ब्रोमांस'चे फु-गे! (नवा चित्रपट )

marathi movie fuge Review
marathi movie fuge Review

एखाद्याबद्दल आपण मनात जो समज करून घेतो, तो एकदा तयार झाला की आपल्याला त्याला बळ मिळेल, अशाच गोष्टी दिसू लागतात. हा गैरसमजाचा फुगा फुगत जातो, फुगत जातो... आणि तो जेव्हा फुटतो तेव्हा नेमके काय होते, याचेच उत्तर हा चित्रपट देतो... 
दोन जीवलग मित्रांची ही कहाणी. खरंतर हे वेगळं सांगायला नकोच. कारण सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध-स्वप्नीलची नावे, स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी अशीच आहेत. त्यांच्यातलं बॉण्डिंग फार पूर्वीपासून चांगलंच आहे आणि या सिनेमाची कथाही दोघांनी मिळूनच लिहिलीय. त्यामुळे ऑन स्क्रीन ते धम्माल करणार, हे तर नक्कीच होते... 
तर सिनेमात स्वप्नील आहे आदित्य अग्निहोत्री आणि सुबोध आहे ऋषिकेश देशमुख. हे दोघेही लहानपणापासूनचे जीवश्‍च कंठश्‍च मित्र. ऋषिकेश लहान असताना त्याच्या आईचे निधन होतं नि ऋषिकेश अग्निहोत्री कुटुंबाचाच एक भाग बनतो. दोघेही मोठे होतात. आदित्यच्या लग्नाचा घाट घातला जातो. इथे जाई (प्रार्थना बेहरे) येते. तिच्याशी त्याचा साखरपुडा होतो. लग्नापूर्वी एखादी बॅचलर पार्टी करावी, असे आदी आणि ऋषी हे दोघेही ठरवतात आणि सुटतात गोव्याच्या दिशेने. गोव्यात पार्टी एन्जॉय करीत असतानाच, मद्याच्या धुंदीमध्ये ते एका परेडमध्ये सामील होतात. ती असते "गे परेड'! त्यांचा तो फोटो वर्तमानपत्रात छापून येतो आणि एकच गोंधळ निर्माण होतो. त्यातच जाई आदीला भेटण्यासाठी गोव्याला येते आणि त्यांचा वर्तमानपत्रातील तो फोटो आणि एकूणच आदीचा अवतार पाहून ती उडतेच. हे दोघे गे असल्याचा समज झाल्यामुळे चिडलेली जाई एन्गेजमेंट तोडून टाकते. त्या दोघांच्याही कुटुंबीयांना आणि नातेवाईकांनाही ते कळते आणि त्यांचाही समज तसाच होतो. मग सुरू होते धावपळ या दोघांची... आपण गे नसल्याचे सिद्ध करण्याची... गैरसमजाचे फुगे फोडण्याची... त्यांची धावपळ, धम्माल म्हणजेच फु-गे! 
अलीकडे मराठी चित्रपट सातासमुद्रापार झेपावतो आहे... इथे तो गोव्याच्या समुद्रकिनारी झेपावलाय! गम्मत अलाहिदा, पण असा विषय मांडण्यासाठी गोव्याची पार्श्‍वभूमी अगदी योग्यच होती. अर्थात दोस्तानाची आठवण करून देणारा हा चित्रपट असला तरी विषय वेगळ आहेच, मराठीत तो सादर करताना मराठी मानसिकतेचा विचार करणे अत्यंत आवश्‍यक होते. दिग्दर्शक स्वप्ना जोशी वाघमारे यांनी तो नजाकतीने हाताळलाय. त्यामुळे त्याने कुठेही पातळी सोडलेली नाही. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांचा अभिनय नेहमीसारखाच सहजसुंदर. त्यांचा "ब्रोमांस' (ब्रदरली रोमांस!) मस्तच. 
बेधडक आणि बिनधास्त अशा त्यांच्या भूमिका त्यांनी खुमासदार पद्धतीने साकारल्यात. मोहन जोशी, सुहास जोशी, प्रार्थना बेहरे, नीता शेट्टी यांचीही कामगिरी चोख. आनंद इंगळेने तर कमालच केलीय. निशिकांत कामतची वेगळी भूमिका लक्षात राहणारी अशीच आहे. हेमंत ढोमेचे संवाद खुसखुशीत आहेत. प्रसाद भेंडे यांचा कॅमेरा छान फिरला आहे. "पार्टी दे...' हे गाणे अगोदरच लोकप्रिय ठरलेय. त्याचे श्रेय गीतकार मंदार चोळकर आणि संगीतकार नीलेश मोहरिर यांना द्यावे लागेल. हे गाणे अमितराजने गायलेले आहे. 
चित्रपटाची मांडणी हलकीफुलकी आहेच; पण काही दृश्‍यांना कात्री लावली असती, तर तो अधिक आटोपशीर आणि वेगवान झाला असता. तरीही एक हलकाफुलका आणि मराठीतला वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे पाहावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com