Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'
Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

सगळं गुडीगुडी, हिरो आणि हिरोईनचं प्रेम होणार, व्हिलन त्यांना विरोध करणार, काही वेळा घरातूनच त्यांच्या प्रेमाला विरोध असणार, त्यातून एखाद दोन गाणी बागेत म्हणा किंवा समुद्र किनारी चित्रित केली जाणार त्यामुळे प्रेक्षकांना आपणही काही काळ जगप्रवास केल्याचा फील येणार, सरतेशेवटी हिरो आणि व्हिलनमध्ये जोरदार मारामारी होऊन एकाचवेळी पन्नास गुंडांना आपल्या दैवी शक्तीनं पराभूत करणाऱ्या तद्दन बॉलीवूडपटांची मोठी रेलचेल कायम आहे. त्यात अजूनही काही बदल नाही. मात्र ऐन दिवाळीच्या काळात जय भीम सारखा एखादा चित्रपट येतो आणि एक मोठा बॉम्ब फोडून आपल्याला खाडकन् जागं करतो हे ही काही कमी नाही.

सध्या सगळीकडे जय भीमची चर्चा आहे. त्याला कारणही तसचं आहे. या चित्रपटानं प्रेक्षकाचं, दर्दी रसिकांचं, समीक्षक आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे पावणेतीन तासांच्या चित्रपटामध्ये जेणेकरुन तो प्रेक्षकांना भावला? त्याचं कारण या चित्रपटातील सच्चेपणा.. त्यामुळे या चित्रपटाची उंची कमालीची वाढली आहे. त्यातील एकएक प्रसंग अंगावर काटा उभा करतात. ज्यावेळी राजाकन्नुची पत्नी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते तेव्हा पोलीस तिला आपणहून घरी सोडतो अशी विनवणी करतात. ती त्याला नकार देते. ज्या हातांनी आणि लाथांनी संगीनीला त्यांनी गुरासारखं मारलं तेच नराधम जेव्हा तिच्या पायाशी लोटांगण घेताना दिसतात ते दृश्य ज्यापद्धतीनं चित्रित केलं आहे की, आपण जय भीम पाहिला नसता तर खूप काही पाहायचं राहून गेलं असतं ही भावना वाढीस लागल्य़ाशिवाय राहणार नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण अजूनही एका वेगळ्या स्वप्नात आहोत असे वाटते. जय भीमच्या वाट्याला गेल्यानंतर दक्षिणेतील एका राज्यात अद्याप विशिष्ट जात समुहाच्या बाबत असणारा व्देष पाहायला मिळतो. त्यांच्या अशिक्षित, अडाणी, आणि गरिबीचा फायदा घेऊन आपल्या स्वार्थासाठी राजकीय हेतूनं केला जाणारा वापर खूप अस्वस्थ करणारा आहे. टी जे ज्ञानवेल लिखित जय भीमनं सध्य़ा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान तयार केले. त्याची ताकद आहे हे पुन्हा एकदा नव्यानं अनुभवण्यासाठी जय भीम पाहायलाच हवा. स्वार्थासाठी संविधानाची केली जाणारी पायमल्ली, जातींमध्ये व्देष पसरवणे आणि आपला उत्कर्ष साधून घेणारी बडी सरकारी धेंड किती रानटी असू शकतात हे जय भीममध्ये प्रभावीपणे दिसून येते.

सूर्यानं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यानं साकारलेली चंद्रु वकील हा कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याची आतापर्यतची सर्वात प्रभावी भूमिका म्हणून या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. टी जे ज्ञानवेलनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये लिजोमोल जोस, के मणिकंदन, राजिशा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. प्रकाश राज यांनीही आपल्या विशेष भूमिकेतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आदिवासी लोकांची जीवनशैली, त्यांचा जीवनक्रम, अजूनही त्यांना दोनवेळच्या भाकरीसाठी करावा लागणारा संघर्ष, आपण भलं न् आपलं काम भलं यानुसार काम करणाऱ्या त्या जमातीच्या वाट्याला येणाऱ्या वेदना दिग्दर्शकानं कमालीच्या संयतपणे पडद्यावर साकारल्या आहेत. ते पाहताना आपण थक्क होऊन जातो.

साप पकडून ते पुन्हा रानात सोडून देणे, इतर छोटी मोठी कामं करणाऱ्या त्या आदिवासी जमातीतील लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यातील एकावर चोरीचा आळ घेतला जातो. त्याला अटक होते. पोलीस काही करुन त्यानं गुन्हा कबूल करावा म्हणून त्याचा अमानुष छळ करतात. यासगळ्यात जे काही घडतं ते किती भयानक आहे हे जाणून घेण्यााठी जय भीमच्या वाट्याला जावं लागेल. तो चित्रपट पाहावा लागेल. संविधानच्या मुलभूत नियमांची होणारी पायमल्ली सत्तेवर असलेले निगरगट्ट लोकं कशापद्धतीनं करतात हे जाणून घेण्यासाठी जय भीम पाहणं गरजेचं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top