टेनेट : आकलनाच्या पलीकडचा थरार 

मंदार कुलकर्णी 
Friday, 18 December 2020

एखादी गुंतागुंतीची कल्पना किती भव्य पद्धतीनं पडद्यावर साकार करता येऊ शकते याचा अनुभव घेण्यासाठी आणि अर्थातच नोलॉनप्रेमींसाठी हा चित्रपट नक्कीच मस्ट वॉच. 

ख्रिस्तोफर नोलॉन या जबरदस्त दिग्दर्शकाचा ‘टेनेट’ हा नवा, बहुचर्चित चित्रपट थरारक, रोमांचक आणि खिळवून ठेवणारा आहे यात शंकाच नाही. त्यातली एकेक दृश्यं, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, साहसदृश्यं, कॉम्प्युटर ग्राफिक्स या सगळ्या गोष्टी अव्वल दर्जाच्या आहेत यातही वादच नाही...पण हे सगळं सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी तरी आकलनाच्या अगदीच पलीकडचं आहे. फिजिक्सच्या सगळ्या कल्पनांना नोलॉन महोदयांनी जे काही परिमाण दिलं आहे, ते चित्रपट एकदा बघून तरी कळणं असंभव आहे. ‘इंटरस्टेलर’ आणि ‘इन्सेप्शन’ या चित्रपटांनाही मागं टाकणारं हे नवं रसायन आहे. यावेळी नोलॉन यांनी काळ उलटा होऊ शकतो, अशी कल्पना मांडून त्याभोवती थरार मांडला आहे. मुंबईपासून ओस्लोपर्यंत कुठंही फिरणारी आणि कुठल्याही काळात घेऊन जाणारी ही मांडणी मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आणणारी आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या प्रचंड मेहनत आणि दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत सगळ्यांचं कन्व्हिक्शन यांमुळं हा चित्रपट मस्ट वॉच कॅटेगरीमधला आहे, हेही तितकंच खरं. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एका ऑपेरा हाउसमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला होतो. त्यानंतर झालेल्या कारवाईत सीआयए एजंट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) काही व्यक्तींच्या हाती सापडतो. त्यात तो सायनाइड प्राशन करतो आणि नंतर टेनेट नावाच्या गुप्त संघटनेची माहिती होणं, नील (रॉबर्ट पॅटिसन) नावाचा साथीदार मिळणं, प्रिया सिंग (डिंपल कापडिया) नावाच्या शस्त्रास्त्र दलालापासून इतर अनेकांपर्यंत त्यांनी पोचणं वगैरे वगैरे अनाकलनीय, अतर्क्य गोष्टींची होणारी उकल म्हणजे टेनेट. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोलॉन यांनी मुंबईतल्या उंच इमारतींपासून अमाल्फीच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत अनेक लोकेशन्सचा वापर करून थरार वाढवला आहे. एकीकडे संहिता गुंतागुंतीची असतानाच त्याला दिलेलं दृश्यरूप मात्र खिळवून ठेवणारं आहे. चित्रपट बघताना एक क्षणही आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि सतत विचार करत राहतो, हे चित्रपटाचं वैशिष्ट्य. काही साहसदृश्यं अफाट आहेत. विशेषतः त्यात वापरलेली वैज्ञानिक संकल्पना तर त्यांना आणखी वेगळं परिमाण देते. वॉशिंग्टन, पॅटिसन यांच्याबरोबरच डिंपल कापडिया यांचे अभिनय उल्लेखनीय आहेत. इतकी अवघड संकल्पना इतक्या कन्व्हिक्शननं सादर करणं हेच मुळात कौतुकास्पद. ओस्लो विमानतळावरची साहसदृश्यं, विलक्षण क्लायमॅक्स यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. होयटे व्हॅन होयटेमा यांचं छायाचित्रण आणि लुडविग गोरान्सन यांचं पार्श्वसंगीत यांना हॅट्स ऑफ. एखादी गुंतागुंतीची कल्पना किती भव्य पद्धतीनं पडद्यावर साकार करता येऊ शकते याचा अनुभव घेण्यासाठी आणि अर्थातच नोलॉनप्रेमींसाठी हा चित्रपट नक्कीच मस्ट वॉच. हा चित्रपट एकदा बघितल्यावर तुम्ही दुसऱ्यांदा बघण्याचा, किंवा अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की... 

बाकी या अडीच तासांचा काळ मात्र उलटा फिरवता येणार नाही बरंका! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandar kulkarni write article about Christopher Nolan tenet movie

Tags
टॉपिकस
Topic Tags: