भारतीय सिनेमाचा रंजक लेखाजोखा

सिनेमा हा भारतीयांचा श्वास आहे. भारतात विविध राज्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या सिनेसृष्टी अस्तित्वात आहेत. प्रत्येक भाषेतील सिनेमांची निराळी वैशिष्ट्ये आहेत.
Indian Cinema
Indian CinemaSakal
Summary

सिनेमा हा भारतीयांचा श्वास आहे. भारतात विविध राज्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या सिनेसृष्टी अस्तित्वात आहेत. प्रत्येक भाषेतील सिनेमांची निराळी वैशिष्ट्ये आहेत.

भारतीयांचे सिनेमाप्रेम सर्वश्रुत आहे; मात्र किती जणांना बदलत गेलेल्या सिनेमाचा इतिहास ठाऊक आहे? तो जाणून घ्यायचा असेल, तर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजनला एकदा भेट द्यायला हवी...

सिनेमा हा भारतीयांचा श्वास आहे. भारतात विविध राज्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या सिनेसृष्टी अस्तित्वात आहेत. प्रत्येक भाषेतील सिनेमांची निराळी वैशिष्ट्ये आहेत; पण जागतिक नकाशावर जेव्हा भारतातून एखादा सिनेमा जातो तेव्हा त्याला कोणत्याही भाषेचे अथवा इंडस्ट्रीचे कोंदण नसते, तो असतो फक्त भारतीय सिनेमा.

फ्रान्सच्या लुमिएर ब्रदर्सनी १८९६ मध्ये मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये चलचित्राचा पहिला खेळ आयोजित केल्यानंतर अवघ्या सतरा वर्षांनी म्हणजेच १९१३ मध्ये दादासाहेब फाळकेंनी ‘राजा हरिश्‍चंद्र’ ही पहिली फिचर फिल्म तयार केली. या घटनेला आता शंभर वर्षे उलटून गेली आहेत. या शंभर वर्षांत सिनेमाने अनेकदा कात टाकली. मूक सिनेमा बोलपट झाला. कृष्णधवल सिनेमा रंगीत झाला. सिनेमाची व्यावसायिक, कलात्मक, बालचित्रपट, ॲनिमेशनपट, साय-फाय इ. गटांमध्ये विभागणी झाली; पण सिनेमाचे आकर्षण काही कमी होताना दिसत नाही. भारतीयांचे सिनेमाप्रेम सर्वश्रुत आहे; मात्र किती जणांना बदलत गेलेल्या सिनेमाचा इतिहास ठाऊक आहे? तो जाणून घ्यायचा असेल, तर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजनला एकदा भेट द्यायला हवी. २०१३ मध्ये भारतीय सिनेविश्वाला १०० वर्षे पूर्ण होणार ही बाब नजरेसमोर ठेवून २०१० मध्येच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाची निर्मिती केली. २०१९ मध्ये या संग्रहालयाचे लोकार्पण झाले. जिथे गेल्या शंभर वर्षांचा भारतीय सिनेमाचा इतिहासपट अतिशय रंजक पद्धतीने उलगडून दाखविण्यात आला आहे.

फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समधील दोन इमारतींमध्ये भारतीय चित्रपटाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे. ‘गुलशन महल’ ही एकोणिसाव्या शतकातील भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेली वारसा वास्तू आणि त्याच्या शेजारी बांधण्यात आलेल्या काचेच्या नवीन इमारतीत हे संग्रहालय विभागण्यात आले आहे. संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी ‘गुलशन महल’ ही वास्तू पाहताक्षणी आपण तिच्या प्रेमात पडतो. ‘गुलशन महल’मध्ये एकेकाळी दवाखाना, जयहिंद महाविद्यालयाचं कार्यालयही होतं. पुढे ही इमारत फिल्म्स डिव्हिजनच्या ताब्यात आली. आजवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालं असून वास्तूत फिरताना तेथील मदतनीस त्याची माहिती देतात. महालाच्या शेजारी दोन सुसज्ज चित्रपटगृहे बांधलेली असून, तिथे चित्रपट महोत्सव होतात आणि इतर वेळी सेन्सॉरसाठीच्या शोसाठी ती वापरली जातात.

