ऑन स्क्रीन : फनरल : ‘फन’ मृत्यूच्या सेलिब्रेशनची!

मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते हसत स्वीकारायला हवं, हे सांगणं सोपं; पण त्याला सामोरं जाणं तेवढंच अवघड.
Funeral Marathi Movie
Funeral Marathi MovieSakal
Summary

मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते हसत स्वीकारायला हवं, हे सांगणं सोपं; पण त्याला सामोरं जाणं तेवढंच अवघड.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते हसत स्वीकारायला हवं, हे सांगणं सोपं; पण त्याला सामोरं जाणं तेवढंच अवघड. मृत्यूला आनंदाने स्वीकारता आल्यास त्यातही ‘फन’ आहे, असा संदेश देणारा रमेश दिघे दिग्दर्शित व आरोह वेलणकरची प्रमुख भूमिका असलेला ‘फनरल’ हा चित्रपट मृत्यू या गंभीर विषयाभोवती विणला असला, तरी तो हसवतो, भावूक करतो व विचार करायला भाग पाडतो. कथा व अभिनय या आघाड्यांवर चांगली कामगिरी करणारा हा चित्रपट संकलनातील त्रुटींमुळे काही ठिकाणी निराशा करतो.

‘फनरल’ची कथा आहे मुंबईतील चाळीत राहणाऱ्या हिरा (आरोह वेलणकर) या धडपड्या युवकाची. त्याचे आई-वडील लहानपणीच वारल्यानं आजोबांनी (विजय केंकरे) त्याचा सांभाळ केला आहे. हिरा त्याच्या तीन मित्रांबरोबर नोकरी मिळवण्याच्या किंवा जमल्यास एखादा व्यवसाय करण्याच्या खटपटीत आहे. त्याचा मित्र विनोद (पार्थ घाटगे) एका वृद्धाला पॉलिसी विकण्याचा प्रयत्न करीत असताना दुर्दैवी घटना घडते आणि या वृद्धाच्या अमेरिकेत राहणाऱ्या नातेवाइकांना मदत करण्याची जबाबदारी हिरा व त्याच्या मित्रांवर येते. या दरम्यानच कर्जबाजारी झालेल्या या मित्रांना अंत्यसंस्कारात मदतीच्या व्यवसायाची कल्पना सुचते. मात्र, या कामाला समाजमान्यता नसते आणि सर्वांच्या घरच्यांकडूनही विरोध होतो. हिरा व त्याच्या आजोबांमधील संबंध ताणले जातात. हिराच्या शेजारी राहणाऱ्या मोरे आजी (प्रेमा साखरदांडे) त्याला या व्यवसायासाठी पाठिंबा देतात आणि व्यवसायाचे काही कानमंत्रही देतात. मोठ्या संघर्षातून व ग्राहकांना काही युनिक गोष्टी देत हिरा या अनोख्या व्यवसायाला यशस्वी करून दाखवतो.

चित्रपटाच्या कथेमध्ये नावीन्य आहे आणि ती एक वेगळा विचार मांडते, तो पटवून देते. मात्र, मूळ विषयापर्यंत जाताना खूप जास्त वेळ खर्ची पडतो व शेवट मात्र गुंडाळला जातो. पहिल्या भागात पात्रांची गर्दीही खूप जास्त असल्यानं कथा लांबते. मात्र, मध्यंतरानंतर ती वेग पकडते, महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित होते. या भागातील काही प्रसंग हसवतात व वृद्धांच्या समस्या, जगण्यासाठीची त्यांचा संघर्ष आणि मृत्यू कसा हवा यासंबंधीच्या अपेक्षा डोळ्याच्या कडा ओलावतात. आयुष्यभर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या वृद्धाची आपली अंतयात्रा मॅरेथॉनच्या स्वरूपात निघावी ही अपेक्षा किंवा आयुष्यवर जिच्यावर अबोल प्रेम केलं तिच्या घरावरून, तिला दिसंल अशा पद्धतीनं आपली अंतयात्रा न्यावी अशी आणखी एका वृद्धाची अपेक्षा पाहिल्यावर त्यांना आपला मृत्यू सेलिब्रेट करायची इच्छा असल्याचं दिसतं. हाच धागा पकडून हिरा लोकांना सेवा देतो व मृत्यूमध्ये, अंत्यसंस्कांमध्येही एक ‘फन’ असल्याचं सिद्ध करतो. हा विचार प्रेक्षकांना अंतर्मुख करतो व चित्रपटाला वेगळ्या उंचावर नेण्यात यशस्वी ठरतो.

अभिनयाच्या आघाडीवर आरोह वेलणकरला चांगली संधी मिळाली आहे. ‘रेगे’ या चित्रपटातील अभिनयामुळं प्रेक्षकांना त्याची ओळख झाली आहे. या आव्हानात्मक भूमिकेत त्यानं गहिरे रंग भरले आहेत. त्याचं विनोदाचं टायमिंगही परफेक्ट असून, भावुक प्रसंगांतही त्याचा अभिनय खुलतो. हिराचा कौटुंबिक, सामाजिक व व्यवसायातील संघर्ष दाखवताना त्यानं छान कामगिरी केली आहे. त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत तन्वी बर्वे शोभून दिसते. विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांबरोबरच इतर सर्वच नवख्या कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

एकंदरीतच, मृत्यूसारख्या गंभीर विषयावरची, मृत्यूला सेलिब्रेशनचं स्वरूप देणारी ही अनोखी कथा एकदा अनुभवावी अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com