वेडात सिनेमे फ्लाॅप जाहले सात!

सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

एकमेकांशी समन्वय न साधता एकाच दिवशी तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्याचा मोठा फटका आपल्या सिनेसृष्टीला बसला आहे. गर्दी वाढल्यामुळे एकाही चित्रपटाला मनासारखे थिएटर मिळाले नाही. थिएटर मिळाल्यास वेळा योग्य मिळाल्या नाहीत. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याचा फटका चित्रपटांना बसला आणि कासव, द सायलेन्स, हलाल यांच्यासह आलेल्या सात चित्रपटांच्या कपाळी फ्लाॅपचा शिक्का बसला.  

पुणे : सातत्याने ओरड होऊनही एकमेकांसोबत योग्य समन्वय न साधल्याने गेल्या शुक्रवारी मराठी चित्रपटांची मोठी अडचण झाली. कारण या एका दिवशी तब्बल सात चित्रपट प्रदर्शित झाले. यात तीन चर्चेतल्या चित्रपटांचा समावेश होता. एकाचवेळी सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे मराठी सिनेरसिकाची मोठी गोची झालीच. पण, या चित्रपटांनाही अपेक्षित थिएटर्स मिळाली नाहीत. परिणामी या चित्रपटांकडे रसिक वळलेला दिसला नाही. साहजिकच 2017 मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या सातही चित्रपटांच्या कपाळी फ्लाॅपचा शिक्का बसला आहे. 

गेल्या शुक्रवारी मराठीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये कासव, द सायलेन्स, लादेन आला रे आला, भविष्याची एैशीतैशी, आदेश, निर्भया, हलाल यांचा समावेश होतो. पैकी कासव आणि द सायलेन्स या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. कासवने तर राष्ट्रीय पुरस्करांतील सुवर्णकमळ पटकावल्याने या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या होत्या. सुजाण रसिक हा चित्रपट नक्की पाहील अशी आशा सर्वांनाच होती. परंतु, सिनेमाघरांवर झालेल्या चित्रपटांच्या गर्दीचा मोठा फटका या चित्रपटाला बसला. मुंबईत तर या चित्रपटाला एकच थिएटर मिळाल्याने इतर राहणाऱ्या रसिकांची मोठी गैरसोय झाली. शियाव द सायलेन्स या चित्रपटाबाबतही अशीच स्थिती उद्भवली. हे दोन्ही चित्रपट मास पब्लिकचे नक्कीच नाहीत. तद्दन मसालापटांची अपेक्षा असणारा वर्ग या चित्रपटांकडे वळणारा नाही. पण फेस्टिवल आवडणारा प्रेक्षक तरी या चित्रपटाकडे वळेल अशी आशा होती. पण तीही फोल ठरली. 

फेस्टिवलचे सिनेमे न आवडणाऱ्या लोकांसाठीही काही चित्रपट या गर्दीत होते. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो भविष्याची एेशी तैशी, आदेश, लादेन आला रे आला या चित्रपटांचा. पण या चित्रपटांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. याशिवाय महिलाप्रधान चित्रपटांमध्ये आलेल्या निर्भया आणि हलाल या चित्रपटांनाही अपयश भोगावं लागलं आहे. हलाल हा चित्रपट शिवाजी लोटन पाटील या दिग्दर्शकाचा आहे. राजन खान यांच्या कथेवर आधारीत या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा बाळगल्या जात होत्या. पण, हलाललाही हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 

एकाच दिवशी सात चित्रपट प्रदर्शित होऊनही एकही यशस्वी न ठरल्याने मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. पण गमतीदार बाब अशी की या सात चित्रपट पडल्याचा फायदा बाॅईज या चित्रपटाला झाला आहे. इतर चित्रपटांना प्रेक्षक नसल्याने बाॅईजचे शो मात्र वाढवण्यात आल्याची माहीती वितरक समीर दीक्षित यांनी दिली. मराठी चित्रपटसृष्टीच्या सद्यस्थितीबाबत बोलताना दीक्षित म्हणाले, गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेले सातही चित्रपट पडले. खरंतर या प्रत्येक चित्रपटाचा बाज वेगळा होता. पण थिएटरच्या वेळा आणि थिएटर्सची उपलब्धता पाहता संयुक्तीक वेळा जुळून न आल्याने त्याचा फटका या चित्रपटांना बसला. त्यांना गर्दी नसल्याने बाॅईजची गर्दी वाढली आहे. परिणामी त्याचे शोही वाढवण्यात आले आहेत. 

 

 

Web Title: marathi movies flop story soumitra pote esakal news