाबतीत थोडा कच्चा राहतो. तरीही, आजच्या पिढीची गोष्ट आणि नात्यांतील गंमत अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा पहावा असाच.

‘फ्रायडे नाइट पार्टी’ची गोष्ट आहे दोन भावांची. मोठा सिद्धार्थ (बाबिल खान) १८ वर्षांचा, तर धाकटा आदी (अमृत जयान) १६ वर्षांचा. दोघांचीही सातत्यानं व छोट्या-छोट्या कारणांमुळं होणारी भांडणं त्यांच्या आईच्या (जुही चावला) दृष्टीनं मोठी समस्या असते. तिला कंपनीच्या कामासाठी परगावी जावं लागतं आणि या दोघांना घरात एकटं राहण्याची वेळ येते.

आत्ममग्न, स्वतःच रमणारा सिद्धार्थ कॉलेजच्या या शेवटच्या दिवशी फुटबॉलचा सामना खेळणार असतो, तर ‘हॅपी गो लकी’, मैत्रिणींत रमणाऱ्या आदीला हा दिवस साजरा करायचा असतो. सिद्धार्थच्या वर्गातील मुलांचा कॉलेजच्या शेवटच्या दिवशीचा नाइट प्लॅन तयार असतो, मात्र सिद्धार्थ या सर्वांपासून दूर राहतो. फुटबॉलच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी सिद्धार्थ गोल करतो आणि स्टार बनतो.

वर्गातील मुलं त्याला पार्टीला येण्यासाठी तयार करतात व अनेक विनवण्या करीत आदीही त्याच्याबरोबर पार्टीला येतो. पार्टीची तयारी करताना दुसऱ्या वर्गातील मुलांनी केलेल्या एका प्रॅन्कला प्रत्युत्तर देताना सिद्धार्थ व आदी एका मोठ्या संकटात सापडतात. या परिस्थितीत हे दोघं पार्टीला जातात का, या संकटाचा सामना ते कसा करतात, त्यांच्या आईला याचा सुगावा लागल्यावर काय परिस्थिती निर्माण होते याची उत्तर शेवटी मिळतात.

चित्रपटाची कथा युवकांशी संबंधित आणि फ्रेश आहे. दोघा भावांतील प्रेम-द्वेषाचे संबंध अत्यंत नेमकेपणानं आणि खुसखुशीत शैलीत टिपल्यानं कथा सुरवातीपासून पकड घेते. आत्मविश्‍वास गमावलेला सिद्धार्थ आणि अतिआत्मविश्‍वास असलेला आदी यांच्यातील केमिस्ट्री छान जमली आहे.

सिद्धार्थला बारावीनंतर कोणत्या देशातील कॉलेज निवडायचं याबद्दल निर्णय घेता येत नाही, छान गाता येत असूनही त्याचं गाणं बाथरूमपर्यंत मर्यादित राहतं. दुसरीकडं आदी मुलींशी मैत्री करण्यापासून आईला खोटं सांगून फायदा उठवण्यापर्यंत सर्व गोष्टी करीत असतो.

एका टप्प्यावर या दोघांना त्यांच्या नात्यातील बलस्थानं समजतात आणि त्याचा उपयोग समस्येवर मात करण्यासाठीही होतो. केवळ एका रात्रीत घडणारी ही कथा फारशी वेगानं पुढं सरकत नसली, तरी तिच्यातील ताजेपणा आणि अगदी प्रत्येकाच्या आयुष्यातील वाटावेत असे प्रसंग खिळवून ठेवतात.

परगावावरून परत आलेल्या आईला सिद्धार्थ ‘आता आमच्यात पुन्हा कधीच भाडणं होणार नाहीत,’ असं ठामपणे सांगतो, हा प्रसंग छान जमून आला आहे. कथेचा शेवटही वेगळा. इरफान या बहुआयामी अभिनेत्याचा मुलगा बाबिल खान सिद्धार्थच्या भूमिकेत जबरदस्त छाप पाडतो.

अंतर्मग्न, बुजरा व एका टप्प्यावर आत्मविश्‍वास मिळाल्यानंतर थेट व्यक्त होणारा सिद्धार्थ जोशात सादर करीत त्यानं आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत, हे दाखवून दिलं आहे. आदीच्या भूमिकेत अमृत जयान भाव खातो. जुही चावलानं छोट्या भूमिकेतही आपला प्रभाव पाडला आहे. इतर कलाकारांना फारशी संधी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com