नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

Tanhaji-Movie
Tanhaji-Movie

सह्याद्रीच्या मातीत किती गौरवगाथांची बीजं कधीमधी पेरली गेली. त्यांचे वृक्ष झाले आणि त्यांची सोनेरी सळसळ अजूनही ऐकू येते. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वीरगाथेची सोनेरी सळसळ अशीच इतिहासाच्या पानातून ऐकू येते. दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट तीच गाथा अतिशय भव्य प्रकारे मांडतो. हा चित्रपट थरारक, भव्य, प्रेरणादायी आहे; अभिमान वाढवणारा आहे आणि खुर्चीला खिळवून ठेवणाराही आहे. पहिल्या फ्रेमपासून तो प्रेक्षकांची पकड घेतो आणि थेट शिवकालात घेऊन जातो. अतिशय बांधीव आणि नाट्यमय संहिता, व्हीएफएक्सचा उत्तम वापर; छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय, संकलन या सगळ्याच गोष्टींमध्ये साधलेला दर्जा यांमुळे हा चित्रपट विलक्षण आनंद देतो.

पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना (शरद केळकर) काही किल्ले औरंगजेबाला (ल्यूक केनी) द्यावे लागतात-ज्यात तत्कालीन कोंढाण्याचाही समावेश आहे. नंतर औरंगजेब त्याचं साम्राज्य वाढवण्याच्या उद्देशानं कोंढाण्याचा सुभेदार म्हणून उदयभानसिंह राठोडला (सैफ अली खान) नेमतो. उदयभान कोंढाण्यावर येण्याआधीच त्याला थोपवण्याची मोहीम शिवाजी महाराज आखतात. तानाजी मालुसरे (अजय देवगण) पत्नी सावित्रीबाईंसह (काजोल) मुलाच्या-रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. त्यांना मोहिमेची माहिती कळते आणि ते ती त्यांना देण्याची विनंती करतात. भाऊ सूर्याजी (देवदत्त नागे), शेलारमामा (शशांक शेंडे) यांच्या मदतीनं ते स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता ही मोहीम कशी फत्ते करतात, याची गाथा मांडणारा हा चित्रपट.

ओम राऊत आणि प्रकाश कपाडिया यांची कथा-पटकथा आणि कपाडिया यांचे संवाद हे चित्रपटाचं बलस्थान. राऊत यांनी दिग्दर्शन करताना या गाथेतला थरार आणि त्यातलं मानवी संवेदनही कुठं कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. प्रत्येक गोष्ट भव्य मांडल्यानं परिणाम अतिशय सुंदर. तानाजींची एंट्री असलेला प्रसंग, वडिलांकडून त्यांना मिळालेल्या प्रेरणेचा प्रसंग, सावित्रीबाईंबरोबरचं त्यांचं लोभस नातं, शिरढोणच्या लढाईतला ‘ट्विस्ट’, उदयभानची निष्ठुरता दाखवणारे प्रसंग आणि अर्थातच शेवटची लढाई हे भाग कमाल आहेत. काही गाणी कमी केली असती तरी चालली असतं; पण अशा चित्रपटांचा एक पॅटर्न आता बनला आहे आणि प्रेक्षकांनीही तो मान्य आहे असं दिसतं. चित्रपटाच्या शेवटाबाबत मात्र विचार चुकला आहे. हा शेवट चित्रपटाचा आधीचा परिणाम घालवून टाकतोच; पण तो टिकवलेली गती आणि लयही बिघडवतो. या दोन गोष्टींचे डाग सोडले, तर बाकी चित्रपट विलक्षण आहे हे मात्र खरं. 

देवगण यानं तानाजींचं शौर्य, साहस, शिवरायांवरचं प्रेम, वडिलांबरोबरचं नातं, कौटुंबिक जिव्हाळा या सगळ्या गोष्टी समरसून साकारल्या आहेत. त्याच्या उत्तम भूमिकांपैकी ही एक. काजोलनं छोट्या भूमिकेत उत्कट भावदर्शन केलं आहे. सैफ अली खानला वेगळा खलनायक साकारण्याची संधी मिळाली आणि त्यानं देहबोलीपासून संवादफेकीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा उत्कृष्ट वापर करून या नाट्यात रंग भरले. शरद केळकर, देवदत्त नागे, शशांक शेंडे यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना उत्तम न्याय दिल्यामुळं चित्रपट भिनत जातो. छायाचित्रण, व्हीएफएक्स आणि पार्श्वसंगीत उल्लेखनीय. एकुणात, ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा न चुकवावा आणि भव्यतेसाठी चित्रपटगृहातच बघावा असा. विशेषतः तरुणांनी आणि लहान मुलांनी मुद्दाम बघावा. मैत्री, निष्ठा, प्रेम, शौर्य या गोष्टी केवळ व्हॉट्सॲपवरच्या सुविचारातून कळत नाहीत...या गोष्टी जगलेल्यांच्या गाथा इतिहासाच्या पानोपानी आहेत एवढंच सांगितलं तरी पुरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com