महालातील तळमजल्यावर ‘सिनेमाची उत्पत्ती’, ‘सिनेमाचे भारतातील पदार्पण’, ‘भारतीय मूकपट’, ‘आवाजाचे आगमन’, ‘भारतीय सिनेमाचा कालपट’, ‘सर्जनशील अनुनाद’, ‘स्टुडिओचा कालखंड’ आणि ‘दुसऱ्या महायुद्धाचा सिनेमावर झालेला परिणाम’ अशी आठ भागांत मांडणी करण्यात आलेली आहे. सिनेमा चित्रित करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं, छायाचित्र, दस्तऐवज, पोस्टर्स, मॉडेल्स/डायोरामा आणि मल्टिमीडिया किओस्कचा वापर येथे करण्यात आलेला आहे. सिनेमा भारतात दाखल होण्यापूर्वी कथपुतळीच्या सहाय्याने कशा प्रकारे गोष्टी सांगितल्या जात, पहिला कॅमेरा कुठला, पहिल्या चलचित्राचे प्रदर्शन, लुमिएर ब्रदर्सचे पुतळे, भारतीय सिनेमाचे विविध भाषिक प्रवर्तक, भारतातील जुनी चित्रपटगृहे, आरंभीचे स्त्री-पुरुष कलाकार, राजा हरिश्‍चंद्र सिनेमातील चित्रफिती, दादासाहेब फाळकेंचा पुतळा, सर्व भाषांतील लोकप्रिय सिनेमांची पोस्टर्स, स्टुडिओ प्रणाली, उपकरणे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर सिनेमा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय सिनेमांची कामगिरी, सिनेजगताशी संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेली पोस्टाची तिकिटे अशा सामान्यजन विचारही करू शकणार नाही, इतक्या सिनेमाशी निगडित गोष्टींचे संकलन येथे पाहता येते.

संग्रहालयाच्या नवीन चार मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर ‘गांधी आणि सिनेमा’ दुसऱ्या मजल्यावर ‘चिल्ड्रन्स फिल्म स्टुडिओ’ तिसऱ्या मजल्यावर ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि भारतीय चित्रपट’ आणि चौथ्या मजल्यावर ‘संपूर्ण भारतातील सिनेमा’चा पट अतिशय कलात्मकतेने उलगडून दाखविण्यात आला आहे. व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टिमीडिया व इंटरॅक्टिव एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. शंभरहून अधिक वर्षांच्या सिने-इतिहासाकडे बघत असताना, इथली स्थित्यंतरं अनुभवत असताना अचंबित व्हायला होतं. एक मोठा समृद्ध पट डोळ्यासमोर उभा राहतो.

ज्या सिनेमाकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहिले जाते, त्याचा प्रवास पाहिल्यानंतर सिनेमा-कलेविषयी मनात अधिक आदरभाव निर्माण होतो. एक सिनेमा तयार करण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये, साधनसामग्री आणि तंत्रज्ञान लागते हे पाहून थक्क व्हायला होतं. तुम्ही अस्सल सिनेमाप्रेमी असाल, तर एक भेट पुरेशी ठरणार नाही. चांगल्या पुस्तकाची जशी पारायणं केली जातात, तशा अनेक भेटी इथे द्याव्या लागतील. त्या द्यायलाही हरकत नाही, कारण इथले प्रवेशमूल्य अवघे वीस रुपये आहे. मुंबईतील आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाला सिनेकलाकारांचे बंगले पाहायचे असतात किंवा त्यांची झलक पाहायची असते. संधी मिळेल तेव्हा ती नक्की पाहा. मात्र सिनेमावर तुमचं खरं प्रेम असेल, तर सर्वात आधी या संग्रहालयास भेट द्या. मुंबईत येणारे तुमचे मित्र-मैत्रीण, कुटुंबीय आणि मुंबईत काय पाहता येईल, असं विचारणाऱ्यांना संग्रहालयात आवर्जून जायला सांगा. कारण भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयामुळे सिने-इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे करण्यात आला आहे.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com