esakal | इतर नेत्यांपेक्षा तो वेगळाच, हेमंत राहुल गांधीवर फिदा
sakal

बोलून बातमी शोधा

 Marathi actor hemant dhome appreciated  Rahul  gandhi

इतर नेत्यांपेक्षा तो वेगळाच, हेमंत राहुल गांधीवर फिदा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.नुकताच त्याच्या झिम्मा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हेमंत चित्रपटांबरोबरच राजकारणाबद्दल देखील सोशल मिडीयावर भाष्य करतो. नुकतेच हेमंतने राजकिय नेते राहून गांधी यांचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आसूनही अनेक ठिकाणी निवडणूकांसाठी प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. राहूल गांधींनी यावर भाष्य करत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीले, ‘सध्याची कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन, मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करीत असून सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रचारसभा घेऊन होणाऱ्या परिणामांचा राजकीय नेत्यांनी बारकाईने विचार करावा,’ हे ट्विट रिट्विट करून हेमंतने लिहीले, 'आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील... यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल...पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे... देशाला आत्ता निवडणूका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय! जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय! पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया... मजेत राहुया!’. सोशल मीडियावर राहूल गांधीना अनेकदा ट्रोल केले जाते पण हेमंतने या ट्रोलर्सला त्याच्या ट्विटमधून सडेतोड उत्तर दिले आहे.

सध्या भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा राजकीय प्रचारसभा घेत असल्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत.