पॅचअपचा "मुरलेला' फॉर्म्युला...(मुरांबा)

मंगळवार, 6 जून 2017

दिग्दर्शन व कथा : वरुण नार्वेकर 
भूमिका : सचिन खेडेकर, अमेय वाघ, मिथिला पालकर, चिन्मयी सुमीत. 
श्रेणी : 3 
 

वरुण नार्वेकर दिग्दर्शित "मुरांबा' हा चित्रपट आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधाच्या संकल्पना, त्याची मागील पिढीशी केलेली तुलना, दोन्हीतील योग्य आणि अयोग्य मुद्दे यांची मांडणी हलक्‍या-फुलक्‍या पद्धतीनं करतो. आजच्या तरुणाईची ब्रेकअप आणि पॅचअपची भाषा आणि पूर्वीचे मुरांब्याप्रमाणं खोलपर्यंत मुरलेले प्रेमसंबंध हा विरोधाभास चित्रपट नेमका दाखवतो. वेगळं कथानक, त्याची मांडणी, कलाकारांचे अभिनय व चटपटीत संवाद या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, एखाद्या नाटकासारखी सर्व मांडणी असल्यानं चित्रपट खूप बोलत राहतो व अनेकदा कंठाळी होतो. 

"मुरांबा'ची कथा आहे आलोक (अमेय वाघ) व इंदू (मिथिला पालकर) या तरुणांची. गेल्या तीन वर्षांपासून एकत्र असणाऱ्या या जोडीचं ब्रेकअप होतं आणि कथा सुरू होते. आलोकला या गोष्टीचा विशेष धक्का बसत नाही. मात्र, त्याचे आई-वडील (सचिन खेडेकर व चिन्मयी सुमीत) यांना त्याच्या वागण्यातील बदल दिसतो. त्यांना आलोककडून या ब्रेकअपचं नेमकं कारण जाणून घ्यायचं असतं, तर आलोक ताकास तूर लागू देत नसतो. आलोकचे वडील वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून त्याच्याकडून खरं कारण काढून घेण्याचा प्रयत्न सुरू करतात आणि भन्नाट प्रसंगांची मालिका सुरू राहते. 
कथेचा बहुतांश भाग आलोकची मानसिकता, आई-वडिलांबरोबरचे त्याचे संबंध, इंदूमधील कमतरतांचा त्यानं वाचलेला पाढा यांमध्ये खर्च पडतो व त्यामुळं इंदूची बाजू पहिल्या टप्प्यात प्रेक्षकांना समजत नाही. ती खूप उशिरानं प्रेक्षकांसमोर येते. स्वतःमधील कमतरतांना जोखणारा, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणारा, त्यासाठी गरज पडल्यास मदत घेणारा व प्रसंगी तिलाही मदत करणारा जोडीदार मुलींना हवा असतो आणि नेमकी हीच अपेक्षा आलोक पूर्ण करत नसल्याचे दुःख इंदूला असतं. 
या सर्व भाग अनेक तुकड्यांमध्ये व फ्लॅशबॅकच्या सढळ वापरातून प्रेक्षकांसमोर येतो. कथेचा आत्मा असलेलं ब्रेकअपचं कारण जाणून घेताना प्रेक्षकांचाच "मुरांबा' होतो. चटपटीत संवादांमुळं कथेतील कंटाळवाणा भाग सुसह्य होतो. आलोक आणि इंदू, तसेच त्याचे वडिलांबरोबरचे अनेक संवाद तुफान हसे वसूल करतात. आलोक, इंदू आणि आलोकचे आई-वडील एकत्र जेवायला जातात हा प्रसंग छान रंगला आहे. कथा सकाळी सुरू होऊन रात्री संपते, त्यामुळं तिला मुळातच चांगला वेग आहे. मात्र, संवादांपेक्षा प्रसंगांचे प्रमाण अधिक असते, तर नाटकाऐवजी चित्रपटाचा योग्य फिल आला असता. छायाचित्रण आणि संगीत या बाजू जमून आल्या आहेत.

 सर्वच कलाकारांचा अभिनय व त्यांच्यातील केमिस्ट्री हे चित्रपटाचं वैशिष्ट्य. सचिन खेडेकर यांनी आपल्या मोठ्या अनुभवातून आलोकचे वडील छान रंगवले आहेत. त्यांच्या अभिनयातील उत्स्फूर्तता अनेक प्रसंगांना उठावदार बनवते. अमेय वाघच्या वाट्याला आलेली भूमिका आव्हानात्मक आहे. आपल्या विचारांवर ठाम असलेला, चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारण्यासाठी झगडणारा तरुण त्यानं ताकदीनं साकारला आहे. त्याचं विनोदाचं टायमिंगही दाद देण्याजोगं. मिथिला पालकर आधुनिक विचारांच्या तरुणीच्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. भावुक प्रसंगात तिचा अभिनय उठून दिसतो. चिन्मयी सुमीतनं आईच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

 एकंदरीतच, अभिनय व संवादाच्या पातळीवर उजवा असलेला, पॅचअपचा मुरलेला फॉर्म्युला सांगणारा हा चित्रपट कथेच्या मांडणीमध्ये कमी पडल्यानं पूर्ण समाधान करण्यात तोकडा ठरतो... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muramba movie review