ऑन स्क्रीन : जेहानाबाद : टोकदार रोमान्स आणि रोमांच!

प्रेम आणि युद्ध ही थीम घेऊन अनेक सिनेमे आणि बेव सिरीज प्रदर्शित झाल्या असून, ‘जेहानाबाद’ ही सोनी लिव्हवरील सुधीर मिश्रा यांची सिरीज थरार आणि ट्विस्ट यांनी ओतप्रोत भरलेली आहे.
jehanabad movie
jehanabad moviesakal
Updated on
Summary

प्रेम आणि युद्ध ही थीम घेऊन अनेक सिनेमे आणि बेव सिरीज प्रदर्शित झाल्या असून, ‘जेहानाबाद’ ही सोनी लिव्हवरील सुधीर मिश्रा यांची सिरीज थरार आणि ट्विस्ट यांनी ओतप्रोत भरलेली आहे.

प्रेम आणि युद्ध ही थीम घेऊन अनेक सिनेमे आणि बेव सिरीज प्रदर्शित झाल्या असून, ‘जेहानाबाद’ ही सोनी लिव्हवरील सुधीर मिश्रा यांची सिरीज थरार आणि ट्विस्ट यांनी ओतप्रोत भरलेली आहे. जातीची टोकदार गणितं असलेल्या बिहार या राज्यात २००५मध्ये नक्षलवाद्यांनी जेहानाबाद या शहरावर हल्ला करीत शेकडो कैद्यांना मुक्त केलं होतं. या सत्यघटनेचा आधार घेत एक प्रेमकहाणी, नक्षली-पोलिस-राजकारणी यांच्यातील संबंध, त्यातील अनेक छुपे कंगोरे याची कथा सीरीज मांडते. गरीब आणि श्रीमंतांतील संघर्ष, त्याला जोडलेली जातीय गणितं असलेली कथा, चांगला अभिनय आणि संगीत याच्या जोरावर ‘जेहानाबाद’ गुंतवून ठेवते, मात्र न पटणारा शेवट आणि पुढील भागांच्या तयारीसाठी मूळ कथेचा दिलेला बळी यांमुळं हिरमोडही करते.

‘जेहानाबाद’ची कथा आहे कस्तुरी मिश्रा (हर्षिता गौर) आणि अभिमन्यू सिंग (ऋत्विक भौमिक) यांची. कस्तुरी जेहनाबादमधील कॉलेजमध्ये शिकते आहे आणि अभिमन्यू कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून दाखल होतो. त्याच्या वेगळ्या आणि क्रांतिकारी विचारांमुळं कस्तुरी त्याच्याकडं आकर्षित होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांचा कमांडर दीपक कुमार (परमब्रत चटर्जी) जेहानाबादच्या तुरुंगात आणला जातो आणि नक्षलवाद्यांच्या टोळ्या त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी नियोजन करू लागतात. त्यांच्या म्होरक्या गुरुजी (सुनील सिन्हा) एक भयानक योजना आखतो. शिवानंद सिंग (रजत कपूर) हा राजकारणी या संघर्षात तेलच ओततो. कस्तुरीच्या वडिलांची तुरूंगाच्या आवारात कॅन्टीन असल्यानं हे कुटुंब संघर्षात ओढलं जातं. नक्षलवादी शहरावर हल्ल्याचे नियोजन करतात आणि रक्तरंजित संघर्षाची सुरवात होते. या सगळ्यात कस्तुरी-अभिमन्यूच्या प्रेमाचं काय होतं, नक्षलवाद्यांची योजना सफल होते का, दीपक कुमारला तुरुंगाबाहेर काढण्यात गुरुजींना यश येतं का अशा प्रश्‍नांची अनेक ट्विस्टनंतरची उत्तरं मिळवण्यासाठी कथेचा शेवट पाहा.

जेहानाबादमध्ये घडलेल्या सत्यघटनेमागचे धागेदोरे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या वेब सीरीजमधून करण्यात आला आहे व तो काही अंशी सफल झाला आहे. कथेतील ट्विस्ट चक्रावून टाकण्यात यशस्वी ठरतात. कस्तुरी-अभिमन्यूचं प्रेम रंगवण्यात दिग्दर्शकाला यश आलं असलं, तरी यातील अनेक प्रसंगांची पुनरावृत्ती टाळता आली असती. नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल मात्र अत्यंत त्रोटक चित्रण करण्यात आलं आहे. दीपक कुमारच्या मानसिकतेतून ते काही प्रमाणात समजत असलं, तरी ते परिपूर्ण नाही. नक्षलवाद्यांनी एका शहरावर केलेला हल्ला ही मूळ घटनाही अत्यंत थोडक्यात उरकण्यात आली आहे व तो संघर्षही पुरेसा ठसत नाही. कथेचा शेवट अतार्किक असून, तो केवळ पुढच्या भागाच्या तयारीसाठी केल्यानं जाणवतं व त्यामुळं मूळ कथा मार खाते.

अभिनयाच्या आघाडीवर सर्वच कलाकारांची कामगिरी देखणी झाली आहे. ऋत्विक भौमिकनं प्राध्यापकाची अनेक पैलू असलेली भूमिका छान रंगवली आहे. शेवटच्या काही भागांत त्याला अधिक संधी आहे व ती त्यानं दवडलेली नाही.

हर्षिता गौरनंही प्रेमिका ते प्रियकराला साथ देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी कस्तुरी साकारताना कौशल्य पणास लावलं आहे. परमब्रत चटर्जीनं साकारलेला नक्षलवादी शहारे आणतो. शांत आणि संयत भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्यानं नकारात्मक भूमिकाही ताकदीनं साकारू शकतो, हे दाखवून दिलं आहे. रजत कपूरनं साकारलेला राजकारणी परफेक्ट. इतर अभिनेत्यांनीही चांगली साथ दिली आहे. एकंदरीतच, टोकदार रोमान्स असलेली ही कथा एकदा पाहण्यासारखी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.