ऑन स्क्रीन : पेट पुराण : पालकत्वाची ‘पाळीव’ त्रेधातिरपीट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pet Puran Movie

‘पेट पुराण’ची कथा आहे शेफचं काम करणारा अतुल (ललित प्रभाकर) आणि कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या आदिती (सई ताम्हनकर) या जोडप्याची.

ऑन स्क्रीन : पेट पुराण : पालकत्वाची ‘पाळीव’ त्रेधातिरपीट!

घरात लहान मूल असणाऱ्यांची पाळीव प्राणी हा अत्यंत संवेदनशील विषम! दर महिन्याला लहान मुलांना एखादा प्राणी पाळण्याचं भरतं येतं आणि तो पाळणं कसं अशक्य आहे, हे सांगताना पालकांना नाकीनऊ येतात. मात्र, मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या एखाद्या जोडप्याला ही हुक्की आली तर? ‘पेट पुराण’ या ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित सोनी लिव्हवर प्रदर्शित मालिकेत ही धम्माल चितारण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांना घेऊन केलेली ही पूर्ण सिरीज, सई ताम्हनकर, ललित प्रभाकर यांच्यासह सर्वच कलाकारांनी (प्राण्यांसह) मोठ्या कष्टानं साकारलेल्या भूमिका, पालकत्वाचे खळखळून हसवणारे किस्से, उत्सुकता वाढवत नेणारी कथा यांमुळं ही सिरीज पाहणं हा लक्षात राहणारा अनुभव ठरतो.

‘पेट पुराण’ची कथा आहे शेफचं काम करणारा अतुल (ललित प्रभाकर) आणि कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या आदिती (सई ताम्हनकर) या जोडप्याची. लग्नाला काही वर्षं उलटून गेली तरी त्यांच्या घरात पाळणा हललेला नाही व त्याबद्दल त्यांना घरच्यांबरोबरच मित्र-मैत्रिणींकडूनही टोपणे सहन करावे लागतात. या त्रासापासून वाचण्याचा पर्याय ते शोधत असतानाच अतुलच्या गोदाक्का नावाची मांजर पाळणाऱ्या आत्येभावाला काही कामानिमित्त परगावी जावं लागतं. तो गोदाक्काची जबाबदारी अतुल-आदितीवर सोपवतो. गरोदर असलेल्या गोदाक्काला सांभाळण्याचं दिव्य पार पाडत असताच दोघांनाही आपली बालपणीची पाळीव प्राणी पाळण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याची जाणीव होते. अतुलला कुत्रा आवडत असतो, तर आदितीला मांजर. आता नक्की कोणता प्राणी पाळायचा यावर खलबतं होतात, कुत्रा पाळण्याचं निश्‍चित झाल्यावर तो कोणत्या ब्रीडचा असावा यावर कथ्थाकुट होते, कर्मधर्मसंयोगानं त्यांच्या घरात मांजर व कुत्रा हे दोघंही प्राणी येतात आणि मग धमाल सुरू होते. सोसायटीमध्ये भाडणं होतात, मुलांना मुलाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दोघांच्या आया घरी येतात, त्यांच्यापाठोपाठ केअर टेकर येतो आणि ही धमाल वाढतच जाते...

या वेबसिरीजची कथा अत्यंत वेगळी आहे. पूर्णपणे प्राण्यांचे पालनपोषण असा विषय घेतल्यानं व त्याला मुलांच्या संगोपनाची जोड दिल्यानं धमाल येते. अतुल-आदितीचं प्राणी पाळणं, ते कंपनीतील सहकाऱ्यांपासून लपवणं, दोघांच्या आयांचं प्राण्यापेक्षा लहान मूल ‘पाळणं’ किती सोपं आहे हे समाजावून सांगणं, सोसायटीतील बेरकी लोकं या सगळ्याच गोष्टी जमून आल्या आहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि माजी लष्करी अधिकाऱ्याकडे (सतीश आळेकर) अतुल-आदिती कुत्रा पाळण्याची परवानगी मागण्यासाठी जातात, हा प्रसंग तुफान विनोदी झाला आहे. कथेचा शेवट थोडा वेगळा आणि तुफान हास्याच्या पार्श्‍वभूमीवर थोडा हळवा करण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.

सई ताम्हनकर आणि ललित प्रभाकर यांची केमिस्ट्री जबरदस्त झाली आहे. विनोदी प्रसंगांतलं दोघांचंही टायमिंग छान जमलं आहे. या नवीन व वेगळ्याच अनुभवातून जाताना येणारे अनुभव आणि त्यांतील आश्‍चर्य दोघांनीही छान टिपलं आहे. प्राण्यांना पाळताना उडालेली त्रेधातिरपीट साकारताना या दोघांनी कमाल केली आहे. इतर सर्वच कलाकारांनी त्यांना तोलामोलाची साथ दिली आहे.

एकंदरीतच, पालकत्त्वाची ही ‘पाळीव’ धमाल एकदा अनुभवावी अशीच...