ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन |marathi actress prema kiran passes away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prema kiran

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

'अर्धांगी', 'धूमधडाका', 'दे दणादण', 'गडबड घोटाळा', 'सौभाग्यवती सरपंच', 'माहेरचा आहेर' अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण (prema kiran) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच गाजली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'थरकाप' या चित्रपटांच्याही त्या निर्मित्या होत्या.

झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran ) यांनी काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. या मंचावर महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ‘दे दणादण’ या चित्रपटाविषयीचा एक किस्सा सांगितला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला होता.

प्रेमा किरण हा किस्सा सांगताना म्हणाल्या, ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झालं. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडलं.'

चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, हे ऐकताच प्रेक्षक खळखळून हसले होते. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.