esakal | अटक टाळण्यासाठी राज कुंद्राकडून घेतली लाच, पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

अटक टाळण्यासाठी राज कुंद्राकडून घेतली लाच, पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना २५ लाख रुपयांची लाच देऊन व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने अटक टाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप एका आरोपीने केला आहे. पॉर्न रॅकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूर या कंपनीने मार्च महिन्यात एका ई-मेलद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) यासंबंधी तक्रार केली होती. एसीबीने एप्रिलमध्ये ही तक्रार मुंबई पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात पाठवली. मात्र या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 'मिड डे'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Mumbai Crime Branch officers took Rs 25 lakh from Raj Kundra Accused alleged slv92)

अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. अमेरिकेतील फ्लिझ मूव्हीजने (आधी न्यूफ्लिक्स म्हणून ओळखली जात होती) ई-मेलद्वारे ही तक्रार केली होती. मार्च महिन्यात पोलिसांनी या कंपनीचा मालक श्रीवास्तवच्या दोन बँक खात्यांमधील साडेचार कोटी रुपये जप्त केले होते. कानपूर आणि इंदूर शाखांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती.

एसीबीने पुढील तपासासाठी एप्रिल महिन्यात तो ई-मेल मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात पाठवल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संबंधित ई-मेलमध्ये लाचबाबतचे व्हॉट्स अॅप चॅटचे स्क्रीनशॉट्सदेखील होते. मात्र व्हॉट्स अॅपच्या चॅटमध्ये राज कुंद्राचा उल्लेख कुठेच नसल्याचं, अधिकाऱ्यांनी सांगितलं. "पैशांची मागणी केली असेल तरच एसीबी चौकशी करून सापळा रचू शकते. या प्रकरणात पैशांची देवाणघेवाण आधीच झाली होती. त्यामुळे आरोपांनुसार कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे (मुंबई पोलिसांकडे) तक्रार पाठवली गेली", अशी माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'मिड डे'ला दिली.

हेही वाचा: राज कुंद्राने लॉकडाउनचा उचलला फायदा, दिवसाला करायचा लाखोंची कमाई

न्यूफ्लिक्सच्या ईमेलमध्ये असाही दावा केला आहे की, त्यांच्याकडूनही तेवढीच रक्कम मागितली गेली होती. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी राज कुंद्रा आणि इतरांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा श्रीवास्तवचं नाव समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पॉर्नोग्राफीक फिल्म तयार केल्यानंतर ते श्रीवास्तवला पाठवले जायचे आणि त्यानंतर ते फिल्म्स न्यूफ्लिक्स, हॉटहिट आणि हॉटशॉट्स या अॅप्सवर अपलोड केले जायचे, असं आरोपींनी तपासादरम्यान सांगितलं.

"या प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने अधिक तपास केला आणि सबळ पुरावे गोळा केले. त्यानंतरच अटकेची कारवाई झाली आणि आरोपपत्रात त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले", असं सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे म्हणाले. कुंद्राकडून पोलिसांनी लाच घेण्याच्या प्रकरणाविषयी विचारले असता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उत्तर देणं टाळलं. "मला प्रश्न-उत्तरांचे सत्र आवडत नाही. तुम्ही थांबवा किंवा मी ब्लॉक करेन," असं त्यांनी पत्रकाराला उत्तर दिलं.

बुधवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलीस प्रवक्ते डीसीपी चैतन्य एस म्हणाले की, त्यांना या आरोपांविषयी कोणतीच माहिती नाही.

loading image