इंटरनेटचं तंत्र, नातेसंबधाचा मंत्र...; 'टेक केअर गुड नाईट'

हेमंत जुवेकर
रविवार, 2 सप्टेंबर 2018

गिरीश जोशींनी रंगमंचाऐवजी, पडद्यावरून कथा सांगताना खुपच मेहनत घेतलीय हे दिसतंच. व्यक्तिरेखांच्या संवादाबरोबर कॅमेराचाही संवाद प्रेक्षकांना ऐकू येईल, दिसेल याची काळजी त्यांनी चांगलीच घेतलीय.

हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो जाणून घेत असतो. त्याच्याकडून दुनियेतलं नवं नवं काही जाणून घेऊ पहाणाऱ्यां अनेकांना, तोही आपल्याकडून हे सगळं जाणून घेतोय याची कल्पनाही नसते.
 
(इंटर)नेट लावून आपलं आयुष्याचं पुस्तक फेसबुकाच्या रुपाने, खुली किताब करणाऱ्यांची गोष्टच वेगळी, ते पायी चालतानाही सेल्फी आणि चॅटींग सहजपणे करतात. तरी, त्यांनाही ठेच लागण्याची शक्यता असतेच... टीसीजीएन म्हणजे अशीच ठेच लागण्याची गोष्ट आहे. म्हणूनच त्याच्या नावात टेक केअर (गुड नाईट) आहे.
 
अविनाश (सचिन खेडेकर) आणि आसावरी (इरावती हर्षे) हे एक सुखवस्तु कुटुंब. समीर (अभय महाजन) आणि सारिका (पर्ण पेठे) ही त्यांची दोन मुलं. मुलगा अमेरिकेत उच्चशिक्षण घेतोय, मुलगी इथेच शिकतेय. आपल्या कंपनीत उच्चाधिकारी असलेल्या अविनाशला कंपनीत येणाऱ्या नव्या तंत्राशी जुळवून घेणं शक्य न वाटल्याने तो व्हीआरएस घेतो. या वेळेआधीच्या निवृत्तीनंतर, आयुष्याचा मुक्त आनंद घ्यायचं ठरवलेला अविनाश आपली अनेक दिवसांपासून राहिलेली वर्ल्डटूर करतो. पण फ्रेश मनस्थितीत भारतात परतल्यावर त्याला धक्क्यांवर धक्के बसत जातात. त्याच्या बॅँक खात्यामधली मोठी रक्कम नाहीशी झालेली असते आणि त्याच्या मुलीचा एक `वेगळाच` व्हिडियो इंटरनेटवर येऊ पहात असतो... या धक्क्यांमुळे सुरवातीला कोलमडून गेलेला अविनाश नंतर मात्र सावरतो. नवं तंत्र शिकायला नकार देणारा तो, यावेळी मात्र `नेट लावून` यामागे कोण असावं याचा शोध घ्यायला लागतो. 

सत्यघटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत (फायनल ड्राफ्ट या गाजलेल्या नाटकाचे लेखक-अभिनेते) गिरीश जोशी. नाटकाचा अतिशय समृद्ध अनुभव गाठीशी असलेल्या गिरीश जोशींनी यातले संवादही अतिशय सहज भासतील, तरीही काही जास्त सांगतील असे छानच लिहिलेत. घटना सायबर क्राईमबद्दल असली तरी त्यातून आधुनिक जीवनशैलीमधले नातेसंबंधही ठळकपणे समोर येतात. अत्यंत हुशार, पण आपल्याच आयुष्याला सर्वाधिक महत्व देणारा, त्यातूनच आपल्या आईवडिलांनाही सहजपणे मुर्ख ठरवू पहाणारा मुलगा. त्याच्या हुशारीमुळे झाकोळली गेलेली, न्युनगंड आलेली त्याची बहिण. (त्यातून काही नको त्या गोष्टी तपासून पहाण्याच्या निमित्ताने तिच्याकडून होणारी चूक) आजकालच्या मुलांच्या वेगळ्याच विचारपद्धतीमुळे गोंधळून गेलेली समुपदेशक आई आणि आपल्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देणारा, नी त्यामुळेच आपली मुलं बेताल होतायत की काय असं वाटून चिंताक्रांत झालेला बाप, या यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा. त्यासोबत त्याच्या मित्राचं कुटुंबही (विद्याधर जोशी-सुलेखा तळवलकर-संस्कृती बालगुडे) दिसतं यात. त्यांनी मात्र आपली मुलगी हाताबाहेर जाऊ नये म्हणून तिच्यावर कडेकोट बंधनं लादलीत. या बंधनामुळे ती कमालीची बिथरलीय. त्याच्या विरोधात आपल्या पद्धतीने बंडही करतेय ती. (त्यातूनही नको ते होतंच) 

सायबर गुन्हेगारीबरोबर हे नातेसंबधांचे पदरही उलगडत जातील याची दक्षता गिरीश जोशींनी फ्लॅश बॅक पद्दतीने सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीत घेतली आहे. त्यामुळे, ही प्रत्येक व्यक्तिरेखा तिच्या नातेसंबधांसह ठळकपणे उभी रहाते. मग ते, हा गुन्हा करणाऱ्या गौतम/सतीशचं (आदिनाथ कोठारे) आपल्या आईबरोबरचं नातं असो की त्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचं (महेश मांजरेकर) त्याच्या मुलाबरोबरचं. या मांडणीत कळत-नकळत थोडा बेतीवपणा वाटतो खरा, ती मांडलीही आहे आधीच्या पिढीच्या दृष्टीकोनातून. पण जे सांगितलं जातं ते जास्त प्रभावी आहे. शिवाय, या सिनेमाचा शेवट करताना, यातला (स्वतःला पुढारलेला मानणारा) नायक, आपल्या मुलीची `पुढारलेली` विचारसरणी खऱ्या अर्थाने स्वीकारताना दिसतो... सुरवातीला नव्या तंत्राचा स्वीकार करायला नकार देणारी ही व्यक्ती, नंतर मात्र एक बाप म्हणून नव्या कुटुंबव्यवस्थेचा नवा मंत्र (थोडा अडखळत का होईना) स्वीकारू पहाताना दिसते.

गिरीश जोशींनी रंगमंचाऐवजी, पडद्यावरून कथा सांगताना खुपच मेहनत घेतलीय हे दिसतंच. व्यक्तिरेखांच्या संवादाबरोबर कॅमेराचाही संवाद प्रेक्षकांना ऐकू येईल, दिसेल याची काळजी त्यांनी चांगलीच घेतलीय. चित्रपटाचा बराच भाग सायबर गुन्ह्याच्या तपासाचा आहे. त्यात रंगत आणण्यासाठी साध्या साध्या गोष्टींचा वापर करून त्यांनी केलेली धक्कातंत्राची मांडणी ही प्रशंसनीयच.     

कलाकारांमध्ये सचिन खेडेकर नेहमीप्रमाणेच उत्तम. बाकी साऱ्यांनी त्यांला मस्तच साथ दिलीय. पण महेश मांजरेकरांचा इन्स्पेक्टर पवार टेचात वावरतो नी सर्वाधिक भाव खावून जातो. ही दिग्दर्शकाची लाडकी व्यक्तिरेखा वाटावी इतपत त्याला महत्व आहे. नरेंद्र भिडेंचं संगीत सिनेमाची गरज पूर्ण करतं. छायाचित्रणादी तांत्रिक बाजू सरस. 
  
एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट प्रथमदर्शनी शहरी प्रेक्षकांना भावणारा वाटू शकतो. पण एक वेगळा विषय, वेगळ्या दृष्टीकोनासह मांडणारा हा चित्रपट इंटरनेटच्या तंत्राबरोबरच नातेसंबधांच्या बदललेल्या मंत्राबद्दलही सांगतो. वयात येऊ पहाणाऱ्या आणि आलेल्या मुलामुलींनी आपल्या आईवडिलांसह आवर्जून पहायला हवा. कारण, सुरक्षित इंटरनेट व्यवहाराबरोबरच नातेसंबधाची ही `केअर` घ्यायला शिकवतो हा सिनेमा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Review Take Care Good Night By Hemant Juvekar