रिचा म्हणाली, माझं आयुष्यही त्या तनिष्कच्या जाहिरातीसारखं

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

रिचा ही अभिनेता अली फैजलसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांनी नुकतेच मुंबईमध्ये एक घर भाड्याने घेतले असून ते लवकरच लग्न करणार असल्य़ाची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई - अखेर टाटा ग्रुपला त्यांची ती वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली. अशाप्रकारे एखादी जाहिरात मागे घेण्याची टाटांची ही बहूधा ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियातून या जाहिरातीवर टीका केली. काहीजणांनी विरोध केला तर काहींनी जाहिरातीतून दिल्या जाणा-या संदेशाचे कौतूक केले. यासगळ्यात  अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपले आयुष्यही त्या जाहिरातीसारखे असल्याचे सांगून नेटक-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिचा ही अभिनेता अली फैजलसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांनी नुकतेच मुंबईमध्ये एक घर भाड्याने घेतले असून ते लवकरच लग्न करणार असल्य़ाची चर्चा सुरु झाली आहे. खरं तर ते दोघे याच वर्षी लग्न करणार होते इतकेच नव्हे तर त्यांनी निमंत्रण पत्रिकाही वाटल्या होत्या. मात्र कोरोनामुळे त्यांनी तो निर्णय पुढे ढकलल्याचे कळते आहे. आता यासगळ्यामागे तनिष्कच्या जाहिरातीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, यावर रिचाने त्या जाहिरातीचा संदर्भ देऊन आपली भावना व्यक्त केली आहे. जेव्हा ती जाहिरात प्रसिध्द झाली तेव्हापासून तिच्यावर बंदी घालावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. लव्ह जिहादचा प्रचार त्या जाहिरातीतून होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिचा म्हणाली की, आता माझीही अवस्था ही त्या तनिष्काच्या जाहिरातीसारखी झाली आहे. याचे कारण म्हणजे मला अलीच्या कुटूंबियांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आणि माझ्या कुटूंबाकडून अलीलाही. मला अशा व्यक्तिंचा राग आहे ज्यांना आपल्या आसपास अशाप्रकारचे प्रेममयी वातावरण नको आहे. आणि अशाप्रकारे लग्न करणा-यांचा ते राग करतात. मला हे चूकीचे वाटते. या जाहिरातीबद्दल रिचाने एक व्टिट केले होते त्यात तिने ती जाहिरात  सुंदर असल्याचे म्हटले होते. आता दर्शकांनी मिर्झापूर 2 बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे अलीने सीएए या विधेयकाला विरोध केला होता.

अलीनेही एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की, ज्यावेळी लोकं माझ्या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करतात त्यावेळी मला वाईट वाटते. ती मालिका तयार करण्यासाठी अनेकांची कित्य़ेक दिवसांची मेहनत असते हे लोकं विसरुन जातात. आपल्या अवती भोवती जे काही चूकीचे घडते आहे त्याच्या विरोधात बोलत राहाणं मला जास्त महत्वाचे वाटते. 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My life just lilke tanshiq advertisement said by richa