अजय देवगणची 'थँक गॉड' ची तयारी, मधुर, तुषार कपूरच्या चित्रपटांची घोषणा 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

अजयनं काही दिवसांपूर्वी त्याच्या 'थँक गॉड' चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे.  

मुंबई - अजय देवगणला मागील वर्षी चांगलेच लाभदायी ठरले होते. त्याच्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने भरपूर कमाई केली होती. आता अजय देवगणनं त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाला सुरुवात केली आहे. त्याच्या मुहूर्ताचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेयर केले आहेत. केवळ अजयनं नव्हे तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि तुषार कपूरनंही त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे.

अजयनं काही दिवसांपूर्वी त्याच्या 'थँक गॉड' चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अजय पुन्हा एकदा दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यासमवेत काम करणार आहे. यापूर्वी त्यानं त्यांच्याबरोबर इश्क नावाचा सिनेमा केला होता. अजयच्या थँक गॉड नावाच्या चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा आणि रकूल प्रीत सिंह यांची मुख्य भूमिका आहे. 2021 वर्षी मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमधून चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यामुळे आता पूर्ण क्षमतेनं चित्रपट निर्मिती सुरु झाली आहे. 

21 जानेवारीपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. अजयनं चित्रिकरणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ते चित्रपट मुहूर्ताचे फोटो असून त्यात अजय देवगण हजर नव्हता. त्यावेळी निर्माता भुषण कुमार, इंद्र कुमार आणि सिध्दार्थ मल्होत्रा उपस्थित होते.

याशिवाय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही त्यांच्या लॉकडाऊन नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा फर्स्ट लूक त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. या चित्रपटात प्रतिक बब्बर, सई ताम्हणकर, आहना कुमरा, श्वेता प्रसाद बसु, प्रकाश बेलावाडी आणि जरीन शिहाब यांच्या भूमिका आहेत. त्याच्या चित्रिकरणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे.

अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटाची निर्मिती करणा-या तुषार कपूरनं आता पुन्हा एका चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. त्यानं त्याच्या मारिच या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यात तो प्रसिध्द कलाकार नसरुद्दीन शहा यांच्या बरोबर दिसणार आहे. एका पोलीस अधिका-याची भूमिका तुषारनं केली आहे. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेयर केले आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Bollywood films of Ajay Devgn thank god Madhur Bhandarkar India lockdown and Tushar Kapoor starts mariach