esakal | चित्रपटाचं वेड! अवलियाने आयफोनवर शूट केला 'पिच्चर'
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपटाचं वेड! अवलियाने आयफोनवर शूट केला 'पिच्चर'

चित्रपटाचं वेड! अवलियाने आयफोनवर शूट केला 'पिच्चर'

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक क्षेत्रांमध्ये उलथापालथ झाली. अनेक उद्योगव्यवसाय ठप्प झाले. याचा परिणाम काही अंशी चित्रपटसृष्टीवरही पडला आहे. राज्यात सध्या चित्रीकरणावर बंदी असल्यामुळे अनेक मालिका व चित्रपटांचं चित्रीकरण परराज्यात सुरु आहे. मात्र, यावेळीदेखील मोजक्या कलाकार व क्रू मेंबरसोबतच हे चित्रीकरण पार पाडावं लागत आहे. विशेष म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य राखत एका अवलियाने कमीत कमी कलाकार व क्रू मेंबरच्या मदतीने चक्क आयफोनवर (iphone) संपूर्ण चित्रपट (movie) शूट केला आहे. त्यामुळे या दिग्दर्शकाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (new marathi movie pichyar shot on iphone)

तीन तासांच्या कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण करायचं असेल तर त्यासाठी मोठी टीम, तंत्रज्ञ, कॅमेरा असा मोठा सेटअप लागतो. परंतु, दिगंबर वीरकर या अवलियाने चक्क आयफोनवर संपूर्ण चित्रपट शूट केला आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक, पटकथा लेखक, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही जबाबदाऱ्या त्यानेच पार पडल्या आहेत.

साताऱ्यातील वाई तालुक्यात असलेल्या बावधन येथे दिगंबर वीरकर या तरुणाने आयफोनवर 'पिच्चर' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे आयफोनवर चित्रीत होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट करण्यासाठी दिगंबरने कोणतंही प्रशिक्षण घेतलं नसून या चित्रटातून त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

"सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे आणि हे असे माध्यम आहे जे आपल्यातल्या कलागुणांना जोपासण्याचे बळ देते. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी सिनेमा हे एक मोठे माध्यम मला मिळाले आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गायकवाड, निलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या माझ्या मित्रांचा खारीचा वाटा आहे. आयफोनवर चित्रित करत मी हा 'पिच्चर' सिनेमा दिग्दर्शित केला असून हा सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत प्रेक्षकांना पाहता येणार आहे, असं दिगंबर म्हणाला.

दरम्यान, या चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.