esakal | 'सरकारी नको, शेतकरीच नवरा पाहिजे'; वधू पित्याची वेदना मांडणारा 'बस्ता' 
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi movie reviews basta directed by Tanhaji Ghadge

तान्हाजी घाडगे दिग्दर्शित बस्ता या चित्रपटात मुलीच्या बापाला लग्न होईपर्यत कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं प्रभावी चित्रण पाहायला मिळतं.

'सरकारी नको, शेतकरीच नवरा पाहिजे'; वधू पित्याची वेदना मांडणारा 'बस्ता' 

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई -  लग्नं करायचं म्हटलं की पहिला प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे मुलगा काय करतो, दुसरे म्हणजे त्याला शेती आहे का, आता नोकरी करणा-या मुलींना शेतीत एवढा रस का असतो हे काही कळत नाही. पण अनेकदा घरचे सांगतात म्हणून मुलीही मुलाला शेती पाहिजे असा अट्टाहास धरत असल्याचे दिसून येते. मुलाचे आई वडिल मुलगी जर शेती करणार असेल तर मग तिला शेती घेऊन देतो असे जेव्हा सांगतात तेव्हा मात्र मुलीकडच्या काही बोलता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. बाकी काही का असेना ज्यावेळी गोष्ट लग्नाची येते तेव्हा मुलीच्या वडिलांच्या जीवाला लागणारा घोर, चिंता हे शब्दात व्यक्त  करता येत नाही.

तान्हाजी घाडगे दिग्दर्शित बस्ता या चित्रपटात मुलीच्या बापाला लग्न होईपर्यत कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं प्रभावी चित्रण पाहायला मिळतं. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अरविंद जगताप यांचे असून निर्मिती सुनील फडतरे यांची आहे. चित्रपटाची कथा थोडक्यात अशी की, स्वाती (सायली संजीव)  चांगली शहराकडं राहून शिकलेली मुलगी, लग्नाला आलेली, मामाच्या मुलाचं तिच्यावर भारी प्रेम. त्याला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे. पण स्वातीला ते मान्य नाही. कारण तिला शेतकरी नवरा नको आहे.  मन्या (अक्षय टांकसाळे)  हा तिच्या मामाचा मुलगा शेती करतो, गावात भटकतो. त्यामुळे कदाचित स्वाती त्याला नाही म्हणत असावी. मात्र सुरुवातीला शेतकरी नवरा नको म्हणणारी स्वाती नंतर सरकारी मुलगा सोडून शेतक-याचा हात का धरते हे पाहण्यासाठी बस्ता पाहावा लागेल.

वरकरणी पाहिल्यास साधीशी कथा आहे. पण ती प्रत्येकाच्या घरातली आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळी वडिलांच्या डोक्यावर होणारे कर्ज, ते फेडण्यासाठी चाललेला प्रयत्न, हे सगळे आपण पाहत असतो. या चित्रपटातही स्वातीचे वडिल अण्णा ( सुहास पळशीकर) यांची होणारी ससेहोलपट दिग्दर्शकानं प्रभावीपणे मांडली आहे. त्यांचा अभिनय लक्षवेधी झाला आहे. चित्रपट पाहताना अनेकदा तो मुळ कथानकापासून भरकटल्यासारखे वाटते. कथेत संघर्ष उभा करताना पोलिसांचे जे काही प्रसंग चित्रपटात पेरले आहेत त्यातून विषयावरील पकड सैल झाल्यासारखे वाटते. गाण्यांचा भडिमार चित्रपटात केला आहे. दर अर्ध्या तासानं गाणं पाहताना वैतागल्यासारखे होते.

चला हवा येऊ द्या ची टीम पोलिसांच्या वेषात आहे. सागर कारंडेनं केलेली चोराची भूमिका ठीकठाक आहे. याशिवाय ज्योती सुभाष,  शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर, पार्थ भालेराव, यांचा अभिनय चित्रपटाला बळकटी आणण्यासाठी थोड्याफार प्रमाणात हातभार लावतो इतकचं. अजूनही आपल्याकडे ग्रामीण भागात लग्नाच्या नावानं कर्जबाजारी झालेले मुलीचे बाप दिसून येतात. ते कर्ज फेडणं जमलं नाही तर मग आत्महत्येचा पर्याय स्वीकारल्याची काही उदाहरणे दिसून येतात. आपली जमीन गहाण टाकून मुलीच्या लग्नासाठी काय काय भयानक अनुभवांना सामोरं जावं लागतं हे पाहायचे असल्यास बस्ता पाहावा. दुसरं म्हणजे स्वाती शेतकरी मुलाची निवड का करते याचे उत्तर शोधण्यासाठी सुध्दा. 

निर्मिती - सुनील फडतरे

दिग्दर्शक - तानाजी घाडगे

कथा, पटकथा, संवाद -  अरविंद जगताप

कलाकार ःज्योती सुभाष,  सायली संजीव, सुहास पळशीकर, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, प्राजक्ता हणमघर, पार्थ भालेराव,