esakal | नेहा धूपिया म्हणाली, '5 बॉयफ्रेंड असणं मुलीची मर्जी' अन् आता...

बोलून बातमी शोधा

Neha Dhupia answers trollers
नेहा धूपिया म्हणाली, '5 बॉयफ्रेंड असणं मुलीची मर्जी' अन् आता...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून नेहा धूपिया सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. रोडीज शो दरम्यान, एका स्पर्धकाने रिलेशनशीपमध्ये फसवणूक झाल्याने कानफाटात लगावल्याचे सांगितले.  या स्पर्धकाला नेहाने चांगलेच सुनावले होते. यावेळी 'पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी आहे' या स्टेटमेंटवरुन नेहाला ट्रोल करण्यात आले होते. तसेच तिचे मीम्स सुध्दा सोशल मिडियावर व्हायल झाले. अखेर नेहाने याबाबत मौन सोडत ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

नेहाने केला तिच्या स्टेटमेंटबाबत खुलासा
मी गेल्या पाच वर्षांपासून रोडीज या शोचा भाग आहे. या शोमुळे देशातल्या सर्व भागातील स्पर्धकांची एक टीम बनवण्याची संधी मला मिळाली. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून जे काही सुरू आहे, ते आवडलेले नाही. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये मी हिंसेच्या विरोधात आवाज उठवला होता. गर्लफ्रेंडने फसविले म्हणून एकाने तिच्यावर हात उगारल्याचे सांगितले. मला  ही गोष्ट अत्यंत चुकीची वाटली. फसवणूक करणाऱ्यांची मी साथ देत नाही, मात्र हिंसेला माझा विरोध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला हे फार दुर्दैवी आहे.

प्रत्येकाला आपल्या आवड-नावडीनुसार जगण्याचा हक्क असतो मात्र, एखाद्याला मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माझे कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार यांना वाईट पद्धतीचे मेसेज येत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर शिव्यांचे मेसेज येत आहेत. माझ्या मुलीच्या सोशल मीडिया पेजवर अश्लील व अर्वाच्च भाषेत मेसेज लिहिले जात आहेत. मी हे अजिबात सहन करणार नाही. महिलांसोबत होणाऱ्या हिंसेच्या मी कायम विरोधात आहे आणि असेन. एका महिलेच्या तुलनेत पुरुषाचं बळ अधिक असतं. घरगुती हिंसाचार ही फक्त भारतातील नाही तर जगभरातील मोठी समस्या आहे. जर तुम्ही हे सहन करत असाल तर आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत.

नक्की काय घडले?
नेहा सध्या टिव्हीवरील एमटीव्ही वाहिनीवरील "रोडीज' या शोमध्ये जज म्हणून काम करते आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असे सांगितले. नेहाला स्पर्धकाचे वागणे चुकीचे वाटले त्यावरुन तिने त्याला चांगलेच सुनावले होते. ‘एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही, असे सांगून नेहाने त्याने केलेल्या हिंसेचा निषेध केला होता. तसेच 'पाच प्रियकरांची निवड करणं हा सर्वस्वी त्या मुलीचा निर्णय आहे. असेही ती म्हणाली होती. या स्टेटमेंटवरुन नेहाला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले होते.