esakal | पॅडमॅन : अनोख्या 'सुपरहिरो'ची यशोगाथा (चित्रपट परीक्षण)
sakal

बोलून बातमी शोधा

Padman Movie

पॅडमॅन : अनोख्या 'सुपरहिरो'ची यशोगाथा (चित्रपट परीक्षण)

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

आर. बाल्की दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करतो व त्यासाठी अरुणाचलम मुरुगन यांची सत्यकथा सांगतो. लक्ष्मीचं (अक्षयकुमार) लग्न गायत्रीशी (राधिका आपटे) होतं या प्रसंगापासूनच कथेची सुरवात होते. गायत्रीला मासिक पाळी आल्यावर ती 'सायकल पुसायलाही वापरले जाणार नाही', असं फडकं वापरत असल्याचं लक्ष्मीच्या लक्षात येतं. तो बाजारातून तिला सॅनिटरी नॅपकिन आणून देतो, मात्र त्याची किंमत आणि लाज यांमुळं गायत्री ते वापरत नाही. पेशानं वेल्डर असलेला लक्ष्मी स्वतःच नॅपकिन बनवण्याचा प्रयत्न करतो. अपयशी होतो, पुन्हा प्रयत्न करतो. आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी महिलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला वेडं ठरवलं जातं, गायत्रीहीसह त्याच्या बहिणी व आईही त्याला सोडून जातात. 

लक्ष्मी दुसऱ्या गावात राहून आपले प्रयोग सुरूच ठेवतो, यासाठी खूप कष्ट सोसतो. फक्त दोन रुपयांत सॅनिटरी नॅपकिन तयार करणारं मशिन तयार करतो. एमबीए करणारी परी (सोनम कपूर) त्याला अपघातानं भेटते आणि लक्ष्मीचं आयुष्य बदलतं. त्याच्या उत्पादनाला हळूहळू मार्केट मिळू लागतं आणि त्याच्या कार्याची दखल घ्यायला विविध संस्था पुढं येतात. संयुक्त राष्ट्र संघातील भाषण व पद्मश्री पुरस्कारामुळं त्याचं नाव व कार्य जगभरात पोचतं... 

मुरुगनची ही सत्यकथा अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे आणि दिग्दर्शकानं ती अत्यंत नेमकेपणानं सादर केली आहे. कथा काही ठिकाणी रेंगाळत असली, तर नेटक्‍या आणि थेट प्रसंगांमुळं कंटाळवाणी ठरत नाही. मासिक पाळी आणि पॅड या विषयी चारचौघात बोलण्याबद्दल असलेली लाज आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न पोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. या विषयावर थेट बोलण्याचे आणि उपाय शोधण्याचं धाडस समाजात निर्माण करण्यासाठी चित्रपट महत्त्वाचे पाऊल ठरतो, हेच त्याचं यश. 

अक्षयकुमारनं 'टॉयलेट एक प्रेमकथा'नंतर पुन्हा एकदा आपली सुपरस्टारची इमेज बाजूला ठेवत समाजाला भेडसावणाऱ्या या एका प्रश्नावर आधारित चित्रपटात भूमिका साकारल्याबद्दल तो अभिनंदनास पात्र ठरतो. लक्ष्मीची भूमिका त्यानं अगदी मनापासून केली आहे. विनोदी प्रसंगांत तो 'भूलभुलैया' चित्रपटातील भूमिकेसारखी संवादफेक व देहबोली पकडतो. गंभीर प्रसंगांतील त्यांचा अभिनय सर्वोत्कृष्ट झाला आहे. राधिका आपटेनं नवऱ्याच्या वेडामुळं खचलेली, धास्तावलेली गायत्री छान साकारली आहे. सोनमची एन्ट्री खूपच उशिरा असली, तरी तिच्या पात्राचं लिखाण नेटकं असल्यानं तिची भूमिका लक्षात राहते. 

एकंदरीतच, महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावरील हा चित्रपट पाहण्यासारखा असून, त्यातून अपेक्षित संदेश घेतल्यास देशात केवळ 18 टक्‍क्‍यांवर असलेले महिलांचे पॅड वापरण्याचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होईल... 
स्टार : 3.5 

महेश बर्दापूरकर 

loading image
go to top