चित्रपटगृहांतही 'झाला बोभाटा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

पुणे - अस्सल गावरान बाजाचा आणि गावाकडच्या धमाल विनोदांनी तुडुंब भरलेला "झाला बोभाटा' हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. 6 जानेवारी) प्रदर्शित होतोय. या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने "सकाळ'च्या शिवाजीनगर कार्यालयाला नुकतीच भेट दिली.

पुणे - अस्सल गावरान बाजाचा आणि गावाकडच्या धमाल विनोदांनी तुडुंब भरलेला "झाला बोभाटा' हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. 6 जानेवारी) प्रदर्शित होतोय. या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने "सकाळ'च्या शिवाजीनगर कार्यालयाला नुकतीच भेट दिली.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दीपाली अंबिकार, तेजा देवकर, मयुरेश पेम, मोनालिसा बागल आदी कलाकारांचा सहभाग आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अनुप जगदाळे यांचे असून, किंग क्रिएशन आणि डीजी टेक्‍नो एन्टरप्रायझेस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. चित्रपटातील गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी कंपोज केली असून, गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. ग्रामीण भागातील गैरव्यवहार, स्वच्छता, पाणीटंचाई अशा अनेक प्रश्‍नांना कंटाळलेल्या गावाची व्यथा आणि त्याचसोबत आदर्श गाव म्हणजे काय? याची उत्तम प्रकारे मांडणी यामध्ये केली आहे. त्यातच दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते, पण ती बाई कोण? हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमके तेच नाव ऐकण्यासाठी गावातील लोक प्रयत्न करतात, अशा घडामोडींवर या चित्रपटाची कथा फिरते. भरपूर कलाकार आणि प्रत्येक पात्राला तितकेच महत्त्व दिले असल्याने या चित्रपटाची कथा अधिक जिवंत बनली आहे.

निर्माते साईनाथ राजाध्यक्ष म्हणाले, ""प्रेक्षकांना मनसोक्त हसविणारी ही कलाकृती आहे. संपूर्ण चित्रपट ग्रामीण ढंगाचा असल्याने गाव आवडणाऱ्या प्रत्येकासाठी ही पर्वणी असणार आहे.'' दिग्दर्शक जगदाळे म्हणाले, ""कथा अतिशय नवीन असून, कलाकारांनी ती उत्तमरीत्या फुलवली असल्याने संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना खिळवून टाकणारा आहे. शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.''

Web Title: new marathi movie