'पीएम नरेंद्र मोदी'ला 24 मेचा मुहूर्त 

वृत्तसंस्था
Saturday, 4 May 2019

"पंतप्रधान नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे स्वागत होईल आणि चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरळीत होतील, अशी आशा आहे. जबाबदार नागरिक या नात्याने आम्ही देशातील कायद्याचा आदर करतो. अनेक वेळा चर्चा केल्यानंतर आणि चित्रपटाविषयी कुतूहल आणि उत्सुकता लक्षात घेऊन निवडणुकांनंतर लगेचच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 
- संदीप सिंह, चित्रपट निर्माता 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता विवेक ओबेरॉय याने ही माहिती शुक्रवारी दिली. 

या आधी हा चरित्रपट 11 एप्रिल रोजी चित्रपटगृहांत झळकणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळातच "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला होता. या चरित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यावर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाल्यास त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो आणि एखाद्या पक्षाला झुकते माप मिळू शकते, असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले. त्यानुसार चित्रपट दाखविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली. चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. चित्रपटात मनोज जोशी, बोमन इराणी, झरिना वहाब, सुरेश ओबरॉय आदींच्या भूमिका आहेत. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे स्वागत होईल आणि चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरळीत होतील, अशी आशा आहे. जबाबदार नागरिक या नात्याने आम्ही देशातील कायद्याचा आदर करतो. अनेक वेळा चर्चा केल्यानंतर आणि चित्रपटाविषयी कुतूहल आणि उत्सुकता लक्षात घेऊन निवडणुकांनंतर लगेचच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 
- संदीप सिंह, चित्रपट निर्माता 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Biopic will release on 24th May