esakal | नवा चित्रपट : पंगा
sakal

बोलून बातमी शोधा

Panga

अश्‍विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ हा चित्रपट एका मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीची गोष्ट आहे. तिच्या आकांक्षांची गोष्ट आहे. कमबॅक करताना येणारी संकटं, आव्हानं, संयम या सर्वांशी पंगा घेणाऱ्या गृहिणीची गोष्ट आहे. कबड्डी या खेळाच्या पार्श्‍वभूमीवर घडणारी आणि आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर मोठं दिव्य पार करणाऱ्या गृहिणीची ही गोष्ट तुम्हाला हसवते, भावुक करते आणि आणि आयुष्याशी पंगा घेण्याचा फंडाही शिकवते.

नवा चित्रपट : पंगा

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

‘कमबॅक मॉम’ची सुपर ‘रेड’
अश्‍विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ हा चित्रपट एका मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीची गोष्ट आहे. तिच्या आकांक्षांची गोष्ट आहे. कमबॅक करताना येणारी संकटं, आव्हानं, संयम या सर्वांशी पंगा घेणाऱ्या गृहिणीची गोष्ट आहे. कबड्डी या खेळाच्या पार्श्‍वभूमीवर घडणारी आणि आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर मोठं दिव्य पार करणाऱ्या गृहिणीची ही गोष्ट तुम्हाला हसवते, भावुक करते आणि आणि आयुष्याशी पंगा घेण्याचा फंडाही शिकवते. कंगाना राणावतचा पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय, यज्ञ भसीन या बालकाराकासह सर्वच अभिनेत्यांनी तिला दिलेली छान साथ, नेटकं दिग्दर्शन, बांधीव पटकथा यांच्या जोरावर चित्रपट अविस्मरणीय अनुभव देतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चित्रपटाची नायिका आपल्या पतीला म्हणते, ‘मुझे तुम्हारी तरफ देखकर अच्छा लगता है, बच्चे की तरफ देखकर औरभी अच्छा लगता है, लेकिन जब मै खुदको देखती हूं, तो कुछ भी अच्छा नहीं लगता...’ संसारामुळं करिअर अर्ध्यावर सोडाव्या लागलेल्या जवळपास प्रत्येक भारतीय गृहिणीची ही व्यथा. ती अधोरेखित करतच ‘पंगा’ची सुरुवात होती. जया निगम (कंगना राणावत) भारतीय कबड्डी संघाची कप्तान होती व तिनं अनेक मैदानं गाजवली. मात्र प्रेमविवाहानंतरही करिअर करीत असताना ती गरोदर राहते व जन्मलेलं मूल अशक्त असल्यानं तिला खेळाला अर्ध्यावर सोडण्याशिवाय पर्याय नसतो. लग्नानंतरची सात वर्षं उलटून गेली आहेत. पती प्रशांत (जस्सी गिल) व मुलगा आदित्य (यज्ञ भसीन) यांच्यासमवेत तिचा संसार सुखात सुरू आहे. जयाची सहखेळाडू व मैत्रीण मिनू (रिचा चढ्ढा) आता कबड्डी कोच म्हणून करिअर करते आहे.

मात्र घरात असा एक प्रसंग घडतो, की जयाची कबड्डीपटू म्हणून कमबॅक करण्याची इच्छा उचल खाते. ‘ना मेरी कमर रही, ना उमर,’ असं म्हणत वयाच्या ३२व्या वर्षी ती पुन्हा मैदानात उतरते. मिनूकडून प्रशिक्षण मिळवत रेल्वेच्या संघात प्रवेश मिळवते आणि भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी सज्ज होते...

या कथेचा शेवट महत्त्वाचा नसून, जयाचा प्रवास अधिक महत्त्वाचा आहे. मध्यमवर्गीय घरात, जिथं पती आणि मुलगा घरातील महिलेवर शंभर टक्के अवलंबून असतो, कोणत्याही क्षेत्रात कमबॅक करणं किती मोठं दिव्य असतं हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शिकेनं केला आहे. या प्रवासादरम्यान घर सोडावं लागतं आणि मग नवरा स्वयंपाक कसा करणार, तो मुलाला वेळेत शाळेत कसं पोचवणार इथपासून मुलाची तब्येत, त्याची औषधं, गॅदरिंगची तयारी असे शेकडो विषय सामोरे येतात. या सर्वांवर मात करीत यशस्वी होण्यासाठी आयुष्याशी काय प्रकारचा पंगा घ्यावा लागतो, त्यात कितीदा कपाळमोक्ष होतो आणि पुन्हा उठण्यासाठी काय जिद्द लागते याची ही गोष्ट. ती तितकीच हळूवारपणे, भावभावनांचे सर्व पदर उलगडून दाखवत पेश केली गेली आहे व त्यामुळंच ती भिडते आणि सहजच प्रेरणादायी ठरते. 

हा चित्रपट दिग्दर्शिकेइतकाच कंगना राणावतच आहे. गृहिणी आणि कबड्डी खेळाडू या ‘दुहेरी’ भूमिकेतील तिनं सांभाळलेली देहबोली केवळ अप्रतिम. मुलगा शिंकला तरी काळीज तुटणारी आई आणि प्रतिस्पर्ध्यावर त्वेषानं तुटून पटणारी खेळाडू एकाच वेळी साकारण्यासाठी तिनं केलेल्या गृहपाठाचं कौतुक व्हायलायच पाहिजे. जस्सी गिलनं साकारलेला तिचा पती अत्यंत नेमका, प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा. रिचा चढ्ढानंही बिनधास्त कोचच्या भूमिकेत धमाल केली आहे. स्मिता तांबे व नीना गुप्ता छोट्या भूमिकेत भाव खाऊन जातात. यज्ञ भसीन या बालकलाकाराच्या तोंडचे संवाद आणि त्याचा अभिनय मजा आणतात.     

एकंदरीतच, एका ‘कमबॅक मॉम’नं संसार सांभाळत कबड्डीच्या मैदानात मारलेली सुपर ‘रेड’ तुम्हाला जगण्याची नवी उमेद देईल व त्यासाठीच हा पंगा एकदा अनुभवायला हवा. 

loading image
go to top