esakal | लग्नाची गोष्ट : सुखी संसाराची ‘फत्तेशिकस्त’
sakal

बोलून बातमी शोधा

Fatteshikast Movie

लग्नाची गोष्ट : सुखी संसाराची ‘फत्तेशिकस्त’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दिग्पाल लांजेकर यांची ओळख आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांच्या पत्नीचं नाव अनघा लांजेकर. अनघा या एका मल्टिनॅशनल कंपनीत ग्राफिक डिझाइनर म्हणून कार्यरत आहेत. ‘गुगल’च्याही काही मोबाईल अॅप्सचे डिझाईन्स अनघा यांनी केले आहेत. दोघांच्याही मनात असलेल्या कलेच्या आवडीनं त्यांना एकत्र आणलं. पुण्याच्या संस्कारभारतीमध्ये अनघा चित्रकला विभागात होत्या, तर दिग्पाल नाट्य विभागात होते. तिथंच एका वर्कशॉपदरम्यान त्यांची ओळख झाली. सेट डिझाईनिंगचीही आवड असल्यानं काही दिवसांनी अनघा नाट्यवर्गातही सामील झाल्या. तिथं एकत्र काम करत असताना अनघा आणि दिग्पाल यांच्यात चांगली मैत्री झाली आणि पुढं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत.

दिग्पाल यांनी सांगितलं, ‘‘अनघा नेहमी हसतमुख असते. तिचा स्वभाव हा खूप मनमिळाऊ आहे. ती खूप स्पष्टवक्ती आहे. मनात एक आणि ओठांवर दुसरंच, असं तिचं कधीही नसतं. तिला जे काही वाटत असेल, ते ती मोकळेपणानं समोरच्याला सांगते. तिचा हा गुण मला विशेष आवडतो. मी सुरुवातीला थोडा चिडका होतो, पण इतकी वर्षं तिच्यासोबत राहून माझ्यातला चिडचिडेपणा बराच कमी झाला आहे. आम्हा दोघांनाही काम करत राहायला फार आवडतं आणि हीच आमच्या स्वभावातली समान गोष्ट आहे. ती उत्कृष्ट चित्रकार आहे. अनघा माझ्या कामात वेळोवेळी मला सपोर्ट करत आली आहे. मी कायम कामात असल्यानं तू घरी वेळ देत नाहीस, अशी तक्रार ती कधीही करत नाही. ती माझ्या प्रत्येक कामाबद्दल खरी खरी प्रतिक्रिया देते. एखादी गोष्ट आवडली, तर ती त्याचं कौतुक करतेच, पण नाही आवडलं तर ती तेही खरं खरं सांगते. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती जितकी चांगली बायको आहे, सून आहे तितकीच ती उत्तम आईही आहे. आई म्हणून तिची पेशन्स लेव्हल भरपूर जास्त आहे. तिचं काम, आमचं घर हे सगळं अनघा मनापासून करत असते, तिचं मुलीकडंही तितकंच लक्ष असतं. तिची शाळा, अभ्यास, तिला काय हवं नको ते बघणं हेही ती उत्तमरीत्या सांभाळते.’’

अनघा म्हणाल्या, ‘‘दिग्पाल हा खूप कामसू आहे. त्याला सतत काही ना काही काम करायचं असतं. कामाच्या बाबतीत तो अत्यंत पॅशनेट आहे. त्यानं दिग्दर्शित केलेल्या सगळ्या चित्रपटांच्या सेटवर मी गेले आहे. दिग्दर्शक म्हणून तो खूप स्ट्रीक्ट असतो. त्यानं दिग्दर्शित केलेल्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांचं लेखनही त्यानंच केलं असल्यानं त्याला पक्क माहीत असतं, एखाद्या सिनमध्ये काय अपेक्षित आहे. कामाच्या बाबतीत त्याला सगळं परफेक्टच लागतं. त्याचं वेगवेगळ्या विषयांवर वाचन कायम चालू असतं, तर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर असल्यावर तो तितकाच गप्पिष्ट, मनमिळाऊ आहे. तसंच तो खूप समजूतदारही आहे. कामानिमित्त बऱ्याच वेळा तो घरापासून दूर असतो, परंतु घरी आल्यावर तो जास्तीत जास्त वेळ घरच्यांना देतो. बाबा बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावर आमची मुलगीही खूष असते. ते दोघंही एकमेकांबरोबर खेळून, गप्पा गोष्टी करून छान वेळ घालवतात.’’ तर अनघा यांना दिग्पालच्या एक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या तिन्ही बाजू आवडतात. त्यांनी आतापर्यंत केलेली प्रत्येक कलाकृती अनघा यांना भावली आहे.

दिग्पाल यांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड. गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या ‘शिवकाल’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबऱ्यांचा खंड दिग्पाल यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचला होता. तेव्हा ज्यांच्याबद्दल प्रेक्षकांना कमी माहिती आहे, अशा काही विरांची अधिक माहिती मिळवून त्यांचे शौर्य मोठ्या पडद्यावरून सर्वांसमोर आणलं, तर आपल्या कलेचं सार्थक होईल, असं त्यांना वाटलं. त्याप्रमाणं ते आठ वेगवेगळे शिवकालीन पराक्रम चित्रपटाच्या माध्यमातून आणणार आहेत. या चित्रपटांच्या संचाला ‘शिवराजा अष्टक’ असं त्यांनी नाव दिलं आहे. त्यातील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि ‘पानवखिंड’ रिलीजसाठी तयार आहे. तर बाकी चित्रपटांवर त्यांचे काम सुरू आहे.

- दिग्पाल, अनघा लांजेकर

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image
go to top