जिजामाता मालिकेत 'या' आहेत  गोदावरीबाई  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manasi Pathare Acting Godavaribai Role In Jijamata Serial

कला अकादमी गेली नऊ वर्षे सिनेनाट्य क्षेत्राचं प्रोफेशनल प्रशिक्षण देत आहे. अकादमीत दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना तयार केले जाते.

जिजामाता मालिकेत 'या' आहेत  गोदावरीबाई 

रत्नागिरी - रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला अकादमीत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग करून सिने - नाट्य क्षेत्रातील प्रवास सोपा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. अकादमीची विद्यार्थिनी मानसी पाथरे हिची सोनी मराठी वाहिनीवरील "स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेसाठी निवड झाली आहे. 

कला अकादमी गेली नऊ वर्षे सिनेनाट्य क्षेत्राचं प्रोफेशनल प्रशिक्षण देत आहे. अकादमीत दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना तयार केले जाते. दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सिने-नाट्य क्षेत्रातील प्रवास सोपा व्हावा, त्यांना मुंबई वा अन्य कुठेही कोणत्याही प्रॉडक्‍शनमधून काम करणं सहज, सोपं वाटावं म्हणून अकादमी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करून मुलांना घडवत असते. त्यामध्ये प्रायोगिक व्यावसायिक नाटक, वेबसिरीज, सिनेमा व शॉर्ट फिल्म आदी वेगवेगळे प्रयोग करून मुलांना त्या योग्यतेचे बनवले जाते आणि या सर्वांची पोचपावती म्हणजे "स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेमध्ये मानसी विक्रम पाथरे हिची झालेली निवड. 

..हे मानसी पाथरेने दाखवून दिले 

रत्नागिरीत राहूनही या क्षेत्रात काम शोधू पाहणाऱ्या कलाकारांना आता यातून प्रेरणा मिळून एक नवी वाट निर्माण होईल. एक कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात आपले पाय रोवून उभा राहू शकतो, हे मानसी पाथरेने दाखवून दिले आहे. रत्नागिरीतील रसिक आणि रंगकर्मींकडून तिचे कौतुक होत आहे. 

ऑडिशन घेऊन निवड 

मानसीने अकादमीमधून दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला व ऍलुमनी बॅचमध्ये असतानाच तिने मुंबईच्या प्रॉडक्‍शनला आपल्या प्रोफाईल पाठविल्या आणि त्यातूनच ऑडिशन घेऊन तिची निवड झाली. जगदंब क्रिएशनची स्वराज्य जननी जिजामाता ही सोनी मराठीवरील मालिका असून या मालिकेमध्ये "गोदावरीबाई" या जिजामातेच्या जावेची भूमिका करत असून गोदावरीबाई हे या मालिकेतील महत्वाचे पात्र आहे. सध्या तिचे शूटिंग गोरेगाव फिल्म सिटी मुंबई येथे सुरू आहे.