esakal | सखोल अभ्यासक, उत्स्फूर्त कलावंत!

बोलून बातमी शोधा

sumitra bhave
सखोल अभ्यासक, उत्स्फूर्त कलावंत!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

- सुनिल सुकथनकर

सुमित्राताईंबरोबर मी अनेक वर्षं काम केलं आहे व त्यामुळं त्याचं काम वेगळं काढून सांगणं मला अवघड वाटतं. त्यांच्याबरोबर मी वयाच्या १८व्या वर्षापासून काम करतो आहे व ते करताना मला कायमच विस्मय वाटत आला आहे. त्यांच्यात साधारणपणे न सापडणाऱ्या दोन वेगळ्याच गुणांचा संगम मला दिसला. त्या विश्‍लेषक होत्या, बौद्धिक विचारवंत म्हणून त्या विषयाचा सखोल अभ्यास करायच्या व त्याचवेळी कलाकाराकडं असलेली उत्स्फूर्त मनोवृत्तीही त्यांच्याकडं होती. त्या चित्र, रांगोळी छान काढत व त्याचवेळी कविताही करत. त्यांच्या कवितांचे भालचंद्र नेमाडे, प्र. ना. परांजपे यांनी कौतुक केलं आहे, तर ‘मौजे’त छापून आलेल्या त्यांच्या कविता त्या कवी ग्रेस यांना वाचून दाखवताना मी ऐकलं आहे.

समाजसंशोधक ते चित्रपट

सुमित्राताईंनी सामाजिक विज्ञानामधील शिक्षण घेतले व वयाच्या चाळीशीपर्यंत त्यांनी याच क्षेत्रात प्रशिक्षक व अभ्यासक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी हे विषय मांडण्यासाठी चित्रपट माध्यम शोधलं. या काळात मी त्यांचा पहिला सहकारी होतो. सामाजिक विश्‍लेषणाची दृष्टी आणि त्याच्या प्रगटीकरणासाठी कलात्मक मांडणी या प्रक्रियेला त्यांनी सुरवात केली. विषय सुचण्याच्या प्रक्रियेत आम्ही दोघंही असायचो, मात्र विषयाची संहिता त्या स्वतः तयार करायच्या व शेवटी दिग्दर्शनाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही दोघं सहभागी व्हायचो. अभ्यासक, संहिता लेखक, दिग्दर्शक यांपुढं जाऊन त्यांनी सिनेमा तंत्राचा अभ्यासही केला. हे तंत्र मी ‘एफटीआय’मध्ये शिकलो होतो व त्या बाहेर राहून एकलव्यासारखे शिक्षण घेत राहिल्या. त्यांनी तरुण वयात विमल रॉय, गुरूदत्त, सत्यजीत राय यांचे चित्रपट अभ्यासले होते. पहिल्या लघुपटापासूनच त्यांनी एक प्रगल्भ चित्रपट देण्यास सुरवात केली व ती आजतागायत सुरू होती. एकदा विषय सुचल्यानंतर तो पुढं नेण्याची जिगर व धाडस त्यांच्यात होतं. व्यावसायिक अडचणींचे डोंगर पाहून मी दबून जायचो, मात्र त्या म्हणत, ‘करून बघायला काय हरकत आहे?’ त्यांच्या प्रेरणेतूनच मग मी तो प्रकल्प पुढं न्यायचो.

सामाजिक चित्रपटांची मालिका

सुमित्राताईंनी व मी वेगवेगळ्या मानसिक व शारीरिक आजारांवर चित्रपट निर्माण केले. मात्र, आश्‍चर्यकारकरित्या त्यांना आजार, रुग्णालयात जाणं नको वाटायचं, त्याचा त्यांना तिटकाराच होता. तरीही हा सगळा तिटकारा ओलांडून त्यांनी या विषयांवर चित्रपट बनवण्याचा घाट घातला. ‘जिंदगी जिंदाबाद’ हा चित्रपट पुण्यातील झोपडपट्टीतील मुलांमधील एड्सच्या समस्येवर होता आणि ‘दोघी’नंतर आम्ही हा चित्रपट बनवायला घेतला. इथपासूनच आमच्या विविध आजारांवरील चित्रपटांच्या मालिकेला सुरुवात झाली. या विषयांना वैद्यकीय, भावनिक व सामजिक अंग होतं. संहिता लिहिताना त्यांना कथेतील जीवनविषयक मूलतत्त्व सापडायचं. ‘जिंदगी जिंदाबाद’मधून आयुष्य किती मौल्यवान हे सांगण्याचा प्रयत्न होता, ‘देवराई’ स्किझोफ्रेनिया विषयावरील असली तरी मनुष्य निसर्गवार कसा अवलंबून आहे हे सांगितलं गेलं, ‘नितळ’मध्ये सौंदर्याची संकल्पना अधिक व्यापक करून सांगितली गेली, तर ‘कासव’मध्ये अंड्यातल्या कासवाला उब मिळाल्यास ते लढायला तयार होतं, असा व्यापक अर्थ होता. प्रत्येक चित्रपटातून त्यांनी मानवी शाश्‍वत मूल्यांचा शोध घेणं आपलं कर्तव्य मानलं.

कलात्मकता आणि निर्मितीमूल्यं

चित्रपटाची निर्मिती करताना त्यावर आर्थिक अडचणींचा परिणाम होऊ नये यासाठी त्या जागरुक असायच्या. चित्रपट निर्मितीची व्यवस्था एखाद्या गृहिणीप्रमाणं असावी, असं त्या म्हणत. त्या गुणवत्तेकडं लक्ष देताना कुठंही उधळपट्टी होणार नाही याकडं लक्ष द्यायच्या. त्या स्वतः उत्कृष्ट कलादिग्दर्शक व वेशभूषाकार होत्या. कथेसाठी योग्य लोकेशन शोधण्यासाठी त्या प्रयत्न करायच्या. ‘संहिता’मधील राजवाडा किंवा ‘वास्तूपुरुष’मधील वाड्यासाठी त्यांना महाराष्ट्र पालथा घातला. लोकेशन मिळवण्यासाठी त्या आपल्या संपर्कातील लोकांचे सहकार्य घ्यायच्या. यातून खूप चांगले कलावंत, तंत्रज्ञ जोडले गेले व मर्यादित साधनांत त्यांनी दर्जेदार काम करून दाखवले. सुमित्राताईंच्या कामाचं मोल लोकांना काही प्रमाणात उमगलं आहे, मात्र २००५-०६नंतरच्या मार्केटिंगच्या लाटेत मराठी चित्रपटसृष्टीतही कलेपेक्षा पैसा आणि प्रसिद्धिला महत्त्व आले. ज्याला हे जमणार नाही त्याला दुय्यम स्थान मिळू लागलं. आम्ही हे स्वीकारलं होतं. मी कलावंत आहे आणि मार्केटिंग हे माझं काम नाही, ते मी करू शकत नाही, असं त्या म्हणत. त्यामुळं कदाचित दहा उत्कृष्ट मराठी चित्रपटांची नावं काढताना आमच्या चित्रपटांची नावं येणार नाही, मात्र खूप खोलात जाऊन विचार केल्यास या चित्रपटांना नक्कीच वरचं स्थान मिळेल. सामाजिक संहिता कलात्मक बनवण्याच्या पुढच्या टप्प्यावर सुमित्राताई आता पोचल्या होत्या. सामाजिक विषयाच्या पलीकडच्या संहिता त्या लिहू लागल्या होत्या. दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर आधारित ‘दिठी’ या चित्रपटात त्यांना ही संधी मिळाली व त्यांनी एकटीनं हा चित्रपट केला. जीवन व मृत्यूचा प्रगल्भ शोध त्या घेऊ लागल्या होत्या व त्यांच्या अचानक जाण्यामुळं यापासून चित्रपटसृष्टी मुकली आहे. त्यांच्या जाण्यानं एक अष्टपैलू कलाकाराला चित्रपटसृष्टी मुकली आहे.

संपादन- स्वाती वेमूल