आठवणीतील श्रीदेवी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पण, दोघींमध्ये शीतयुद्ध असल्यामुळे आणि म्हणूनच दोघी एकत्र एका कार्यक्रमात येण्याचे टाळत असताना, मला कितपत त्या होकार देतील याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण, श्रीदेवी यांना भेटल्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले....

मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी तारका हा कार्यक्रम आयोजित करताना महेश यांचा श्रीदेवी यांच्याशी संपर्क आला. या अनुभवावरुन ते सांगतात, 'माझ्या 'मराठी तारका' या कार्यक्रमाच्या 500व्या शो ला श्रीदेवी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. माझ्या वयाच्या 12 व्या वर्षी म्हणजेच 1982 मध्ये मी श्रीदेवी यांचा 'हिम्मतवाला' हा चित्रपट हडपसरच्या वैभव थिएटरमध्ये पहिला होता. त्यानंतर मग पुढे व्हीसीआर आणून अनेकदा आमच्या चाळीत श्रीदेवी यांचे चित्रपट पाहायला मिळाले. त्यांचे चित्रपट पाहताना कधी स्वप्नातही वाटले नव्हते की याच श्रीदेवीला कधी आपल्याला भेटता येईल आणि त्यांच्याबरोबर एकत्र एका स्टेजवर उभे राहता येईल. पण, 500व्या 'मराठी तारका' कार्यक्रमाची तारीख अगोदर निश्‍चित झाली आणि माधुरी दीक्षित हिने कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले.' 

'त्यानंतर माझ्या डोक्‍यात विचार आला की श्रीदेवी यांना ही बोलवूयात! पण, दोघींमध्ये शीतयुद्ध असल्यामुळे आणि म्हणूनच दोघी एकत्र एका कार्यक्रमात येण्याचे टाळत असताना, मला कितपत त्या होकार देतील याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण, श्रीदेवी यांना भेटल्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले. त्यांच्या राहत्या घरापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी येईपर्यंत त्यांना ट्रॅफिकमुळे दीड तास लागला. त्यांच्याच चित्रपटातील गाण्यांवर मराठी तारकांनी केलेली नृत्य पाहून त्या खूष झाल्या. तारकांबरोबर त्यांनी फोटोही काढले. सत्कारासाठी त्या स्टेजवर आल्या तेव्हा त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी उपस्थित प्रेक्षक आतुर झाले होते. त्यांच्या 'आप सबको मेरा नमस्कार' या शब्दानेही प्रेक्षकांना धन्य झाले. श्रीदेवी यांना प्रत्यक्ष पाहायला मिळणे ही एक सुवर्णसंधी. कार्यक्रम संपवून परत जाताना त्यांच्याबरोबर मीही लिफ्टमध्ये होतो, तेव्हा अचानक त्या पाठीच्या वेदनेमुळे पटकन खाली बसल्या. मी विचारल्यावर त्यांनी सांगितले, की गेली काही दिवसांपासून त्यांना पाठीचा त्रास सुरू आहे. मी त्यांना सांगितले की एवढा त्रास असताना त्या कशा काय आल्या कार्यक्रमाला? यावर त्यांनी मला उत्तर दिले, "महेशजी आपको कमिटमेंट दी थी.' दिलेल्या शब्दाला जगणारी श्रीदेवी पाहून त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला. नंतर दोन-तीन दिवसांनंतर मी गिफ्ट म्हणून दिलेली पैठणी आवडल्याचे सांगायला त्यांनी आवर्जून मला फोन केला. त्यांच्या सहवासामुळे श्रीदेवी या नावाची जादू अजूनही माझ्यावर आहे आणि त्याही कायम आठवणीत राहतील.'

Web Title: marathi news sridevi dead memories marathi taraka program mahesh tilekar