आज 'ती' हवी होती...

श्रीकांत कात्रे shrikant.katre@esakal.com
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

खरं म्हणजे आज तिची आठवण यावी, हे साहजिक आहे. केवळ चेहऱ्यावरील भावभावनांच्या आविष्कारामुळे रसिकांच्या हृदयात तिने जागा मिळविली होती. अनेकांची स्वप्ने तिने जागवली. संघर्षाला सामोरे जाताना करारी, कणखर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या स्त्रीची प्रतिमा मनामनांत कोरणारा अभिनय तिने साकारला. तिच्या चेहऱ्यावरील वेदनांनी अनेकांची हृदये हेलावली. माणसाच्या जगण्यात एक वेगळा आनंद निर्माण करणाऱ्या भूमिका जिवंत करून तिने अनेकांचे भावविश्‍व समृद्ध केले. हो... तीच ती. स्मिता पाटील. 

खरं म्हणजे आज तिची आठवण यावी, हे साहजिक आहे. केवळ चेहऱ्यावरील भावभावनांच्या आविष्कारामुळे रसिकांच्या हृदयात तिने जागा मिळविली होती. अनेकांची स्वप्ने तिने जागवली. संघर्षाला सामोरे जाताना करारी, कणखर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या स्त्रीची प्रतिमा मनामनांत कोरणारा अभिनय तिने साकारला. तिच्या चेहऱ्यावरील वेदनांनी अनेकांची हृदये हेलावली. माणसाच्या जगण्यात एक वेगळा आनंद निर्माण करणाऱ्या भूमिका जिवंत करून तिने अनेकांचे भावविश्‍व समृद्ध केले. हो... तीच ती. स्मिता पाटील. 

आजचाच दिवस. वर्ष 1986. 13 डिसेंबर. ती गेली. तिच्या डोळ्यातील भावभावनांचा कल्लोळ आपल्यासाठी ठेवून गेली. 
पुण्यात 17 ऑक्‍टोंबर 1955 ला तिचा जन्म झाला आणि मुंबईत 13 डिसेंबर 1986 ला तिचा मृत्यू झाला. अवघ्या 31 वर्षांच्या आयुष्यात तिने आपल्या मोहमयी अभिनयाने रसिकांच्या मनावर गारूड केले. तिच्या साध्याच पण देखण्या चेहऱ्याने अनेकांना लुभावले. चेहऱ्यावरच्या अदाकारीने अनेकांना रडविलेही आणि घडविलेही. पुण्यात तिचे शिक्षण झाले. वडील शिवाजीराव गिरीधर पाटील राजकारणी, तर आई विद्याताई समाजसेवेत. पुण्यातीलच 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेतून तिने अभिनयाचे धडे गिरवले. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिकेचे काम करण्याची संधी तिला मिळाली. छोट्या पडद्यावरचा हा वेगळा चेहरा अनेकांना भावला. 

चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेत्री असण्याचा तो काळ. देखण्या चेहऱ्यांनी अभिनयाच्या जादूने अनेक अभिनेत्रींनी मोठा पडदा व्यापून टाकला होता. त्यांच्या तुलनेत हा सावळा चेहरा तसा साधाच ठरणारा होता. पण तिची प्रतिभा काही औरच होती. तिच्या नजरेतील चमक वेध घेणारी होती. पण या चेहऱ्यावरील रेष अन् रेष काही व्यक्त करीत होती. डोळ्यांचा नजराणा दिलखेचक होता. सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर हा चेहरा रसिकांच्या हृदयाला छेदून जाईल, हे श्‍याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्दर्शकाने जाणले. आपल्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून तिला संधी दिली. मग सुरू झाला तो प्रवास स्मिताचा होता. 

सळसळतं चैतन्य तिच्या चेहऱ्यावर होतं. अभिनयाच्या समृद्ध उधळणीतून तिने माणसाच्या आयुष्यात भावभावनांचे रंग ठसविले. रसिकांच्या मनावर त्या काळात व्यावसायिक सिनेमाचं साम्राज्य होतं. त्याचवेळी 'आर्ट फिल्म' पाहणारा एक मनस्वी वर्गही होता. शबाना आझमी या अभिनेत्रीने अशा वास्तववादी चित्रपटातून आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. शबानाच्या तोडीस तोड अभिनयाने छाप पाडत स्मितानेही अशा चित्रपटातून आपला ठसा उमटवला. तिचा अभिनय बावनकशीच ठरत गेला. अनेक चित्रपटांतून तिने स्त्री विश्‍वालाच जणू समृद्धता मिळवून दिली. करारी, कणखर आणि स्वतंत्र बाण्याच्या महिलेची भूमिका निभावताना तिने भूमिकेत जीव ओतला. त्या भूमिकेत समरसून जाणे आणि अतिशय सहजतेने ती साकारत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यात ती यशस्वी ठरली. हिंदी, मराठी चित्रपटातील तिच्या अनेक भूमिका संस्मरणीय आहेतच. पण बंगाली, गुजराती सिनेमातही तिची अदाकारी आकर्षणाचा पैलू बनून राहिली. 

