लग्नाची गोष्ट : ‘कलात्मक’ लग्नाची ‘सोशल’ गोष्ट!

चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांत काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव. ती चार महिन्यांपूर्वीच आनंद मानेबरोबर विवाहबद्ध झाली.
Ruchita Jadhav and Anand Mane
Ruchita Jadhav and Anand ManeSakal

चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांत काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव. ती चार महिन्यांपूर्वीच आनंद मानेबरोबर विवाहबद्ध झाली. रुचिता आणि आनंदचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आनंद हा दक्षिण मुंबईमधील नावाजलेला डेव्हलपर आहे. माने डेव्हलपर्स ही त्यांची स्वतःची कंपनी. या दोघांचं ॲरेंज मॅरेज. रुचिता आणि आनंदचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परंतु रुचिता आणि आनंदची कधीही भेट झाली नव्हती. जोडीदार शोधण्याच्या निमित्तानं ते एकमेकांना भेटले आणि पहिल्या भेटीतच या दोघांनी एकमेकांना पसंत केलं.

रुचिता आनंदबद्दल भरभरून बोलली. तिनं सांगितलं, ‘‘आनंद हा अत्यंत शांत आणि समजूतदार मुलगा आहे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, म्हणून मी त्याला आतापर्यंत कधीही चिडलेलं पाहिलेलं नाही. व्यवस्थित विचार करून तो प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होतो. तो कधीही माझ्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत नाही. तसंच तोही छोट्यातली छोटी गोष्ट माझ्याशी शेअर करतो. त्याच्या स्वभावानं तो प्रत्येक माणसाला बांधून ठेवतो. कामाच्या बाबतीत आनंद खूप डेडिकेटेड आणि अॅम्बिशिअस आहे. काही वर्षांनी आपण कोणत्या स्तरावर असणार आहोत, हे त्याच्या डोक्यात आतापासूनच पक्क झालेलं असतं आणि ते मिळवण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. फक्त कामच नाही तर त्याचं जनरल नॉलेजही अफाट आहे. त्याला सगळ्या गोष्टीबद्दल सखोल माहिती असते. गणितं सोडवण्याच्या बाबतीत त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. कामाला तो प्राधान्य देत असला, तरी माझ्या आई-बाबांसाठी काही करण्याची वेळ आल्यावर तो त्याच्या कामे बाजूला ठेवतो. त्यामुळं आनंद उत्कृष्ट मुलगा, नवरा आणि जावईही आहे, हे मी अभिमानानं सांगेन.’’

आनंदनं सांगितलं, ‘‘मनोरंजन क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल बऱ्याचदा लोकांच्या मनात काही गैरसमज असतात. लांबून बघताना या क्षेत्रात नाव कमावलेली मंडळी ही उद्धट असतील, असं लोकांना वाटू शकतं. पण रुचिता तशी अजिबातच नाही. ती खूप नम्र आहे. मी तिला मी पहिल्यांदा भेटल्यावर मला जाणवलं, की आमची कौटुंबिक मूल्यं सारखीच आहेत. लहानपणापासून आम्हाला मिळालेली शिकवण, मिळालेले संस्कार हे एकच आहेत. त्यामुळे रुचिता पहिल्यांदा आमच्या घरी आली, तेव्हा ती आम्हा कोणालाच वेगळ्या घरातली व्यक्ती वाटली नाही. तिचं बोलणं, स्वभाव लाघवी आहे. त्यामुळं आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत तिनं खास नातं तयार केलं आहे. ती आमच्या घरातली सून नाही, तर मुलगीच बनली आहे."

या दोघांचं लग्न म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या गोष्टीसारखं आहे, असं या दोघांनीही सांगितलं. चित्रपट असो, मालिका असो वा नाटक असो; कथेत पुढं काय होईल हे जसं प्रेक्षकांना माहीत नसतं, तसंच त्यांचं लग्न कसं होणार आहे याचा अंदाज या दोघांच्याही कुटुंबीयांना नव्हता. कोविडची पहिली लाट संपत आल्यावर २०२१च्या जानेवारी महिन्यात त्यांनी लग्नाची तारीख काढली, त्याप्रमाणं मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २०० माणसांची व्यवस्थाही केली. पण पुन्हा लगेच दुसरी लाट आली आणि सगळे नियम बदलले. २०० माणसांची यादी कमी करून १०० माणसांनाच आमंत्रित करण्याचं त्यांनी ठरवलं. पण एप्रिल महिन्यात सरकारने ५० माणसांना लग्नसमारंभात जमण्याची परवानगी दिली, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लग्नाच्या तीन दिवस आधीपर्यंत यांना माहीतच नव्हतं, की लग्न होईल की नाही. पण एकत्र मिळून नव्या आयुष्याला सुरुवात करायला आणखी उशीर नको, म्हणून या दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्न ठरलेल्या तारखेलाच करण्याचं ठरवलं. आनंदच्या पाचगणी येथील बंगल्यात त्यांचं लग्न घरच्याच २५ माणसांमध्ये थाटामाटात पार पडलं.

- रुचिता जाधव, आनंद माने

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com