बॉलिवूडमध्ये जीवघेण्या स्पर्धेत जीव गुदमरतोय़!

महेश टिळेकर, निर्माता दिग्दर्शक
Sunday, 14 June 2020

टॅलेंट असून स्ट्रगल करूनही काम मिळत नाही, तेंव्हा इथल्या जीवघेण्या स्पर्धेत जीव गुदमरतो.

सुशांत सारखा कलाकार यश,पैसा,प्रसिध्दी मिळूनही आत्महत्या करून जीवन संपवतो तेंव्हा सर्वांनाच दुःख होऊन प्रश्नाचं वादळ घोंगावू लागतं की इतकं सगळं मिळूनही असं काय त्याला कमी होतं,दुःख होतं म्हणून त्याने मृत्युला जवळ करावं?  सिनेमा,मनोरंजन क्षेत्रात काम करताना हळूहळू कळू लागतं की हे जग किती आभासी आणि फिल्मी आहे. अनेकदा टॅलेंट असून स्ट्रगल करूनही काम मिळत नाही, तेंव्हा इथल्या जीवघेण्या स्पर्धेत जीव गुदमरतो. अनेकदा हाताशी आलेली संधी इथल्या राजकारणामुळे हातोहात निसटून जाते तेंव्हा त्या संधीच्या जोरावर पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि तो कलाकार सैरभैर होतो.

झगमगत्या दुनियेत काम करत असताना इथल्या ग्लॅमरची इतकी सवय होऊन जाते की ग्लॅमरची चमक धमक हाच खरा प्रकाश आहे असं काहींना वाटू लागतं आणि मग जेंव्हा ही चमक कमी होत जाते तेंव्हा सूर्य प्रकाश पाहूनही काहींना आपण अंधारात गेल्याची भीती जीव खायला उठते.

या सिनेमा लाईनमध्ये काम करताना अवती भवती वावरणाऱ्या,खोटी स्तुती करून आपल्याला हवेत तरंगत ठेवणाऱ्या व्यक्तींना आपण मित्र समजतो आणि तिथेच मोठी चूक करतो.कारण बरेचदा ते आपले फक्त सहकलाकार किंवा सहकारी आहेत हे सत्य मान्य न करता त्यांना आपले जिवलग मित्र समजून चूक करतो.पण अनेकदा हे मित्र आपल्याकडे काम नाव आणि पैसा आहे, आपल्याकडून त्यांना फायदा आहे म्हणूनच आपल्याशी गोड बोलून मैत्री टिकवत असतात आणि जेव्हा आपल्याकडचे काम कमी होते  किंवा आपल्याकडून त्यांना होणाऱ्या फायद्याचा प्रवाह कमी होतो तेंव्हा ही मंडळी गायब होतात जेंव्हा त्यांचे खरे रूप कळल्यावर तो धक्का सहन होत नाही. आपल्याकडे पैसा,नाव नसतानाही कितीजण आपल्या बरोबर होते,अडचणीत किती मदतीला धाऊन आलेत यावरूनच आपल्या खऱ्या मित्रांची संख्या ठरवावी.काहींशी फक्त व्यवसायिक ओळख ठेवावी तिथे मैत्री आणूच नये नाहीतर खूप त्रास होतो. आजूबाजला,पार्टी करायला जमणारी गर्दी पाहून ही आपली माणसं असा चुकीचा समज करून घेऊ नये.भले दोनच मित्र असावेत पण ते खरे असावेत आणि खरे मित्र कोण हे अनुभव घेऊनच ठरवता येते.

अनेकदा भावनिक गुंतागुंत होऊन कलाकाराचा प्रेमातही विश्वासघात होतो तेंव्हा सगळं संपवून टाकावं असं वाटतं.बरेचदा तुमच्याकडे सातत्याने काम आणि पैसा आहे म्हणून ती व्यक्ती तुमच्या अधिक जवळ येऊन मनापासून प्रेम करत असल्याचे नाटक करीत असते त्या आभासी विश्वात,प्रेमात तो कलाकार इतकं गुरफटून जातो की नंतर स्वार्थी प्रेमाचे रंग दिसायला लागले की आपली दुनिया बेरंग होऊन जाते.

इथे काहीच शाश्वत नाही सगळं क्षणभंगुर आहे हे सातत्याने डोक्यात फिट बसवून ठेवावं आणि इथल्या फिल्मी लोकांमध्ये फक्त  20% व्यक्तीच विश्वास ठेवता येतील अश्या,निस्वार्थ मैत्री करणाऱ्या आहेत याची जाणीव ठेवावी त्यामुळे कुणाला जवळ करायचं कुणापासून चार हात लांब रहायचं हा निर्णय घेणे सोपे जाईल
मनाविरुद्ध गोष्टी घडत गेल्या की मग  दुःख करून घेऊन त्यावर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे अशी समजूत करून घेण्यापेक्षा इथे पावलो पावली विश्वासघात,धोका अडचणी येणार आहेतच पण मी त्यातही सक्षमपणे उभा राहीन असा निर्धार करत माझा मीच राजा मीच माझा मित्र असं समजत आयुष्याचा आनंद घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh tilekar writes after sushant singh rajput suicide