Miss U Mister : सिद्धार्थ-मृण्मयीचा रोमँटिक टीझर लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 May 2019

'अग्निहोत्र' या मराठी मालिकेनंतर प्रकाशझोतात आलेली जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे आता 'मिस यू मिस्टर' हा चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटाचा रोमँटीक टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 

'अग्निहोत्र' या मराठी मालिकेनंतर प्रकाशझोतात आलेली जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे आता 'मिस यू मिस्टर' हा चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटाचा रोमँटिक टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 

यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’ दृश्ये या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली असून त्याचाच बोलबाला सध्या सोशल मिडियावर होतो आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे अजून एक नवीन पोस्टर देखील आज प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. ‘मिस यू मिस्टर’ 28 जूनला प्रदर्शित होत आहे.

‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर आज प्रकाशित झालेल्या टीझरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”

अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miss You Mister Marathi movie teaser launched