Movie Review : शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार 'फास'

अविनाश कोलतेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे तर माँ एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली माहेश्वरी चाकूरकर पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
marathi movie
marathi moviesakal

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या, सरकारी पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असलेली अनास्था, आपली ढासळलेली आणि विस्कटलेली सिस्टिम, त्यामध्ये होणारी शेतकऱ्यांची कुचंबणा, त्यातच त्याच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट....अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श करणारा चित्रपट म्हणजे फास. अविनाश कोलतेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे तर माँ एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली माहेश्वरी चाकूरकर पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Marathi Movie Review)

या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविले गेले आहे. या चित्रपटात बळीराम नावाच्या शेतकऱ्याची कथा सांगण्यात आली आहे. बळीराम (कमलेश सावंत) हा आपल्या पत्नी लक्ष्मी (पल्लवी पालकर) आणि दोन मुलांसह राहात असतो. त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आणि हलाखीची असते. आपल्या मुलांची आणि पत्नीची तो हौसमौज करण्याची त्याची परिस्थिती नसते. गरीबीच्या जोत्याखाली तो कमालीचा पेचलेला असतो. त्यामुळे त्याची मुले मोठमोठी स्वप्ने पाहू शकत नाहीत...आपल्याला हवे तसे कपडे घालू शकत नाहीत...त्याची पत्नी लक्ष्मी आपल्या आवडीनिवडी जोपासू शकत नाही. त्यामुळे एकूणच या परिस्थितीमुळे तो हतबल झालेला असतो आणि अशातच एके दिवशी गळफास घेऊन तो आत्महत्या करतो.

त्याच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या गावात पसरते. पोलिस अधिकारी (उपेंद्र लिमये) या आत्महत्येचा तपास करण्यासाठी गावात येतो आणि त्यानंतर सरकारी यंत्रणा तसेच आपल्या येथील सिस्टिमच्या गलथान कारभारामुळे गावकरी आणि बळीरामच्या कुटुंबीयांची कशी ससेहोलपट होते याचे विदारक चित्रण या चित्रपटात आहे. चित्रपटाच्या विषयात नावीन्य आहे. हा फास म्हणजे समाजातील विविध घटकांच्या गळ्यांशी आवळला गेलेला फास आहे. लेखिका माहेश्वरी चाकूरकर पाटील यांच्या लेखणीतून हा उत्तम विषय उतरला आहे. कलाकारांनी आपापल्या भूमिकेद्वारे या विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कमलेश सावंत, उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे हे तसे मराठी व हिंदीमध्ये काम करणारे कसलेले आणि अनुभवी कलाकार.

त्यांनी आपापल्या भूमिकेत छान रंग भरलेले आहेत. कमलेशने शेतकऱ्याचे दुःख आणि त्याच्या वेदना आपल्या भूमिकेतून तसेच शाब्दिक रूपाने उत्तम दर्शविल्या आहेत. कर्तव्यदक्ष आणि तडफदार असा पोलिस अधिकारी उपेंद्र लिमयेने साकारला आहे. त्याचबरोबर गणेश चंदनशिवे, पल्लवी पालकर, नामदेव पाटील, नीलेश बडे, शरद काकडे, पवन वैद्य आदी कलाकारांनी आपापली बाजू चोख बजावली आहे. रमणी रंजन दास यांची सिनेमॅटोग्राफी नेत्रसुखद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जयघोष करणारं गाणं श्रवणीय झालं आहे.

खरं तर या चित्रपटाची कथा उत्तम आहे. या संवेदनशील कथेला पटकथेची उत्तम बांधणी करणे तितकेच आवश्यक होते. त्याबाबतीत दिग्दर्शक काहीसा कमी पडलेला दिसतो. त्याने शाब्दिक भडिमार अधिक केलेला दिसतो. तरीही शेतकऱ्यांचं दुःख, त्याची हतबलता, त्यांच्या कुटुंबाचं विदारक चित्रण या बाबी प्रखरपणे या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. तसेच आपल्या सिस्टिमचा होणारा नाहक त्रास हेही दर्शविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार या चित्रपटात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com