
'फोटो प्रेम' मधून उलगडणार प्रेमळ 'माईची' गोष्ट
मुंबई: अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात ७ मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. या वेळी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्याचप्रमाणे अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'फोटो प्रेम' ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी तो संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.
या चित्रपटाबद्दल सांगताना नवोदित दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले, “फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे आणि प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची कथा वाटेल. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडियोशी सहयोग केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण त्यामुळे मराठी प्रेक्षकांसोबतच भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकेल.
Web Title: Marathi Movie Photo Fame Relesed This Week On Ott
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..