स्मिताच्या भूमिका आदर्शवादीही राहिल्या. स्त्री प्रतिमांची ओळख तिच्या अभिनयातून सिद्ध होत गेली. 'मंथन'मधील एखाद्या बंडाचे नेतृत्त्व करणारी महिला असो की 'मिर्च मसाला'मधील जहाल कडवी सोनाबाई असो. किंवा अमानुष अत्याचारित महिलेची 'आक्रोश'मधील तिची भूमिका असो. तिच्या डोळ्यातील वेदना असो की अंगार. साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेत हा अभिनय जगणे समृद्ध करीत होता. म्हणूनच श्‍याम बेनेगल यांच्यापासून सत्यजित रे, रमेश सिप्पी, मृणाल सेन, केतन मेहता यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी स्मिताला आपल्या चित्रपटातून ताकदीच्या भूमिका दिल्या. 'चमचमणाऱ्या चांदण्याजैसी...' असे म्हणत 'सामना'तील मास्तर श्रीराम लागूंसमोर येणारी स्मिता मराठी मनांत अजून ताजी आहे. गिरीश कर्नाड, जब्बार पटेल अशा दिग्गजांबरोबर साकारलेल्या 'उंबरठा'तील भूमिका आदर्शच ठरली. जैत रे जैत, सर्वसाक्षी अशा चित्रपटातील अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतही तिचे वेगळे स्थान राहिले. 

निशांत, मंथन, भूमिका, गमन, आक्रोश, चक्र, अर्थ, अर्धसत्य, मंडी, सुबह, मिर्च मसाला अशा हिंदी चित्रपटांची नावे पाहिली तरी तिच्या अभिनयाच्या क्षमतेची उंची लक्षात येते. अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या कल्पित आत्मचरित्रावर आधारित 'भूमिका' चित्रपटही वेगळा ठरला. आर्ट फिल्ममधील तिची भूमिका विचार करायला प्रवृत्त करायची. जगातील स्त्री प्रतिमेची विविध रुपे तिने आपल्या भूमिकेतून जिवंत साकारली. त्या प्रतिमांचे आकर्षण अनेकांच्या मनात आज अजूनही जागे आहे. 
आर्ट फिल्मचा प्रयोग अलीकडे तुलनेने होत नसला तरी त्यातील स्त्री व्यक्तीरेखांचा प्रभाव आजच्या काळातही रूजून आहे, ही स्मिताच्या अभिनयाची ताकद विस्मयकारक ठरली. आर्ट फिल्ममध्ये तिचा प्रभाव असला तरी व्यावसायिक चित्रपटांकडे तिने दुर्लक्ष केले, असे म्हणणे चुकीचेच ठरेल. राजेश खन्नाबरोबरच्या आखिर क्‍यो, अमृत, नझराना अशा सिनेमांबरोबर आणखी काही सिनेमेही तिने केले. पण महासुपरस्टार अमिताभ बच्चनबरोबरचे नमकहलाल आणि शक्ती या चित्रपटांतून तिची उमटलेली मोहोर महानायकाच्या अभिनयाला साजेसी ठरली. 

'आज रपट जाये तो हमे ना उठई यो' म्हणत भरपावसात बच्चनबरोबर भिजणारी स्मिता आठवली तरी अनेकांची मने मोहरून जातात. 'की पग घुंगरू बांध मीरा नाची थी' म्हणत धडपडणाऱ्या अमिताभला सावरणारी नजर स्मिताचीच होती. 'उंबरठा' तील 'गगन सदन तेजोमय'चा सूर आणि स्मिताचा चेहरा याची सांगड अनेकांच्या आठवणींना स्वप्नांची झालर लावणारी आहे. 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' गुणगुणारी स्मिता अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. आणि 'तुम्हारे बिन जी ना लागे घर मे' म्हणणाऱ्या स्मिताची हाक अनेकांना अजूनही साद घालते. अनेकांच्या मनात आर्त हळवेपणा जो रुजलाय तो जणू स्मिताच्या डोळ्यांतूनच. चंदेरी दुनियेतील अवघ्या 11 वर्षांची कारकीर्द. चित्रपट अभिनेता राज बब्बर याच्याशी तिने लग्न केलं. त्यावेळी अनेक अर्थांनी अनेकजण त्यावेळी हळहळले असतील. 

मीनाकुमारी, मधुबाला यांच्यासारखीच तीही चटका लावून गेली. प्रतीकचा जन्म झाला आणि स्मिता आपल्यातून गेली. त्या घटनेला आज 30 वर्षे झाली. तरीही आजच्या पिढीतही तिचे 'फॅन' आहेत, हे तिच्या अभिनयाचे यश मानावे लागेल. स्मिता एक मराठी मुलगी. स्मिता एक भारतातील अव्वल अभिनेत्री. तिच्या हावभावांनी अस्वस्थ होणारी मने जिवंत आहेत तोपर्यंत तिची आठवण जागी राहणार आहे. म्हणूनच तिच्याविषयीच्या अभिमानाने उर भरून येतोच. वाटून जाते 'आज ती असती तर...' आणि डोळ्यात फक्त पाणी येते. 

Web Title: memoirs of smita patil