esakal | "थोडीतरी लाज बाळगा"; 'मालदिव व्हेकेशन'वर असलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने फटकारलं

बोलून बातमी शोधा

nawazuddin siddiqui

"थोडीतरी लाज बाळगा"; 'मालदिव व्हेकेशन'वर असलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने फटकारलं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

एकीकडे देशात कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली असताना मालदिव किंवा इतर ठिकाणी सुट्ट्यांच्या आनंद घेणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर सर्वच स्तरांतून टीका होतेय. याआधी लेखिका शोभा डे, अभिनेत्री श्रुती हासन यांनी परदेशात फिरायला गेलेल्या सेलिब्रिटींना खडेबोल सुनावले होते. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. "इथे लोकांना दोन वेळचं जेवण नीट मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाच बाळगा", अशा शब्दांत नवाजुद्दीनने सेलिब्रिटींना फटकारलं आहे.

'स्पॉटबॉय ई' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, "एकीकडे जगभरात कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली असताना हे सेलिब्रिटी व्हेकेशनचे फोटो पोस्ट करत आहेत. इथे लोकांना जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा. सुट्ट्यांवर जाणं तितकं चुकीचं नाही जितकं त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं आहे."

हेही वाचा : 'सत्य खाडकन् थोडाबीत मारल्यासारखं समोर आलं'; फुलवा खामकर भावूक

"ते लोक कशाबद्दल बोलतील? अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदिवला तमाशा बनवून ठेवलाय. त्यांची पर्यटन उद्योगाशी काय व्यवस्था आहे मला माहित नाही. पण किमान माणुसकीखातर, तुमच्या व्हेकेशनचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. इथे सर्वत्र भीषण परिस्थिती आहे. कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांसमोर दिखावा करू नका", असं तो पुढे म्हणाला. सेलिब्रिटींचं अनुकरण सर्वसामान्य करतात. त्यामुळे त्यांनी भान ठेवून वागलं पाहिजे, असं मत नवाजुद्दीनने मांडलं.

गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, दिशा पटान, सारा अली खान, जान्हवी कपूर हे सेलिब्रिटी मालदिवला फिरायला गेले आहेत. त्याआधी माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, समंथा अक्किनेनी, श्रद्धा कपूर त्याच ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते.