म... मराठी चित्रपट आव्हानांचा धुरळा

Marathi-Movie
Marathi-Movie

नव्या वर्षात मराठी चित्रपटाची ओपनिंग चांगली झाली आहे. ‘धुरळा’ या चित्रपटासाठी काही सिनेमागृहांत हाऊसफुलचे बोर्ड पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या यशाने सगळीकडे आनंदी आनंद पसरला. सुरुवात चांगली झाली तर शेवटही उत्तम होईल, या आशेवर २०२० वर्ष सुरू झालं आहे, पण काही आव्हानंही आहेतच. त्या आव्हानांचं ओझं पेलून शिखर गाठायचं आहे.

एकेकाळी पंचवीस ते तीस चित्रपटांची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपट उद्योगाने  कमालीची भरारी घेतली आहे. चित्रपटांच्या निर्मितीसह कलाकारांची आणि तंत्रज्ञांची संख्याही वाढली आहे. नवनवे तंत्रज्ञान आले आणि येणारही आहे. कल्पक आणि हुशार दिग्दर्शक व लेखकांची टीम आहे. उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रपट निघाले आणि निघतीलही. मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये, चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांचे कौतुक होत आहे. अशी सगळीकडून भरभराट होत आहे. एकेकाळी काही कोटी रुपयांची उलाढाल असणारा मराठी चित्रपटाची वार्षिक उलाढाल दोनशे ते तीनशे कोटींच्या घरात गेली आहे; परंतु मराठी चित्रपटसृष्टीसमोर तितक्‍याच समस्या आणि आव्हाने आहेत. या वर्षी ही आव्हाने आणखीन वाढणार आहेत. 

गेल्या वर्षी चित्रपट निर्मितीने शंभरीचा आकडा पार केला. विविध विषयांवरील चित्रपट आले. त्यातील काही चित्रपट भरभरून चालले आणि काही आले व कसे गेले तेही समजले नाही. नवीन वर्षातही चांगले आणि आशयघन चित्रपट येणार आहेत. प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होणार आहे. या वर्षी ‘पाँडिचेरी’, ‘बोनस’, ‘इभ्रत’, ‘मनफकिरा’, ‘चोरीचा मामला’, ‘काळ’, ‘रहस्य’, ‘प्रवास’, ‘भाई कोतवाल’, ‘वेगळी वाट’, ‘विकून टाक’, ‘पांघरूण’, ‘एबी आणि सीडी’, ‘चंद्रमुखी’ असे काही चित्रपट येणार आहेत. प्रत्येक चित्रपटाचे बजेट कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. कौटुंबिक चित्रपटांबरोबरच ऐतिहासिक-बायोपिक आणि हॉरर अशा सगळ्या विषयांचे चित्रपट येणार आहेत; परंतु मराठी चित्रपटसृष्टीसमोर सगळ्यात मोठे आव्हान आहे ओटीटी प्लॅटफॉर्मचे. अधिकाधिक चांगला कंटेण्ड देण्याचे, चांगल्या प्रमोशन्स आणि मार्केटिंगचे तसेच चित्रपटगृहात अधिकाधिक प्रेक्षक कसे येतील याचे. 

वेबसीरिजचा वाढता पसारा
सध्या मराठी प्रेक्षकांसमोर मनोरंजनाची विविध दालने उभी आहेत. हिंदी चित्रपटाबरोबरच आजची तरुण पिढी इंग्रजी चित्रपटालाही प्राधान्य देत आहे. नाटक आणि टीव्ही पाहणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यातच साऊथचे चित्रपट, तसेच गुजराती चित्रपट पाहणारा वेगळा प्रेक्षक वर्ग मेट्रो सिटीमध्ये निर्माण झाला आहे. या वर्षी काही मराठी सिनेमा वाहिन्यांचे आगमन होत आहे. जिओ ही नामांकित कंपनी अगोदरच मराठी चित्रपटसृष्टीत उतरली आहे आणि आता मोठ्या जोमाने ती उतरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी या सगळ्या गोष्टींना तोंड देत असतानाच मोठे आव्हान आहे ते वेबसीरिजचे. हिंदी व इंग्रजीबरोबरच मराठीतही वेबसीरिज निर्माण होत आहेत. तरुण पिढी त्याकडे आकर्षित होत आहेत. चित्रपट रसिकाला आपल्या हातातच मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. ॲमेझॉन, नेटफ्लिक्‍स, झी ५ अशा काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषय हाताळले जात आहेत. मोठमोठे कलाकार वेबसीरिजकडे वळत आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे मनोरंजन घरबसल्या किंवा अन्य ठिकाणी माफक दरात उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटही एक-दोन महिन्यात या प्लॅटफॉर्मवर येत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे. तरुण पिढी मोबाईलवर असे चित्रपट पाहण्याला पसंती देत आहे. 

मार्केटिंग आणि प्रमोशन
चित्रपट निर्मात्यांना चांगला कंटेण्ड देणे आणि आपल्या चित्रपटाचे चांगले मार्केटिंग व प्रमोशन करणे आवश्‍यक झाले आहे. काही निर्माते चित्रपटाच्या निर्मितीवर अमाप खर्च करतात; परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ येते तेव्हा हात आखडता घेतात. मुळात हल्लीचा जमाना मार्केटिंगचा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच मार्केटिंग आणि प्रमोशन्सचे नवनवीन फंडे वापरणे आवश्‍यक झाले आहे. कारण मराठी चित्रपटांना हिंदीचे मोठे आव्हान आहे. हिंदीचे बजेट आणि प्रसिद्धी मोठी असते. त्याच्या प्रदर्शनाचा तामजामही मोठा असतो. त्यामुळे मराठीनेही मार्केटिंग आणि प्रमोशन्ससाठी नवनवीन फंडे वापरणे आवश्‍यक आहे. 

थिएटर आणि प्रेक्षकसंख्या
मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत... मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही, अशी ओरड सतत होत असते. ही बाब जरी खरी असली तरी चांगले आणि 
दर्जेदार मराठी चित्रपट बनवून मराठी प्रेक्षक अधिक संख्येने चित्रपटगृहाकडे कसे वळतील, हे पाहणे तितकेच आवश्‍यक झाले आहे. 

कारण हल्ली एखादा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोला गेला तर जेमतेम प्रेक्षकांची उपस्थिती असते. त्यामुळे थिएटर्सबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि आशयघन चित्रपट बनवून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल हे पाहणे आवश्‍यक झाले आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरूची बदलली आहे. त्याला सातत्याने नावीन्य हवे आहे. त्यामुळे नावीन्यपूर्ण चित्रपट पहिलेही येत होते आणि आताही अधिक येतील व प्रेक्षकही ते भरभरून पाहतील, अशी आशा करू या.

चॅलेंज आहेत आणि ते असलेच पाहिजेत. त्यासाठी आम्हालाही काहीतरी वेगळे आणि भव्यदिव्य द्यावे लागेल. चांगले चित्रपट येत असतात. पण प्रेक्षकांनी ते चित्रपटगृहात जाऊन पाहिले पाहिजेत. वेबवर येतील आणि आम्ही ते बघू, असा विचार करता कामा नये. 
- स्वप्ना जोशी-वाघमारे, निर्माती व दिग्दर्शिका

‘जिओ’ची या वर्षी डी टू एच सर्व्हिस येत आहे. शुक्रवारीच घरबसल्या कोणताही चित्रपट पाहू शकतो. त्याची भीती केवळ मराठीलाच नाही तर अख्ख्या इंडस्ट्रीला आहे. मल्टिफ्लेक्‍सवाले हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटाचे तिकीट दर वाढवीत असतात. त्याचा फटका आता बसणार आहे.
- समीर दीक्षित, वितरक

तुमचा आशय-विषय भारी हवा आणि तेवढीच तगडी मार्केटिंग व प्रमोशन्स. चांगले कौटुंबिक चित्रपट पाहायला प्रेक्षक थिएटर्समध्ये येतात. ‘धुरळा’ चांगला चालला आहे. चांगले विषय आणि आधुनिक तंत्राचा कुशल वापर, हे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आव्हानाला उत्तर असेल.
- नानूभाई जयसंघानी, निर्माते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com