ऑन स्क्रीन : सिर्फ एक बंदा काफी है : खणखणीत ‘वाजलेला’ बंदा!

आपल्या देशात लोकांना आधार देऊन त्यांचं जगणं सुसह्य करणाऱ्या बाबांबरोबरच भोंदू बाबांचीही चलती आहे.
movie sirf ek banda kafi hai
movie sirf ek banda kafi haisakal

आपल्या देशात लोकांना आधार देऊन त्यांचं जगणं सुसह्य करणाऱ्या बाबांबरोबरच भोंदू बाबांचीही चलती आहे. जगण्याच्या लढाईत कंबरडं मोडलेल्यांना थातूर-मातूर सल्ले देऊन, त्यांच्या खिशाला चाट देऊन नको त्या गोष्टी करणाऱ्या या बाबांचा पर्दाफाश कधीतरी होतोच. अशाच एका बाबाच्या आयुष्याची चिरफाड करणारा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट भोंदू बाबांची कार्यपद्धतीची पोलखोल करतो.

लोकांकडूनच पैसे उकळून ऐषोआरामाचं जीवन जगणाऱ्या, समाजसेवेचा बुरखा पांघरून महिलांवर अत्याचार करणाऱ्या बाबाविरुद्ध एका सामान्य वकिलानं दिलेल्या लढ्याची ही सत्यकथा तुम्हाला खिळवून ठेवते, विचार करायला भाग पाडते. दिग्दर्शक अपूर्व सिंह कार्की यांनी कथा कुठंही भरकटणार नाही याची घेतलेली काळजी व मनोज वाजपेयीचा सर्वांगसुंदर अभिनय यांच्या जोरावर चित्रपट अविस्मरणीय ठरतो.

‘सिर्फ एक बंदा काफी है’ची कथा दिल्लीत सुरू होते. एक तरुणी पोलिस स्टेशनमध्ये आपल्यावर झालेल्या अत्याचारांची तक्रार करण्यासाठी दाखल होते. तिचे आई-वडील, ती स्वतः एका बाबाचे भक्त आहेत व जोधपूरमधील आश्रमात तिला भूतबाधा झाल्याचा बनाव करून बाबा आपल्या कुटीमध्ये बोलावतो; तिच्यावर अत्याचार केले जातात. विश्‍वासघात झालेली ही युवती मोठ्या धीरानं तक्रार दाखल करते. जोधपूरच्या न्यायालयात खटला दाखल होतो.

बाबा स्वतःला वाचण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर सुरू करतो. मुलगी अल्पवयीन असूनही खोटी कागदपत्रे दाखल केली जातात. मुलीची बाजू मांडणारा वकील पैशांसाठी विकला जातो, मात्र पोलिस या कुटुंबाला एक प्रामाणिक वकील पी. सी. सोलंकी (मनोज वाजपेयी) याच्याकडं जायला सांगतात. आता हा सामना सोलंकी विरुद्ध बाबा असा रंगतो.

नामांकित वकील बाबाला सोडवण्यासाठी आपला अनुभव पणाला लावतात, मात्र अनेक दबाव, धमक्या, प्राणघातक हल्ले यांना न जुमानता सोलंकी मुलीला न्याय मिळवून देतात. व्यक्ती कितीही मोठी असली, तिचं काम कितीही लोकोपयोगी असलं, तरी तिला कायदा हातात घेण्याची, अत्याचार करण्याची मुभा असूच शकत नाही, हे कथा ठळकपणे अधोरेखित करते.

चित्रपटाची कथा कोर्टरूम ड्रामा आहे व अशा कथा एकसुरी होण्याची धोका असतो, मात्र दिग्दर्शकानं खिळवून ठेवणाऱ्या प्रसंगांची निवड करत कथा प्रवाही ठेवली आहे. बाबाकडून मुलीवर झालेला अत्याचार हा कथेचा मूळ धागा कायम राहतो. बाबाच्या इतर ‘लीला’ दाखवून कथा टोकदार करण्याचा मोह टाळलेला दिसतो. वकील सोलंकीचं त्याची आई आणि मुलाशी असलेलं नातं दाखवून दिग्दर्शकानं कथेला वेगळे आयाम दिले आहेत. बाबा विरुद्ध वकील या संघर्षातील सर्व पैलू नेमके टिपल्यानं प्रेक्षक खिळून राहतो. या खटल्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता होती व तिचा निकालही सर्वांना माहिती असल्यानं कथेचा शेवट करताना त्यातील तांत्रिक मुद्द्यांचं नेमंक विश्‍लेषण करण्यात आलं आहे.

मनोज वाजपेयीनं साकारलेली वकिली सोलंकीची भूमिका कथेचा कणा आहे. प्रामाणिक, जिद्दी, भावुक या पैलूंबरोबरच प्राणघातक हल्ला झाल्यावर वाटणारी भीतीही त्यानं छान टिपली आहे. आपला मुद्दा मांडताना कोणताही अभिनिवेश न बाळगता थेट कायदा काय सांगतो, हे स्पष्ट करणारा वकील मनोज वाजपेयीनं भन्नाट उभा केला आहे. बिपीन शर्मानं साकारलेला आरोपीचा वकीलही तोडीस तोड झाला आहे. आद्रिजा सिन्हानं साकारलेली पीडित मुलीची छोटी भूमिका लक्षात राहते. चित्रपटाचं संगीतही श्रवणीय आहे.

हा चित्रपट ‘झी फाइव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com