esakal | सेलिब्रिटींच्या 'मालदीव व्हेकेशन'वरून मीम्स व्हायरल

बोलून बातमी शोधा

Bollywood celebs

सेलिब्रिटींच्या 'मालदीव व्हेकेशन'वरून मीम्स व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आता वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. युके, हाँग काँग, कॅनडा, सिंगापूर आणि इराणसारख्या देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. यात आता मालदीवचीही भर पडली आहे. रविवारी रात्री उशिरा ट्विट करत पर्यटन मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली. २७ एप्रिलपासून भारतातून मालदिवला जाणाऱ्या पर्यटकांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मालदिव व्हेकेशनला गेलेले बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा भारतात परतले आहेत.

सोशल मीडियावर टीका आणि मीम्ससुद्धा व्हायरल

इथे लोकांना जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा, अशी टीका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने केली होती. तुमच्यासाठी हे व्हेकेशन असेल, पण संपूर्ण जगात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे असंवेदनशील मूर्ख बनून सोशल मीडियावर तुमच्या सुखी आयुष्याचे फोटो पोस्ट करू नका, अशा शब्दांत लेखिका शोभा डे यांनी फटकारलं होतं. मालदिव व्हेकेशनमुळे टीकेच्या निशाण्यावर असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर आता विनोदी मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत. आता सेलिब्रिटी कोणत्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार, अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली जातेय.

सेलिब्रिटींचं मालदीव व्हेकेशन

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघंही कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेचच मालदिवला फिरायला गेले होते. सारा अली खान, जान्हवी कपूर, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, दिया मिर्झा, समंथा अक्किनेनी, माधुरी दीक्षित, श्रद्धा कपूर हे सेलिब्रिटी मालदीवला फिरायला गेले होते. मालदिव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर सर्वच स्तरांतून टीकासुद्धा झाली.