esakal | लग्नाची गोष्ट : प्रेमळ नात्याच्या उंच झोका I Marriage Story
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmishtha raut and tejas desai

लग्नाची गोष्ट : प्रेमळ नात्याच्या उंच झोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई

मराठी मनोरंजन सृष्टीतली एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. गेल्याच वर्षी ती तेजस देसाई याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. तेजस एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यांचं अरेंज मॅरेज. शर्मिष्ठाचं स्थळ आल्यावर तेजसला शर्मिष्ठा राऊत कोण हे माहित नव्हतं. त्यानं तिचं कामही पाहिलं नव्हतं, पण पहिल्याच भेटीत तेजस शर्मिष्ठाच्या प्रेमात पडला आणि तसं त्यानं तिला सांगितलंही. पण त्यावेळी शर्मिष्ठानं विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला. कालांतरानं तिलाही तेजस आवडू लागला. या व्यक्तीबरोबर आपलं संपूर्ण आयुष्य आपण सुखात घालवू शकतो, हे जाणवल्यानंतर शर्मिष्ठानं तेजसला होकार दिला. आता दोघंही मिळून त्यांच्या नात्याचा झोका उंच नेत आहेत.

शर्मिष्ठानं तेजसबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘तेजसचा मनोरंजन क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नसला, तरी तो उत्तम फोक डान्सर आहे. त्यामुळं कला क्षेत्रात कसं दिवस रात्र काम असतं, हे तो आधीपासून जाणून आहे. त्यामुळं तो मला माझ्या कामात खूप समजून घेतो, मला वेळोवेळी प्रोत्साहन देतो. तो मुळातच समजूतदार आहे. एखाद्या गोष्टीचा पुढचा-मागचा विचार करून तो कोणताही निर्णय घेतो. त्याच्यात समोरच्या व्यक्तीला समजवण्यासाठी लागणारे पेशन्स भरपूर आहेत. तो प्रॅक्टिकल आहे, पण तितकाच भावनिकही आहे. त्याच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो खूप जीव लावतो. तो जगन्मित्र आहे. काळ वेळ न बघता त्याच्या मदतीला हजर असतो. वेळेच्या बाबतीत तो खूप काटेकोर आहे. त्याच्या संगतीत राहून हळूहळू मीही वेळ पाळायला शिकले आहे. मला जबाबदारी घेणारा मुलगा माझा जोडीदार म्हणून हवा होता आणि तेजसच्या रूपाने तो मला मिळाला.नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांच्या दिशेने समान पावलं टाकली पाहिजेत. तसं न झाल्यास नातं ओझं वाटायला लागतं. आज तेजस आणि मी बरोबरीने पावलं टाकत आहोत. त्यामुळं आमच्यातलं नातं खूप सुंदर पद्धतीनं खुलत आहे, आम्ही दोघं छान करिअर करत आहोत.’’

तेजस म्हणाला, ‘‘शर्मिष्ठा भावनिक आहे, केअरिंग आहे. तिचं हे प्रेम माणसांसाठी असतंच, पण ती प्राण्यांवरही प्रेम करते. तिच्यामुळं मीही आणखी प्राणीप्रेमी झालो आहे. तिच्यात समोरच्याला माफ करण्याचा मोठेपणा आहे. एखाद्यानं तिला दुखावल्यास काही वेळासाठी ती रागावते, पण नंतर त्या व्यक्तीला माफ करून पुन्हा आधीसारखाच जीव लावते. प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम ती करते. ती सुगरण आहेत. तिच्या हातचे रसगुल्ले तर द बेस्ट! अभिनय क्षेत्रात काम करत असूनही ती स्वतःचं काम आणि घर हे दोन्ही उत्तमप्रकारे सांभाळते. ती कधी बाहेरगावी शूट करत असली, तरीही तिकडून तिचा एक डोळा हा घराकडं असतो. तिथं राहून ती घरी कोणाला काय हवं नको ते बघत असते आणि याबद्दल मला तिचं फार कौतुक वाटतं.’’

शर्मिष्ठानं ‘चि. व चि. सौ. कां’ या चित्रपटात साकारलेली भूमिका तेजसला अतिशय आवडली. तर शर्मिष्ठाची स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या एन्ट्री झाली आहे. शर्मिष्ठा म्हणाली, ‘‘या मालिकेत मी कॅमिओ करतेय. जवळपास १० वर्षांनी मी ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत काम करतेय, त्यामुळं मला मस्त वाटतंय. एक ग्रामीण भागात राहणारी ही बाई आहे. असा रोल मी याआधी केला नव्हता. त्यामुळं या भूमिकेतून मला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. माझ्या इतर रोल्सवर जसं सगळ्यांनी प्रेम केलं, तसंच या भूमिकेलाही मिळेल याची मला खात्री आहे.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image
go to top