दिल-दोस्ती : मैत्रीचा धागा पक्का...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pranav ravrane and pandurang jadhav

कामाच्या निमित्तानं भेटलेली माणसं अनेकदा आपल्या कुटुंबाचाच भाग होऊन जातात. अशाच दोन व्यक्ती म्हणजे अभिनेता प्रणव रावराणे आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव. त्यांची पहिली भेट चार-पाच वर्षांपूर्वी झाली होती.

दिल-दोस्ती : मैत्रीचा धागा पक्का...!

- प्रणव रावराणे, पांडुरंग जाधव

कामाच्या निमित्तानं भेटलेली माणसं अनेकदा आपल्या कुटुंबाचाच भाग होऊन जातात. अशाच दोन व्यक्ती म्हणजे अभिनेता प्रणव रावराणे आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव. त्यांची पहिली भेट चार-पाच वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर स्क्रिप्टच्या निमित्ताने त्यांच्या वरचेवर भेटी होत राहिल्या. या भेटींमुळे त्यांच्यातलं ट्युनिंग खूप छान जमलं आणि ते एकमेकांचे चांगले मित्र झाले.

प्रणव म्हणाला, ‘‘पांडुरंग सरांचा स्वभाव खूप छान आहे. ते नेहमीच खूप शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतात. त्यासोबतच एखादा कठीण प्रसंग आला तर त्यात खचून न जाता आता यातून कसा मार्ग काढायचा याचा ते विचार करतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. ‘गैरी’ चित्रपट बनवताना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. त्यांचा सगळा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे आणि त्यामुळं मला त्यांचा अधिक आदर वाटतो. ते शिक्षकही आहेत. प्रत्येक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना विद्या देत असतो. परंतु पांडुरंगसर असे शिक्षक आहेत, जे त्यांच्या विद्यार्थ्यांना समजूनही घेतात आणि वेळप्रसंगी थोडं कठोरही होतात. चित्रपट दिग्दर्शक म्हणून ‘गैरी’ त्यांचा पहिला चित्रपट आहे, जो त्यांनी त्यांच्या परीने चांगला बनवला आहे. परंतु मला वाटतं की त्यांच्यातला लेखक अधिक उत्तम आहे. त्यांचा पेशन्स आणि कठीण प्रसंगातून अगदी हसत खेळत मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव मला आत्मसात करायला आवडेल.’’

पांडुरंग म्हणाले, ‘‘प्रणव खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ मुलगा आहे. त्याचा स्वभाव साखरेसारखा आहे. प्रणव जिथं जाईल तिथं त्याच्या स्वभावानं वातावरण प्रसन्न करून टाकतो. त्याच्या या स्वभावामुळेच आमच्या ‘गैरी’ या चित्रपटात ‘पिन्या’ची भूमिका साकारण्यासाठी तोच योग्य आहे, असं मला वाटलं. एक अभिनेता म्हणूनही तो उत्कृष्ट आहे. दिग्दर्शकाला जितकं अपेक्षित असतं त्याच्या दहापट प्रणव त्याला देतो. त्यामुळं त्याच्याबरोबर काम करायलाही मजा येते. तो खूप मेहनती आहे आणि मन लावून तो काम करतो. प्रणव मला लहान भावासारखाच आहे. मला कधीही मदतीची गरज लागली तर प्रणव नेहमी मला मदत करायला हजर असतो. माझ्या आयुष्यातलं त्याचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे.’’

‘गैरी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना प्रणव म्हणाला, ‘‘प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता एका गहन विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यातील ‘पिन्या’ अतिशय खोडकर आणि खट्याळ असा मुलगा आहे. मात्र, आपला भाऊ मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे म्हणून तोही तिथे अॅडमिशन घेतो आणि पुढं त्याचं काय होतं हे या चित्रपटातून पाहायला मिळेल.’’ तर पांडुरंग जाधव यांनी सांगितलं, ‘‘हा चित्रपट एका दुर्लक्षित विषयावर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट एका गंभीर मुद्द्यावर आधारित असला तरी त्याची मांडणी मी विनोदी पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या प्रक्रियेत मला प्रणवने छान चांगली साथ दिली, ज्यामुळं अनेक गोष्टी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मला मदत झाली.’’

टॅग्स :Entertainment