अजय देवगणची गाडी रोखणाऱ्याला जामिन मंजूर

स्वाती वेमूल
Wednesday, 3 March 2021

वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
 

शेतकरी आंदोलन प्रकरणावरून अभिनेता अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामिन मंजूर करण्यात आला आहे. राजदीप सिंह असं त्या तरुणाचं नाव आहे. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियाद्वारे जामिनाची माहिती दिली. शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले, त्यावरून देशभरात इतकी चर्चा सुरु असताना अजय देवगणने कोणतंच मत का व्यक्त केलं नाही, असा सवाल राजदीपने केला. राजदीपने जवळपास १५ ते २० मिनिटं अजयची गाडी अडवून ठेवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. 

नेमकं काय झालं?
मुंबईतील दिंडोशी परिसरात एका चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. अजय याच शूटिंगला निघाला असताना वाटेत त्याची कार अडवण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अजय त्याच्या कारमध्ये बसलेला दिसत आहे. तर राजदीप नावाचा व्यक्ती त्याच्याशी बोलतोय. देशभरात शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली असताना तुम्ही त्यावर का व्यक्त होत नाही, असा सवाल तो अजयला करत होता. जवळपास १५ ते २० मिनिटं हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर राजदीपला अटक करण्यात आली. आता त्याला जामिन मंजूर करण्यात आला आहे. 

नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाविषयी जेव्हा आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केलं, तेव्हा हे प्रकरण आणखीनच चिघळलं. त्यानंतर अजय देवगण, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या सेलिब्रिटींनी देशाच्या एकीचा भंग करू नका, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Arrested For Blocking Ajay Devgn Car Released On Bail