नवा चित्रपट: भाई : व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

bhai
bhai

रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता

भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत सागर देशमुखला सापडलेली नेमकी लय, शुभांगी गोखले यांनी उभ्या केलेल्या सुनीताबाई, संगीत यांच्या जोरावर हा भागही प्रेक्षकांना एका 'अष्टपैलू खेळिया'ची छान ओळख करून देतो. 

'भाई'च्या या भागाची सुरवात मागील भागातील मैफलीच्या पार्श्‍वभूमीवर 'इंद्रायणी काठी..' या गीताच्या पार्श्‍वभूमीवर होते. भाई आकाशवाणी आणि दूरदर्शनवर स्थिरावले आहेत आणि त्यांचे लिखाण, नाटकांचे प्रयोगही सुरू आहेत. दूरदर्शनला स्थिरस्थावर करण्यात त्यांचे योगदान अनेक प्रसंगांतून अधोरेखित होते आणि पंडित नेहरूंच्या एका राजकीय कार्यक्रमाला प्रसिद्धी न देण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. आधीच नोकरीमुळं लिखाणामध्ये मनासारखं काही करता येत नसल्याची खंत असलेले भाई तत्काळ दूरदर्शनच्या नोकरीचा राजीनामा देतात आणि सुनीताबाईंच्या सल्ल्यावरून 'बटाट्याची चाळ'चे प्रयोग सुरू होतात. हे प्रयोग पाहून साक्षात प्र. के. अत्रे भाईंचं तोंडभरून कौतुक करतात आणि गेल्या दहा हजार वर्षांत असा प्रयोग पाहिला नसल्याची पावतीही देतात.

दरम्यानच्या काळात देशात आणीबाणी लागू होते आणि भाई आपला विदूषकाचा मुखवटा उतरवून सरकारविरोधात राज्यभर सभा घेतात, सरकार पडते आणि भाई पुन्हा आपला मुखवटा चढवून प्रेक्षकांत मिसळतात. त्यांना राज्यमंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या खासदाराला ते म्हणतात, ''आधीच्या सरकारनं चूक केली म्हणून मी विदूषकाचा मुखवटा उतरवून रस्त्यावर उतरलो. तुम्हीही अशी चूक केल्यास हा मुखवटा पुन्हा उतरवून तुमच्या विरोधात रान उठवेन...'' यानंतरच्या त्यांच्या आयुष्यातला राजकीय संघर्ष येतो युतीच्या राजवटीदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेवरून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो व सत्काराच्या भाषणात भाई सरकारच्या ठोकशाही वृत्तीवर जोरदार टीका करतात. बाळासाहेब ठाकरेही आपल्या भाषेत 'मोडके पूल' म्हणून त्यांच्यावर टीका करतात. पुलंच्या भाच्याला मुंबईवरून पुण्यात आणण्यासाठी सरकारची मदत घ्यावी का, असा प्रश्‍न जब्बार विचारतात आणि त्याला नकार देताना सुनीताबाईंना (शुभांगी गोखले) हे प्रसंग चित्रपटात आठवतात. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील इथं नाव बदलून येणारा सखाराम गटणे, गिरीश कुलकर्णीनं अफलातून साकारलेला बबडू ऊर्फ बारक्‍याही येऊन जातात. 'ती फुलराणी' या नाटकाचं व त्यातील भक्ती बर्वे यांनी साकारलेल्या भूमिकेचंही नेमकं स्मरण कथेच्या ओघात होतं. 

पंडित कुमार गंधर्वांचं आजारपण, त्यांच्या घरी जाऊन हिराबाई बडोदेकर, भीमसेन, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे व पुलंनी साकारलेली मैफल व त्यात कुमारांना 'ऐजैयो सारे...' म्हणत पुन्हा सापडलेला सूर हा चित्रपटातील सर्वाधिक हळवा प्रसंग ठरावा. अशा अनेक प्रसंगाची मालिका हे या भागाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. बाबा आमट्यांच्या आनंदवनात गेलेले असताना कुष्ठरोग्यांनी कष्टांनी पिकवलेली भाजी समाजकंटक फेकून देतात तेव्हा बाबा आणि भाईंच्या चेहऱ्यावरचे भाव, आनंदवनात भाईंनी सादर केलेले 'नाचरे मोरा...' हे गाणं, कुमार गेल्यानंतर भाईंची प्रतिक्रिया, मूल होऊ न देण्याच्या निर्णयाचा उतारवयात सुनीताबाईंना झालेला पश्‍चात्ताप व त्यांचं भाईंनी केलेलं सांत्वन अशा अनेक प्रसंगांचा त्यात उल्लेख करता येईल. पुलंच्या विनोदी स्वभावाची झलक दाखवणारे व त्यांची संगीताची आवड अधोरेखित करणारे प्रसंगही छान जमून आले आहेत. 

सागर देशमुखला या भागात खूपच चांगली लय सापडली आहे. हळव्या प्रसंगातील त्याचा अभिनय, स्टेजवर 'चाळ' सादर करतानाचा हावभाव आणि विशेषतः कुमार गेल्यानंतरची भाईंची प्रतिक्रिया या प्रसंगात त्याचा अभिनय ए-वन. शुभांगी गोखलेंनी साकारलेल्या वृद्धापकाळातील सुनीताबाई या भागातही एकदम परफेक्‍ट. इरावती हर्षेंनीही सर्वच प्रसंग अत्यंत दर्जेदार अभिनयानं छान रंगवले आहेत. गिरीश कुलकर्णी या भागातील सरप्राइज पॅकेज ठरावं. इतर सर्वच कलकारांचा अभिनय नेटका झाला आहे. 
पु. ल. देशपांडे नावाच्या 'अष्टपैलू खेळिया'ला सिनेमाच्या चौकटीत बसवणं खरंच अवघड काम होतं आणि ते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नक्कीच छान पेललं आहे. त्यात अनेक त्रुटी आणि चुकाही राहून गेल्या असतील, मात्र नव्या पिढीला पुलंबरोबरच त्यांच्या समकालीन अनेक दिग्गज कलाकारांची महती व ओळख या निमित्तानं झाली, हेही मोठंच यश. पुलंसारख्या व्यक्ती गेल्यानंतरही त्यांचा साहित्य दरवळ अनेक दशकं थोडाही कमी होत नाही, हा अनुभव आपण घेतोच. त्यांनी जगलेल्या व रंगवलेल्या मैफलीची ही झलक पुलंचं मोठेपण अधोरेखित करते आणि हळवंही करते, हेच या मालिकेचं यश म्हणावं लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com