ऑन स्क्रीन : द रेल्वे मेन : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या त्यागाची सत्यकथा

भूतकाळात घडलेल्या दुर्घटनेचा यथासांग मागोवा घेणाऱ्या वेब सिरीज अनेकदा पाहण्यात आल्या आहेत.
The Railway Men web series
The Railway Men web seriesSakal

भूतकाळात घडलेल्या दुर्घटनेचा यथासांग मागोवा घेणाऱ्या वेब सिरीज अनेकदा पाहण्यात आल्या आहेत. विशेषतः चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुर्घटनेवरील वेब सिरीज खूपच गाजली होती. आपल्या देशातील भोपाळ शहरातील रासायनिक कारखान्यात घातक वायू उत्सर्जित झाल्याने मोठी दुर्घटना घडली होती व तिचा मोठा ऊहापोह आतापर्यंत झाला आहे.

या घटनेदरम्यान रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अतुलनीय साहस दाखवत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट दिग्दर्शक शिव रवैल यांनी ‘द रेल्वे मेन’ या वेब सिरीजमधून मांडली आहे. आर. माधवन, जुही चावला, के. के. मेनन, दिव्येंदू शर्मा, बाबिल खान, मंदिरा बेदी आदी कलाकारांचा अभिनय आणि उत्कंठावर्धक गोष्टीच्या जोरावर ही वेब सिरीज खिळवून ठेवते. मात्र, अनावश्‍यक उपकथानकांमुळं काही ठिकाणी निराशाही हाती लागते.

‘द रेल्वे मेन’ची कथा भोपाळ दुर्घटनेच्या रात्री सुरू होते. विषारी वायू हवेत पसरल्यानं भोपाळ रेल्वे स्टेशनवर हाहाकार उडतो. परिस्थितीचं गांभीर्य स्टेशन मास्तर इफ्तिकार सिद्दीकीच्या (के. के. मेनन) लक्षात येतं. तो सर्व प्रवाशांना वेटिंग रूममध्ये आणतो. कमरुद्दीन (दिव्येंदू शर्मा) हा तोतया पोलिस रेल्वेची तिजोरी लुटण्यासाठी स्टेशनवर आलेला असतो, मात्र आता त्याला पोलिसाची भूमिका बजावण्याशिवाय पर्याय नसतो.

रासायनिक कंपनीत पूर्वी काम केलेला व नुकताच रेल्वेत रुजू झालेला इमाद रियाज (बाबिल खान) व इफ्तिकार मिळून प्रवाशांना शहरापासून दूर नेण्याची योजना आखतात. दुसरीकडं, जवळच्या इटारसी रेल्वे स्टेशनवर वायू दुर्घटनेची माहिती रेल्वेचे जनरल मॅनेजर रती पांडे यांना (आर. माधवन) समजते. रेल्वेच्या प्रशासकीय अधिकारी राजेश्‍वरी (जुही चावला) यांच्याशी पांडे चर्चा करतात आणि रेल्वे मंत्रालयानं भोपाळकडं जाणाऱ्या सर्व रेल्वे थांबवायला सांगितलेल्या असूनही जीवनावश्‍यक औषधे घेऊन भोपाळकडं स्वतः रेल्वेचे सारथ्य करीत रवाना होतात.

गोरखपूरहून निघालेली एक रेल्वे भोपाळ स्टेशनवर पोचण्याच्या बेतात असते व तिचं काय करायचं हीसुद्धा मोठी समस्या असते. त्यात इंदिरा गांधींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निघालेले तरुण ही रेल्वे मध्येच थांबवतात. या सर्वच आघाड्यांवर आता मोठा संघर्ष सुरू होतो. काही जण लोकांचे जीव वाचवण्यासाठी झटत असतात, तर काही जीव घेण्यासाठी. अनेकांनी केलेला त्याग, लोकांसाठी नियम धाब्यावर बसवून केलेले काम, आपल्या मूळ स्वभावाला मुरड घालत घेतलेले निर्णय यांमुळं अनेकांचे जीव वाचतात...

वेब सिरीजची कथा भोपाळमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असल्यानं त्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र, यावेळी रेल्वेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल फारच थोड्यांना माहिती असावी. गॅस गळतीच्या मूळ घटनेबद्दल पहिल्या भागात अत्यंत त्रोटक माहिती देण्यात आली आहे, मात्र त्यानंतर सर्व घटना रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या बोगींमध्येच घडतात.

अशी गंभीर घटनांत समयसूचकता आणि त्याग यांतून खूप मोठ्या गोष्टी घडवता येतात आणि हेच सांगण्याचा प्रयत्न कथेत होतो. घातक गॅस नाका-तोंडात गेल्यास लगेच किंवा काही काळानंतर मृत्यू नक्की आहे, हे माहिती असून, रेल्वेच्या लोकांनी केलेले प्रयत्न हा कथेचा गाभा आहे आणि दिग्दर्शकानं तो छान टिपला आहे. मात्र, इंदिरा गांधी हत्याकाडांचा संदर्भ घेत दाखवलेले प्रसंग अनावश्‍यक वाटतात.

आर. माधवन रेल्वे अधिकाऱ्याच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. के. के. मेननच्या वाट्याला आलेली भूमिका खूप मोठी आहे आणि ती त्यांनी कष्टानं साकारली आहे. दिव्येंदू शर्मा, बाबिल खान यांचा वावर अत्यंत सहज आहे. इतर सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com