
Satish Kaushik Passed Away: अभिनेते सतिश कौशिक यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये खेर म्हणतात, "मला माहित आहे मृत्यू हेच या जगाचं अंतिम सत्य आहे.
पण ही गोष्ट मी माझा जवळचा मित्र सतिश कौशिकसाठी लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीवर हा असा अचानक पूर्णविराम. सतिश, तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही."
केवळ अभिनयच नव्हेत तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका कौशिक यांनी वठवल्या आहेत. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणा इथं झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांत काम केलं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.