ऑन स्क्रीन : ट्रायल बाय फायर : शत्रुराष्ट्राच्या नाचक्कीची प्रेरणादायी सत्यकथा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trial by fire movie

देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत देशप्रेम, पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची केलेली नाचक्की, धारदार संवाद यांनी ओतप्रोत भरलेला ‘मिशन मजनू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ऑन स्क्रीन : ट्रायल बाय फायर : शत्रुराष्ट्राच्या नाचक्कीची प्रेरणादायी सत्यकथा!

देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत देशप्रेम, पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची केलेली नाचक्की, धारदार संवाद यांनी ओतप्रोत भरलेला ‘मिशन मजनू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनय, छायाचित्रण, ॲक्शन या आघाड्यांवर बरी कामगिरी करणारा हा शंतनू बागची दिग्दर्शित चित्रपट कथेच्या पातळीवर फसला आहे. सैन्याच्या वेशात नसलेल्या, मात्र पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की करण्यात यशस्वी ठरलेल्या ‘रॉ’च्या गुप्तहेरांची ही सत्यकथा फार निराश करणार नाही.

‘मिशन मजनू’ची कथा सुरू होते १९७०च्या दशकात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आण्विक चाचणी करून जगाचं लक्ष भारताकडं वेधलं आहे आणि पाकचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची पंचाईत झाली आहे.

काहीही करून त्यांना आण्विक चाचणी करून भारताला शह द्यायचा आहे आणि याची कुणकूण लागल्यानं भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’ कामाला लागली आहे. अमनदीप सिंह (सिद्धार्थ मल्होत्रा) पाकिस्तानात दाखल झाला असून, तारिक या नावानं वावरतो आहे. ही भूमिका वठवताना त्यानं नसरीन (रश्‍मिका मंदाना) या पाकिस्तानी मुलीशी लग्नही केलं आहे. रमण सिंग (कुमुद मिश्रा) आणि अस्लम (शरीब हाश्‍मी) हे आणखी दोन अंडरकव्हर एजंट अमनदीपला मदत करीत असतात. पाकिस्तान चोरीच्या मालावर आणि आयात शास्त्रज्ञांच्या मदतीनं गुप्त ठिकाणी अणुचाचणी घेण्याच्या तयारीत असतो आणि हा कट जगासमोर आणण्यासाठी हे गुप्तहेर जिवाचं रान करतात. या कामाचं काय होतं, नसरीन व अमनदीपचं पुनर्मिलन होतं का अशा अनेक प्रश्‍नाची उत्तर चित्रपट देतो.

चित्रपटाच्या कथेत नावीन्य असलं, तरी सातत्याचा अभाव आहे. भारत व पाकिस्तानातील नेत्यांची थेट नावं आणि पेहराव घेऊन उभी केलेली पात्रं कथा मनोरंजकही बनवतात. मात्र, काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेताना कथा वाहवत जाते. यात पाक सैन्याचे भारतीय गुप्तहेरांना पकडण्याच्या प्रयत्नांचे प्रसंग हास्यास्पद ठरतात. अशा कथांचा शेवट माहिती असल्यानं तिचा प्रवास मनोरंजक आणि पटणारा होणं आवश्‍यक ठरतं आणि दिग्दर्शक इथंच कमी पडतो. एक बरा चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळत असलं, तरी तो आणखी चांगला झाला असता, असं वाटत राहतं.

सिद्धार्थ मल्होत्रानं अमनदीपची भूमिका झोकात साकारली आहे. पाकिस्तानी असल्याचं भासवत, त्यांच्या भाषेत बोलत भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतानाची कसरत त्यानं छान साकारली आहे. हाणामारीचे प्रसंग तुलनेनं कमी आले असले, तरी त्याची देहबोली भाव खाऊन जाते. रश्‍मिका मंदानाला फारशी संधी नसली, तरी तिनं नसरीनची तगमग छान उभी केली आहे. कुमुद मिश्रा नेहमीच्या सफाईनं रमण सिंग उभा करतात. शरीब हाश्मी छोट्या भूमिकेत धमाल करतो. झाकिर हुसेन या आणखी एका गुणी कलाकाराच्या वाट्याला छोटी भूमिका आली असली, तरी त्यांनी ती ताकदीनं साकारली आहे.

एकंदरीतच, देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारा, शत्रुराष्ट्राच्या नाचक्कीची प्रेरणादायी गोष्ट सांगणारा हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

(हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.)