Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Tilekar shared post about marathi historical movie he criticize

Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका

दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) हे कायमच समाजातील ज्वलंत विषय आणि समस्यांवर भाष्य करत करतात. अनेकदा त्यांच्या विचारांना ट्रॉलही केले जाते. पण त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकदा बदल घडतानाही दिसून आले आहे. मग तो मनोरंजन विश्वातील कंपूशाहीचा मुद्दा असो की जुन्या अभिनेत्रींना सन्मान देण्याचा मुद्दा असो. ते नेहमीच समाज माध्यमावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रिकामे चित्रपटगृह आणि मराठी सिनेमा यावर भाष्य केलं होतं. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उचलून धरला होता तर आता त्यांनी थेट ऐतिहासिक चित्रपटांविषयी भाष्य केले आहे.

(Mahesh Tilekar shared post about marathi historical movie he criticize)

सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे पेव आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मध्यवर्ती ठेवून एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'सरसेनापती हंबीरराव', 'हर हर महादेव', 'पावनखिंड', 'शेर शिवरज' असे अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपट येऊन गेले. त्यात अजून भर पडतच आहे. पण बऱ्याचदा ऐतिहासिक चित्रपटांची मांडणी करताना त्यात अनेक बदल केले जातात. काहीवेळा तर मूळचा इतिहासच हलवला जातो असे अनेक प्रकार घडले आहेत. यावरच आता महेश टिळेकर यांनी सडेतोड पोस्ट लिहून लक्ष वेधले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर यांच्यात मोठा राडा..

ते म्हणतात, 'खरा इतिहास वाचून समजून घ्यावा.. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सुचवले की मी गाव तसं चांगलं,वन रूम किचन,हवाहवाई सारखे कौटुंबिक, विनोदी सिनेमे केले आता पुढचा सिनेमा ऐतिहासिक करावा आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर असावा. यावर मी त्याला माझं स्पष्ट मत सांगितलं. ऐतिहासिक सिनेमा तो ही महाराजांच्यावर करायचा तर ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत माझ्यात नाही आणि बॉलिवूड मध्ये जसं हिरोची एन्ट्री हवेतून उडी मारत गुंडांना मारहाण करत होते.तशी ऐतिहासिक पात्रे दात ओठ खात , बेंबीच्या देठापासून किंचाळत सिनेमातून दाखवणं मनाला पटत नाही.लोकांना आकर्षित करण्यासाठी गल्ला भरण्यासाठी ऐतिहासिक सिनेमात मसाला भरून पुढच्या पिढीला सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा खरा इतिहास पुस्तकातून वाचून समजावा म्हणून मी इतरांना पुस्तके भेट देईन.'

हेही वाचा: Dhondi Champya:रेडा- म्हशीची लव्हस्टोरी लवकरच मोठ्या पडद्यावर! येतोय 'धोंडी चंप्या'

'माझं सगळं ऐकून घेऊन मित्राने पुन्हा सल्ला दिला की मला जर चांगला फायनान्स मिळाला तर काय हरकत आहे असे सिनेमे करायला... पण फायनान्स मिळतोय म्हणून स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास बदलून केवळ पैसे मिळवण्यासाठी धंदाच करण्याच्या हेतूने ऐतिहासिक सिनेमा केला तर लोकांच्या शिव्या मिळतीलच.पण जेंव्हा जेंव्हा कुठेही महाराजांची प्रतिमा दिसेल, त्यांचे चित्र समोर येईल तेंव्हा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी ,त्याचा पराक्रम, इतिहासाशी मी प्रतारणा केल्याचं शल्य मला कायम बोचत राहणार, ती जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी मरेपर्यंत न भरून येणारी असेल.'

'सिनेमॅटिक लिबर्टी घेत धंदेवाईक सिनेमा करून पैसा कमवणे एकवेळ मला मान्य आहे पण खोटा इतिहास ,खोट्या घटना दाखवून सिनेमा करून आपला मोठेपणा मिरवत लोकांचे पैसे लुटून त्यांच्या नजरेत दरोडेखोर म्हणून आपली ओळख आपणच का निर्माण करून द्यावी?महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिलं असतं की कडेलोट केला असता याची क्षणभर कल्पना करून पहा.'

'माझ्या मित्राला माझे हे म्हणणे पटले आणि त्याच्या मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख व्हावी म्हणून तो त्यांना पुस्तकं वाचायला देणार आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वाचन करण्याचीही सवय या निमित्तानं आपण सर्वांनी करून द्यायला काय हरकत आहे.' अशी महेश टिळेकर यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.

टॅग्स :Marathi Movies