Ujda Chaman Review : ‘बाल्ड’ अँड ब्यूटिफुल 

मंदार कुलकर्णी
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

‘उजडा चमन’चं वैशिष्ट्य म्हणजे त्याची अतिशय नेमकी संहिता आणि खुसखुशीत संवाद. चमन आणि त्याच्या वडिलांमधला हार्मोन्सबाबतचा संवाद, चमन रस्त्यावरून जाताना नेमकं कुणी तरी कंगवे विकत घेण्याची विनंती करणं, मुली पटवण्यासाठी चमन करत असलेले एकेक भाबडे आणि गमतीशीर प्रयत्न, चमनच्या कॉलेज ग्रुपवरचं चॅटिंग, चमन आणि अप्सरा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी अक्षरशः लग्नाचीच तयारी सुरू करणं.

हिंदी चित्रपट एकीकडं बोल्ड होतो आहे आणि त्याच वेळी तो अक्षरशः ‘बाल्ड’ही होतो आहे. येस. चक्क डोक्यावर केस कमी असलेल्या आणि त्यामुळे लग्न होत नसलेल्या तरुणाची गोष्ट सांगणारा ‘उजडा चमन’ हा चित्रपट आला आहे. प्रौढत्वात मूल होण्यापासून ‘स्पर्म डोनेशन’पर्यंत अगदी चित्रपटविश्वाला आत्तापर्यंत ‘टॅबू’ असलेले विषय खुसखुशीतपणे मांडणाऱ्या नव्या चित्रपटांच्या ‘लीग’मधला हा चित्रपट आहे.

अक्षरशः सुरवातीच्या प्रसंगापासून हास्याचं सिंचन करणारा आणि वेगवेगळी सामाजिक निरीक्षणं अतिशय खुमासदारपणे मांडणारा ‘उजडा चमन’ म्हणजे अक्षरशः ‘केस’ स्टडीच आहे. पडद्यावर तशा प्रकारे फारसा न आलेला विषय; बांधीव संहिता, कुठंही पातळी न सोडणारा विनोद; माहीत नसलेले चेहरे असूनही त्यांनी जिवंत केलेल्या व्यक्तिरेखा यांमुळं हा चित्रपट धमाल करतो. खरंतर डोक्यावर केस कमी असणं आणि लग्न न जमणं असा वेगळा विषय आणि खुसखुशीत मांडणी एवढंच या चित्रपटाचं महत्त्व नाही, तर स्वतःमधल्या कमतरतांचा कुठं ‘काँप्लेक्स’ बाळगू नका आणि कमतरता असलेल्या दुसऱ्यांच्याही भावना दुखावू नका असं अगदी जाताजाता; पण ठामपणे हा चित्रपट सांगतो आणि त्यामुळेच उंचीवर जातो. 

चमन कोहली (सनी सिंग) हा हिंदी शिकवणारा तिशी उलटलेला प्राध्यापक. डोक्यावर केस कमी असल्यामुळे आई-वडील (अतुल कुमार, गृषा कपूर) काळजीत आहेत, तर लहान भाऊ (गगन अरोरा) चेष्टा करतो आहे. अशा लोकांना सर्वसाधारणपणे झेलावे लागणारे टोमणे आणि त्यातून होणारे विनोद यांमुळे चमन नाराज आहे. लग्न जमवण्यासाठी चमन प्रयत्न करतो, त्यातून अप्सरा (मानवी गागरू) एका डेटिंग ऍपवर भेटते. त्यातून काय होत जातं, हे हा चित्रपट सांगतो. 

‘उजडा चमन’चं वैशिष्ट्य म्हणजे त्याची अतिशय नेमकी संहिता आणि खुसखुशीत संवाद. चमन आणि त्याच्या वडिलांमधला हार्मोन्सबाबतचा संवाद, चमन रस्त्यावरून जाताना नेमकं कुणी तरी कंगवे विकत घेण्याची विनंती करणं, मुली पटवण्यासाठी चमन करत असलेले एकेक भाबडे आणि गमतीशीर प्रयत्न, चमनच्या कॉलेज ग्रुपवरचं चॅटिंग, चमन आणि अप्सरा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी अक्षरशः लग्नाचीच तयारी सुरू करणं, चमनने विग घातल्यावर एंट्री करतानाची देहबोली, सुरवातीचं ‘चांद निकला’ हे सूचक गाणं... अशा अनेक गोष्टी धमाल आहेत. लेखक राज शेट्टी, दानिशसिंग आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक अतिशय छोट्याछोट्या गोष्टींतून हा सगळा विषय मांडत जातात. सामाजिक निरीक्षणं सूक्ष्म असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्याशी ‘रिलेट’ करू शकेल. लग्न उशिरा होणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांच्या मानसिकतेपासून डेटिंगसाठी ॲप वापरण्याच्या नव्या जमान्याच्या मानसिकतेपर्यंत अनेक गोष्टी या चित्रपटात अगदी सहजपणे येतात. चमनला नेमकी वजन जास्त असलेली मुलगी भेटणं हा ट्विस्ट आणि त्याचा नाट्य पुढे जाण्यासाठी केलेला वापर हे फार उत्तम आहे. मुलीचं नाव ‘अप्सरा’ आणि मुलाचं नाव ‘चमन’ हेही मजेशीरच आहे. 

सनी सिंग हा चित्रपट अतिशय उत्तम पद्धतीने पेलून नेतो. केस कमी असल्यामुळे विश्वास गमावलेला, गोंधळलेला; भाबडा आणि सरळ चमन उत्तम जमून आला आहे. एका विशिष्ट प्रसंगात अप्सरा सेल्फी घेत असताना नाराज चमन ज्या प्रकारे स्माईल देतो, ते धमाल आहे. सनी विनोद निर्माण होत असताना कुठंही तोल जाणार नाही याची काळजी घेतो. मानवी ही मुलगी फार छान पद्धतीने व्यक्तिरेखा ‘कॅरी’ करते. तिने या व्यक्तिरेखेला अतिशय मानवी, सहज स्वभावाचं जे काही अस्तर लावलं आहे, त्यामुळं चित्रपट हास्यास्पद होणं टळलं आहे. बाकी सगळेच कलाकार दिल्लीतलं ‘टिपिकल’ वातावरण अगदी उत्तम उभं करतात. एकूणच, सहकुटुंब बघता येऊ शकणारा हा ‘फिल गुड’ चित्रपट आहे. ‘गॉन केस’ म्हणून तुम्ही तो टाळू शकत नाही. उलट या चित्रपटाचा ‘केस’ स्टडी तुमचंही जगणं आणि इतरांकडं बघण्याची दृष्टी नक्की बदलेल एवढं नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Kulkarni writes review on Ujda Chaman movie