ऑन स्क्रीन : पुष्पा : तुफान मनोरंजनाचा ‘बुस्टर डोस’

साऊथच्या सिनेमाची एक गंमत असते. सिनेमाची कथा कितीही घिसीपिटी असली, तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणं आणि अतरंगी स्टाइल व संवादांमुळं पोटभर मनोरंजन यात ते कुठंही कमी पडत नाहीत.
Allu Arjun
Allu ArjunSakal
Summary

साऊथच्या सिनेमाची एक गंमत असते. सिनेमाची कथा कितीही घिसीपिटी असली, तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणं आणि अतरंगी स्टाइल व संवादांमुळं पोटभर मनोरंजन यात ते कुठंही कमी पडत नाहीत.

साऊथच्या सिनेमाची एक गंमत असते. सिनेमाची कथा कितीही घिसीपिटी असली, तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणं आणि अतरंगी स्टाइल व संवादांमुळं पोटभर मनोरंजन यात ते कुठंही कमी पडत नाहीत. सुकुमार दिग्दर्शित व अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट नेमकं हे साध्य करतो. धडाकेबाज ॲक्शन, भन्नाट गाणी, नृत्यं, संवाद, अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी या सर्वच आघाड्यावर चित्रपट उजवा आहे. तीन तासांची लांबी असल्यानं चित्रपट थोडा कंटाळवाणा होतो, मात्र कलाकारांच्या कामगिरीमुळं ही उणीव भरून निघते.

‘पुष्पा’ची कथा आंध्र प्रदेशातील चित्तोर जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरू होते. पुष्पा (अल्लू अर्जुन) हा जंगलातील रक्त चंदनाच्या तस्करांबरोबर हमाल म्हणून काम करणारा साधा युवक. मात्र, त्याचं डोकं भन्नाट चालत असतं आणि समोरच्याची पुढची चाल त्याला ताबडतोब समजत असते. याच्याच जोरावर तो अल्पावधीत तस्करांमध्ये विख्यात होतो. आपल्या आईला सांभाळत असतानाच अनौरस मुलगा असल्यानं दुःखही त्याला झेलावं लागतं. गावातील तरुणी शिवाली (रश्‍मिका मंदाना) त्याला आवडू लागते. तस्करांशी हातमिळवणी करीत तो त्यांच्याकडून चार टक्के कमिशन घेत पैसा व नाव कमवायला सुरवात करतो. मात्र, तस्करांतील गटबाजीचा फटका पुष्पालाही बसू लागतो. शेवटी दोन गटांतील संघर्षाचा फायदा पुष्पालाच मिळतो व इतर तस्करांचा बीमोड करीत तो गादीवर बसतो. शिवालीशी त्याचं लग्नही ठरते, मात्र त्याचवेळी भंवरसिंग शेखावत (फहाद फासिल) हा नवा पोलिस अधिकारी परिसरात दाखल होतो आणि त्याचा पुष्पाशी संघर्ष सुरू होतो. इथं दुसऱ्या भागाच्या कथेची बेगमी करीत चित्रपट संपतो.

चित्रपटाच्या कथेत फारसं नावीन्य नाही, मात्र जबरदस्त मांडणी करण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. लाल चंदनाची तस्करी, त्याची वाहतूक व साठवणूक यांचे थरारक प्रसंग पेरत कथा वेग पकडते. हळूहळू जम बसवणारा पुष्पा प्रस्थापितांच्या डोळ्यात खूप लागताच संघर्ष पेटतो. दिलेला शब्द पाळणारा व त्याचवेळी स्वतःची इभ्रत जपणाऱ्या पुष्पाचा चढता आलेख कथेत नेमकेपणानं येतो. त्यासाठी निवडलेले प्रसंग भन्नाटच. पोलिसांना २०० कोटी रुपयांचं चंदन लपवून ठेवल्याची टीप मिळताच ते धाड टाकायला रवाना होतात. त्यावेळी हे चंदन वाचवण्यासाठी नदीचा प्रवाह आणि धरणाचा पुष्पानं केलेला उपयोग हा प्रसंग चित्रपटाचा कळसाध्याय ठरतो. पुष्पा व शिवालीच्या प्रेमाचे प्रसंग छान रंगले आहेत, मात्र ते पेरल्यासारखे येत राहतात. भंवरसिंग शेखावतच्या एन्ट्रीनंतर कथा मोठा ट्विस्ट घेते आणि चित्रपटाच्या पुढच्या भागात काय धमाका होणार, याचा अंदाजही येतो.

अल्लू अर्जुननं आपल्या जबरदस्त स्टाइलच्या जोरावर चित्रपट ओढून नेला आहे. डावा खांदा वर करीत बोलण्याची पद्धत, हाणामारी करतानाच जोश, प्रेमप्रसंग व विनोदाचं टायमिंग या सर्वच बाबतीत तो प्रेक्षकांना खूष करून टाकतो. त्याच्या नृत्याच्या अतरंगी स्टाइलवर प्रेक्षक फिदा होतात. विशेषतः, एक पाय घासत केलेली नृत्यांची स्टेप भन्नाटच. रश्‍मिका मंदानानं पुष्पाच्या प्रेयसीच्या भूमिकेत छान रंग भरले असले, तरी तिला फारशी संधी नाही. फहाद फासिलचे याआधीचे चित्रपट पाहिलेल्यांना त्याच्या अभिनयाच्या ताकदीचा अंदाज आहे. या भागातील अत्यंत छोट्या भूमिकेत त्यानं भरलेले रंग अविस्मरणीय.

एकंदरीतच, सर्वच आघाड्यांवर तुफान कामगिरी करणारा हा मनोरंजनाचा ‘बुस्टर डोस’ घेतलाच पाहिजे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com