
चंदेरी चमचम - सुभाषचंद्र जाधव
‘घराघराचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’ असं गदिमांनी एका गाण्यात म्हटलं आहे. अगदी खरं आहे ते. फुलणाऱ्या फुलांचं नशीबही वेगळं असतं. काही फुलं परमेश्वराच्या चरणांवर जाऊन पडतात, तर काही प्रेतावर उधळली जातात. माणसाचंही तसंच असतं. अंगी कर्तृत्व असूनही त्याच्या पदरात यशाचं दान पुरेपूर पडेलच, याची ग्वाही कोणाला देता येते का?
मुबारक बेगम या गुणी गायिकेचं उदाहरण घ्या ना. आजही या गायिकेचं नाव डोळ्यांसमोर आलं, की तिनं गायलेल्या ‘देवता तुम हो मेरा सहारा’ (दायरा), ‘मुझको अपने गले लगा लो’ (हमराही), ‘हमारी याद आयेगी’ (हमारी याद आयेगी), ‘हम हाले दिल सुनायेंगे’ (मधुमती), ‘बेमुर्रब्बत बेवफा बेगाने दिल आप है’ (सुशीला), नींद उड जाये तेरी’ (जुआरी) अशा अनेक चित्रपटांतील गाणी कानांभोवती गुंजारव करू लागतात.
गळ्यात साक्षात ‘दर्द’ घेऊन आलेल्या या गायिकेची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं होतं. त्या वेळी त्यांनी मला त्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या त्या काळातील ‘पावली’चा (म्हणजेच चार आणे) एक मजेशीर किस्सा सांगितला होता. भारत सरकारने चलनातून ‘पावली’ हे नाणं केव्हाच बंद केलं आहे. आता यापुढं नव्या पिढीला ‘पावली’ म्हणजे काय, याची माहिती होणार नाही आणि ‘पावली’चं नाणंही पाहायला मिळणार नाही.
तर या ‘पावली’चा किस्सा सांगताना मुबारक बेगम सांगत होत्या, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी माझ्या आवाजात ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयोंमें यु हमारी याद आयेगी’ हे शीर्षक गीत ध्वनिमुद्रित केलं. रेकॉर्डिंग संपलं आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकीत त्या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक केदार शर्मा यांनी माझ्या हातावर बक्षिसी ठेवली- चार आणे.
ती बक्षिसी पाहून मी तर सर्दच झाले. केदार शर्मा हे त्या काळचे फार मोठे दिग्दर्शक होते. राज कपूर त्यांना गुरुस्थानी मानायचे. अशा या मोठ्या निर्माता-दिग्दर्शकाने बक्षिसी म्हणून अवघी पावली द्यावी. केवढी ही कंजुषी. मी मनात विचार करू लागले.
माझी ही स्थिती स्नेहल भाटकर यांनी लगेच ओळखली. केदार शर्मा यांच्या गुणग्राहकतेची चांगलीच पारख असलेल्या भाटकर यांनी माझा गैरसमज तिथल्या तिथंच दूर करण्यासाठी मला सांगितलं. ‘मुबारक, शर्मासाहेबांच्या या बक्षिसीला तू मुळीच कमी लेखू नकोस. शर्मासाहेब जेव्हा खूष होऊन चार आणे बक्षिसी देतात, तेव्हा तो कलावंत भविष्यात नक्कीच नावलौकिक मिळवतो.’’
भाटकर यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर मुबारक बेगमच्या आवाजाचा उपयोग नौशाद, सचिनदेव बर्मन, शंकर जयकिशन, सलिल चौधरी यांसारख्या दिग्गज संगीतकारांनी आवर्जून केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.